कमलेश बस्स की बस, आता करा बस्स !

कमलेश बस्स की बस. आता झालं बस्स.

गड्यांनो आपल्याला ना आजकाल एक रोग लागलाय. साथीचाच रोग हाय त्यो. त्याचं नाव व्हिडिओ व्हायरल करणे. एकदम घाण सवय. पटकन पसरणारा रोग ह्यो.  कमलेश बस्स की, बस्स ! हा एका गतिमंद पोराचा व्हिडीओ व्हायरल करायचा रोग लागलाय.

सुरवातीला गंमत म्हणून कोणीतरी या पोराचा व्हिडीओ काढला. या व्हिडीओत ते जगाचा भान नसलेलं, आपल्याच धुंदित जगणारं  पोर “कमलेश बस्स की बस्स … एवढासा हाइस तू” चित्रविचित्र हावभाव करत ही बडबड करत आहे.

ज्यांनी बघितला नाहीसा त्यांनी आधी बघा हा व्हिडीओ बघून घ्या

https://www.youtube.com/watch?v=MByenn2sKrs

व्हिडीओ बनवणाऱ्यान त्याला एक चमकणारा गॉगल घातलाय. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मिडिया नावाच्या गटारगंगेत अर्पण केला. झालं. हा हा म्हंता म्हंता प्रत्येक टाळक्याच्या मोबाईलमध्ये कमलेश उर्फ ‘ओबामा’ या नावानं ही क्लिप फिरू लागल्या.

काही इदरकल्याणी बेनी त्यांच्या कलेचे प्रयोग या बिचाऱ्या पोरावर करू लागली. कोणी त्याचा घोड्यावर भेदरून बसलेला व्हिडीओ बनवला, तर कोण त्याला सिगरेट वडायला लावली. कोणी कोणी त्याला दारू पाजली, गांजा दिला. त्या नशेत कमलेश काहीही शिवीगाळ करत बडबड करू लागला.

गंमत आणि आसुरी आनंद या दरम्यान एक मोठी लाईन असत्या भारत-पाकिस्तान लाईन पेक्षा मोठी. व्हिडीओ बनवणारी कधीच त्याच्या पलिकड पोहचली होती.

अशातच गणपतीचा सिझन आला. टिळक महाराजांनी समाजान चांगल्या कामासाठी एकत्र यावं म्हणून सुरु केलेल्या या गणरायाच्या उत्सवात आज काल डॉल्बीवर वाजवायला काही चिवित्र गाणी लागत असत्यात. त्याशिवाय डान्स अंगात घुमत नाही. मग डान्सं घुमायला ‘कमलेश बस्स की बस्स’ हे वाक्य वापरायच कोणी तरी ठरवलं.

रेकॉर्डिंग स्टुडीओत नेऊन कमलेशचा आवाज रेकोर्ड केला आणि या रेकॉर्डिंगचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल केला. दर वर्षी कोणाच्या डॉल्बीचा मजला मोठा असली इर्षा करणारी मंडळं या वर्षी आपल्या मिरवणुकीच्या ट्रॉलीवर नाचायला कमलेशला घेण्यासाठी भांडू लागली.

शिकल्या सवरलेल्यांचे हे अश्राप जीवाबरोबरचे क्रूर खेळ थांबवायसाठी पोलिसांना दंडुका बाहेर काढवा लागला.

कमलेशबद्दलची  माहिती गोळा केल्यावर समजलं की त्याचं खर नाव कमलेश नाही तर त्याचं नाव विनायक माणकापुरे. कोल्हापुरातल्या गणेश कॉलनीत तो राहतो. त्याचा उपचार, त्याचं शिक्षण हे आईबापाला त्याच्या पेलवनारं नाही. निसर्गानच अन्याय केलेल्या या पोरावर ओढवलेली ही परिस्थिती त्याच्या घरच्यांच्या गावीसुद्धा नव्हती.

अखेर कोल्हापुरातल्याच काही गणेश मंडळांनी विनायकची जबाबदारी उचलली. आता त्याच्या उपचारासाठी आणि शिक्षणासाठी पुढं येण्याचं आवाहन केलं जातंय, ही उशिरा सुचलेली सुबुद्धीच म्हणायची.

सगळ्यात महत्वाची एकंच गोष्ट सांगायचीय ती म्हणजे जर तुम्हाला त्याला मदत कराय जमत नसेल तर कमीत कमी असले विकृत व्हिडीओ बनवणं आणि ते व्हायरल करणं या पासून तरी स्वतःला रोखा किंवा कोणी करत असेल तर त्याला पण समजावून सांगा.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.