किशोर कुमारनी खालेल्या बारा पानांमुळे “खाई के पान बनारसवाला” ला रंग चढला.
भारतातले जर सर्वात आयकॉनिक सिनेमांची यादी काढायची झाली तर त्यात एका सिनेमाचं नाव नक्की येईल “डॉन !” हां माहितीय शाहरुख वाला ड्युपलीकेट डॉन नाही. ओरिजिनल ‘बच्चन’ वाला डॉन !
खर तर अशा यादीत देवदास, मदर इंडिया, शोले, मुघल ए आझम असे जबरदस्त सिनेमे येतील पण तरी टिपिकल फायटिंग मसाला सिनेमा असलेल्या डॉनला लोक का विसरू शकत नाहीत?
चंद्रा बरोट नावाचा एक व्यक्ती या सिनेमाचा दिग्दर्शक होता. एक व्यक्ती असं म्हटल कारण त्याच त्या पूर्वी कधी कोणी नाव ऐकलं नव्हत आणि या सिनेमानंतर देखील कोणी नाव ऐकलं नसेल. बच्चन ची अॅक्शन, हेलन -झीनत अमानचे हॉट सीन , सलीम जावेदचे पैसावसूल डायलॉग, कल्याणजी आनंदजीचं म्युजिक, किशोर कुमारचा आवाज. त्याकाळात हिट असलेला हा सगळा मसाला भरून चंद्रा ने हा सिनेमा बनवला. या पिक्चरची सगळी गाणी बच्चनच्या डायलॉगच्या तोडीस तोड होती.
“अरे दिवानो मुझे पेह्चानो कहां से आया मै हु डॉन !!”असो की “ये मेरा दिल प्यार का दिवाना”.
सिनेमा बनून तयार झाला. काही दिवसांनी डॉन रिलीज होणार. त्यापूर्वी चंद्राने आपल्या गुरुला म्हणजेच सिनेस्टार मनोजकुमारला पिक्चर दाखवण्यासाठी एक खास शो ठेवला. चंद्रा एकेकाळी मनोजकुमारचा असिस्टंट होता.
भारतकुमार म्हणून फेमस असलेल्या मनोजकुमारने सिनेमा बघितला. पिक्चर संपल्यावर उत्सुकतेने चंद्रा त्यांच्या जवळ गेला. मनोजकुमारच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन नेहमी प्रमाणे सिरीयस होते. चंद्राला टेन्शन आले. त्याने विचारले,
“सर आपको फिल्म अच्छी नही लगी?”
मनोजकुमार आपल्या वैचारिक पोजला सांभाळत म्हणाला
“इंटरव्हल के बाद फिल्म बहुत टाईट है. ऑडियन्स को बाथरूम को जाने को टाईम तो दे दो. पिक्चर मै और एक गाना चाहिये.”
आता वैचारिक पोज मध्ये जाण्याची वेळ चंद्राची होती. काही दिवसांनी सिनेमा रिलीज होणार आता गाण कुठून आणायचं? पण आपला गुरु सांगतोय म्हटल्यावर काही तरी करणे गरजेचे आहे.
चंद्रा म्युजिक डायरेक्टर कल्याणजी आनंदजीना भेटायला गेला. त्यांना सगळी सिच्युएशन समजावून सांगितली. आनंदजी नी स्वतः जवळच्या रिजर्व्ह स्टॉक मधली एक ट्यून त्यांना गाऊन दाखवली. खूप वर्षापूर्वी देवआनंद यांच्या ‘बनारसी बाबू’ या सिनेमासाठी त्यांनी ही ट्यून बनवली होती. चंद्राना ती ट्यून आवडली. पर्यायच नव्हता.
पिक्चरचे गीतकार होते कवी अंजान. त्यांना झट की पट या ट्यून वर गाण बनवायला सांगितलं. गाण्याचा मुखडा तयार होता. आतली कडवी लिहायची होती. अंजाननी गाण लिहिण्यासाठी आपल्या पोराची मदत घेतली. हा मुलगा म्हणजे पुढे जाऊन गिनीज बुकात आपले नाव नोंदवणारा गीतकार “समीर”
दोघांनी मिळून काही तासात गाण लिहून तयार केलं.
“खाईके पान बनारसवाला खुल जाय बंद अकल का ताला “
गाण्याच्या रेकोर्डिंगसाठी किशोर कुमारना बोलावण्यात आलं. आधी तर किशोरकुमार तयार नव्हते. त्यांना गाण्याचे शब्द आवडले नव्हते. कसबस त्यांना तयार करण्यात आलं. त्यांनी अट घातली ,
” मी येणार आणि एकाच टेक मध्ये गाण म्हणणार.दुसरा टेक घ्यायचं म्हणून मला सांगायचं नाही.”
रेकोर्डिंगला जेव्हा किशोरदा आले तेव्हा मात्र त्यांचा नूरचं वेगळा होता. अंगात कुडता आणि लुंगी, तोंडात पान !! त्यांच्या खिशात आणखी एक डझन भर पान होते. पानाची धुंदी म्हणायची की आणखी काही पण किशोरकुमारनी एका टेक मध्ये छप्परफाड गाण गायलं. रेकोर्डिंग रूममधले सगळे खुश होऊन नाचत होते. ऐकणाऱ्याला हे गाण खरोखर चढतय असा भास होत होता.
इकडे सलीम जावेदनी आपल्या स्क्रिप्टमध्ये या गाण्यासाठी सिच्युएशन तयार केलेली होती. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी डॉन पळून जातो आणि त्याची भेट काही युपी वाल्या भैय्याशी होते. ते त्याला भांग पाजतात आणि त्यावर पान खायला देतात.
सगळा योग जुळून आला. आता शुटींग बाकी होतं. डान्स बसवण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. शुटींगच्या आदल्या दिवशी अमिताभ बच्चन घरात थोडी प्रक्टिस करावी म्हणून डान्सची कॅसेट घरी घेऊन आले. टेपरेकॉर्डरवर गाण लावलं. गाण्याचे शब्द ऐकताच त्यांचा दोन वर्षाचा मुलगा अभिषेक गाण्यावर एक हात वर करून नाचू लागला.
अमिताभला खूप आश्चर्य वाटलं. नुकतचं चालायला शिकलेला मुलगा देखील या बीटवर डान्स करतोय याचा अर्थ हे गाण लोकांना निश्चित आवडणार. त्यांनी छोट्या अभिषेकच्या स्टेप्स गाण्यात वापरल्या.
शेवटच्या क्षणाला सिनेमात घातलेलं हे गाण खरोखर सुपरहिट झालं. डॉन सुपरहिट झाला. आजही पिढ्यानू पिढ्या हे गाण प्रत्येक रंगपंचमी होली, गणपती प्रत्येक ओकेजनला वाजवल जात. आणि आजही याच गाण्यामुळे बच्चनला छोरा गंगा किनारेवाला असं ओळखलं जात.
हे ही वाच भिडू
- एकेकाळी रणभूमी गाजवणाऱ्यानं मै पल दो पल का शायर हूँ सारखं रोमँटिक गाणं बनवलं.
- रेखा तिच्या या मैत्रिणीमध्ये बच्चनला शोधत असते.
- माधुरीचं हे गाणं जन्माला येतानाच पत्रिकेत राजयोग घेऊन आलं होतं.