अन् मेघे आणि गडकरींची मैत्री मृत्यूपत्रापर्यंत गेली!
राम गोपाल वर्माच्या सरकार पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनच्या तोंडी एक डायलॉग आहे,
ताकद लोगों को जोडने से बढती है, उन्हे खिलाफ करने से नही!
पिक्चर बघणाऱ्यांनी हा डायलॉग किती सिरीयसली घेतला माहीत नाही, पण राजकारणात मात्र हा डायलॉग लय लोकांनी मनावर घेतला. असंही राजकारणात कुणी कुणाचं पर्मनंट शत्रू नसतं आणि मित्रही. फरक फक्त एवढाच असतो की, काही लोकांची मैत्री तकलादू ठरते आणि काही लोकांची जगात भारी.
राजकारणापलीकडच्या मैत्रीचं असंच एक उदाहरण म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री आणि माजी काँग्रेस खासदार दत्ता मेघे ही जोडी. मेघे आता भाजपमध्ये आले असले, तरी चार वेळा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
या दोघांची मैत्री चर्चेत यायचं मुख्य कारण म्हणजे, दत्ता मेघे यांनी केलेलं विधान. नगरपालिकेच्या विकासकामांचे लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमात मेघे म्हणाले, ‘माझ्या मृत्यूपत्रात नितीन गडकरींचं नाव आहे.’ हे ऐकून अनेकांच्या भावना उंचावल्या, पण इतिहासात डोकावून पाहिलं तर दोघांनी आपल्या मैत्रीचे दाखले वेळोवेळी दिले आहेत.
गडकरी मेघेंबाबत काय म्हणतात…
पुण्यात लेखक रामदास फुटाणे यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी गडकरींनी त्यांच्या मैत्रीचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, ”मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील. आम्हाला जेव्हा कुत्रं विचारत नव्हतं, आम्हाला एक पैशाची किंमत मिळत नव्हती, तेव्हा मेघे साहेब मंत्री होते. तरीही त्यांनी आम्हाला सन्मानानं वागवलं. त्यामुळे त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध भावाभावाच्या पलीकडले आहेत. त्यांनी माझं नाव त्यांच्या मृत्यूपत्रात टाकलं आहे. महाराष्ट्राचा हा जो वारसा आहे, तो संपूर्ण देशानं अनुकरण करण्यासारखा आहे.”
मेघे गडकरींबाबत काय म्हणतात…
“राजकारणात माणसांशी असलेले ऋणानुबंध कायम जपणारे फार थोडे नेते सध्याच्या राजकारणात आहेत. यात नितीन गडकरींचं स्थान खूप वरचं आहे. गडकरी विद्यार्थी नेते असल्यापासून मी त्यांना ओळखतो. विचारावर असणाऱ्या ठाम निष्ठेनं ते भाजपचा विस्तार करण्यासाठी सातत्यानं झटत आहेत. गडकरींनी अनेकदा अपयश पाहिलं, पण विचारांवरची निष्ठा कधी ढळू दिली नाही. त्यांनी सत्तेसाठी कधीही तडजोडी केल्या नाहीत.”
“आपल्या राजकीय कारकिर्दीत गडकरींनी राजकारणापलिकडे जाऊन माणसं जोडली. सर्व पक्षांच्या, सत्तेत असलेल्या किंवा नसलेल्या, सर्व जातिधर्मांच्या लोकांशी त्यांनी आपले संबंध जपलेत. मी काँग्रेसमध्ये असल्यापासून माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत.”
“मी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पुन्हा काँग्रेसमध्ये असा प्रवास केला. काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात आलो. मी भाजपमध्ये येण्याचं मुख्य कारण नितीन गडकरी आहेत. त्यांचं नेतृत्व आणि आमचे घरगुती संबंध यामुळंच मी भाजपमध्ये आलो.”
“गडकरींची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे, शब्दाला जागणारा माणूस. राजकारणात फार कमी लोक दिलेला शब्द पाळतात. मुलगा समीर मेघेला आमदार करण्याचं आश्वासन पाळत त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत हिंगणा मतदारसंघातून त्याला उमेदवारी दिली आणि समीरला निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले. गडकरींच्या प्रयत्नातूनच सागर मेघे नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार झाले होते. अत्यंत धकाधकीच्या काळात गडकरींसारखा सहकारी मिळणं ही माझ्यासाठी नशिबाची गोष्ट आहे.”
थोडक्यात सांगायचं झालं, तर या दोन्ही दिग्गज नेत्यांनी पडत्या काळात एकमेकांना मदत केली आणि प्रगतीच्या काळात मैत्रीत अंतर येऊ दिलं नाही. आपल्या उभारीच्या काळात सन्मान देणाऱ्या मेघेंना दिलेला प्रत्येक शब्द गडकरींनी पाळला. साहजिकच मेघेंना मृत्यूनंतरही गडकरी मैत्री जपतील याची खात्री आहे.
हा विदर्भाच्या मित्रांचा किस्सा वाचला की, अटलबिहारी वाजपेयी यांचं वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही…
सरकारें आयेंगी, जायेंगी, पार्टियां बनेंगी, बिगडेंगी… मगर ये देश रहना चाहिए!!
हे ही वाच भिडू:
- नितीन गडकरींच्या एका वाक्यानं भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री टेन्शनमध्ये आलेत
- शिवसेना भवनावर दगडफेक होत होती आणि इतक्यात घोषणा झाली, आया रे शेर, विदर्भ का शेर
- विदर्भाच्या महापुरात शहीद झालेली कोंबडी आणि रामदास आठवले.