माधुरीचं हे गाणं जन्माला येतानाच पत्रिकेत राजयोग घेऊन आलं होतं.

गेल्या काही दिवसापूर्वी एका नामंकित आणि विश्वासार्ह संस्थेने एक ओपिनियन पोल घेतला. या सर्व्हेमध्ये मध्ये असं आढळून आलं की भारतातल्या जवळपास ५०% पेक्षा जास्त लोकसंख्येच्या स्त्री आणि पुरुषांनी माधुरी दीक्षितचं “एक दो तीन” हे गाण आयुष्यात एकदा तरी गुणगुणल आहे. हा सर्व्हे सुरु असताना अशी ही मागणी पुढ आली की या गाण्याला गेल्या शतकातील सर्वात लोकप्रिय गाण हा पुरस्कार देण्यात यावा.  

(हा सर्व्हे करणारी जगद्विख्यात विश्वासर्ह संस्था म्हणजे आम्हीच. कोणालाही सांगू नका. असो!)

साल होत १९८८ , तेजाबचं प्रीप्रोडक्शनचं काम सुरु होतं. या फिल्मचे डायरेक्टर होते एन.चंद्रा म्हणजेच आपले चंद्रशेखर नार्वेकर. तेच या सिनेमाचे प्रोड्युसर सुद्धा होते. त्यांनीच या फिल्मची कथा सुद्धा लिहिली होती.  सिनेमाचा हिरो होता अनिल कपूर आणि हिरोईन होती माधुरी दिक्षीत. मिस्टर इंडिया वगैरे मुळे अनिल कपूर तसा बर्यापैकी फेमस होता पण माधुरी दिक्षीतचे सात आठ सिनेमे येऊन ही तिला कोणी विशेष ओळखत नव्हत.

सगळी तयारी झाली. सिनेमाचा मुहूर्त झाला. शुटींग सुद्धा सुरु झालं. फक्त आता प्रश्न उरला गाण्यांचा.

त्याकाळचे नंबर वनचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार जावेद अख्तर यांना एन चन्द्रांनी साईन केलं. हे सगळे गाणी बनवण्यासाठी बसले. गाण बनवायचं झालं तर गाण्याची सिनेमामधली सिच्युएशन सांगण आलं. लेखक,दिग्दर्शक निर्माते असणाऱ्या एन चंद्राना मात्र सिच्युएशन सांगायलाच जमेना. त्या दिवशी काहीच काम होऊ शकल नाही.

परत दुसऱ्या दिवशी सगळे जमले. त्या दिवशी एन चंद्रा गाण्याची सिच्युएशन सांगण्याचा प्रयत्न करू लागले. लोटीया पठाण नावाचा व्हिलन येतो आणि डांस करणाऱ्या हिरोईनला स्टेजवरून उचलून नेतो. त्यादिवशी सुद्धा या गाण्याची गाडी काही पुढे सरकली नाही.

तिसऱ्या दिवशीसुद्धा हाच प्रकार घडला. फक्त तेव्हा गीतकार जावेद अख्तर आलेचं नव्हते. एन चंद्रा संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल सोबत ट्यूनबद्दल डिस्कशन करू लागले. त्यावेळी त्यांनी एक मराठी गाण्याची ट्यून गुणगुणून दाखवली.

“डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग”

लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडी पैकी लक्ष्मीकांत यांनी ही ट्यून ऐकलेली होती. त्यांनी हार्मोनियम मागवली आणि त्यावर ही धून वाजवून पाहिली. सगळ्यांना ती आवडली. पण शब्द लिहायला जावेद अख्तर नव्हते. लक्ष्मीकांत प्यारेलालनी  आपल्या नेहमीच्या सवयीने एक दोन तीन चार पाच छे हे आकडे डमी लिरिक्स गाऊन ही धून रेकोर्ड केली आणि ती कॅसेट जावेद अख्तर यांच्या घरी पाठवून दिली.

खर तर जावेद अख्तर यांना सुद्धा गाण लिहीताना शब्दच सुचत नव्हते. गाण तर लगेच द्यायचं होत.आळस म्हणा किंवा आणखी काही त्यांनी त्याच डमी लिरिक्सला गाण्यात रुपांतरीत करायचं ठरवलं. पुढच्या एका तासाभरात गाण तयार झालं.

त्या पुढच्या दिवशी जावेद साब गाण रेकोर्डिंग होणार होत त्या मेहबूब स्टूडियोमध्ये आले. सगळे उत्सुकतेने गाण ऐकायला गोळा झाले, जावेद अख्तरनी गायला सुरवात केली,

“एक दो तीन चार पांच छे सात आठ नौ डस ग्यारह बारा तेरा !!!”

सुरवात ऐकताच लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं डोक फिरलं. त्यांना वाटलं जावेद अख्तर चेष्टा करत आहेत. आपण पाठवलेलं डमी लिरिक्स आपल्यालाच ऐकवत आहेत.

पण जावेद म्हणाले हेचं गाण्याचे खरे लिरिक्स आहेत. एन चंद्रा यांना तर आता चक्कर यायची वेळ  आली. या दिग्गज लेखक कवीला वेड लागलंय की काय कळायचा मार्ग नव्हता. संगीतकार लक्ष्मीकांत रागाने ओरडले,

“देखिये देखिये आपने ये जो लिखा है वो पुरा बकवास है. ऐसा गाना कभी होता है क्या?”

जावेद अख्तरनी त्यांना पूर्ण गाण ऐकून घेण्याची विनंती केली. त्याचे पुढचे बोल होते,

“तेरा करू दिन गिन गिन के आजा पिया आयी बहार”

पूर्ण गाण ऐकून एन.चंद्रा यांच्या जीवात जीव आला. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या समोर आणखी एक प्रॉब्लेम उभा होता. हे गाण गाणारी सिंगर अलका याज्ञीक आज गाणार नाही म्हणून बसली. तिचा गळ्याच इन्फेक्शन झालं होत. साध बोलतानाही तिला त्रास होत होता. गाण तर राहील लांब.

एन चंद्रानां गाण मात्र लगेच हवं होत. गाण्याच्या शुटींगचा सेट उभा राहिला होता. शुटींग करायचं होत. बरेच दिवस वाया गेले होते.

लक्ष्मीकांत प्यारेलाल तिला म्हणाले

“फक्त तात्पुरत डान्सचं शुटींग साठी लागणार आहे .कच्च रेकोर्डींग करू. तुझा गळा ठीक झाल्यावर परत फायनल रेकॉर्ड करू. “

एन चंद्रा वगैरे सगळ्यांनी तिच्या हातापाया पडून तिला कसबस तयार केलं. अलका  याज्ञीक ने गळा खराब असताना ही त्यादिवशी ते गाण एका टेक मध्ये गायलं.

गाण्याच शुटींग सुरु झालं. सेटवर डान्स पाहायला खरं पब्लिक गोळा झालं होत. बसायला जागा उरली नव्हती म्हणून सगळे जण उभेच होती. सरोज खाननी माधुरीला डान्स स्टेप समजावून सांगितल्या. गाण्याची रिहर्सल झाली. फायनल टेक सुरु झाल्यावर माधुरी अचानक अंगात वीज संचारावि अशी तुफान नाचली.

मोहिनी मोहिनी हा जयघोष आणि शिट्ट्यानी तो सेट दणाणून गेला. तिथे जमलेला प्रत्येक जण ते गाण आणि तो डान्स बघून  खरोखर पागल झाला होता. गर्दीत झालेल्या ढकलाढकलीत एकमेकंाचे शर्ट फाडण्यात आले होते.

शुटींग पूर्ण झालं. अलका याज्ञीकला अजून ही गाण्याच्या फायनल रेकोर्डीगसाठी बोलवलं नाही आश्चर्य वाटलं . लक्ष्मीकांत प्यारेलालना भेटून तिने त्याबद्दल विचारलं. प्यारेलाल म्हणाले

“बेटा तुमने उसं दिन जो गाया वही लाजवाब था. ये गाना तो सुपरहिट होनेवाला है. अगर तुमने ये जो गाया वो खराब गला है तो मै चाहुंगा तुम हर गाना खराब गलेसे गाओ.”

तेजाब रिलीज झाला. सुरवातीला थंड प्रतिसाद होता. पण माउथ पब्लिसिटीमुळे सिनेमाने जोर पकडला. या यशामध्ये एक दो तीन या गाण्याचा सिंहाचा वाटा होता.  अलका याज्ञीकच्या आवाजात हे गाण सुपरहिट झाल्यावर अमितकुमार च्या आवाजात अनिल कपूरवर चित्रित केलेलं सेम गाण पंधरा दिवसांनी सिनेमामध्ये टाकण्यात आलं.

पुढे अनेक महिने एक दो तीनची जादू कमी झाली नाही. गल्ली बोळात, लग्नात गणपतीमध्ये, छायागीत रंगोली सगळीकडे हे गाण होत. शाळेत पोरांना आकडे मोजून दाखव म्हटल्यावर डिंग डॉंग डिंग म्हणायला सुरु करत होती.

असंख्य अडचणी, आळसपणा, गोंधळ असं काय काय घडलं. तरीपण हे गाण जन्माला आलं. पण येताना आपल्या पत्रिकेत राजयोग लिहून घेऊन आलं असाव. आल्या आल्या रातोरात माधुरी, अलका याज्ञीक यांचं करीयर  बदलून टाकलं. माधुरी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगते,

“तेजाब रिलीज झाला तेव्हा माझ्या एका मल्टीस्टारर सिनेमाच शुटींग सुरु होत. यातल्या एका गाण्यात मी तीन तीन हिरोईनच्या गर्दीत कुठे तरी साईडला होते. एक दो तीन हिट झालं आणि त्या दिवसापासून गाण्यात त्या सिनेमात मला मध्यवर्ती भूमिकेत आणण्यात आल. माझं आयुष्य या गाण्यान बदललं.”

मागच्या वर्षी आलेल्या बागी २ या सिनेमात जॅकलीन फर्नान्डिसने या गाण्याच्या रिमेकवर डान्स करून तो नॉस्टॅलजीया परत आणण्याचा प्रयत्न केला. पण तो काही यशस्वी झाला नाही. लोक अजूनही आपल्या लहानपणीच्या आठवणीतल्या माधुरीलाचं मनात जपून आहेत.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.