खान तुटकी बोटे घेऊन दिल्लीला गेला पण जाताना पुण्याला स्वारगेट देऊन गेला.

स्वारगेट. पुण्यात शिरणाऱ्या प्रत्येकाला हे नाव चुकवता येत नाही. इथं पुण्याचा मुख्य बस स्टँड आहे. शिवाय अनेक खाजगी गाड्या, बसेस, वडाप, पीएमटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांमुळे स्वारगेट कायम जिवंत असते.

पण आपल्या पैकी अनेक भिडूना प्रश्न पडतो की स्वारगेट हे नाव कस पडलं असावं?

आता पुणेकर म्हटल्यावर नावा मागे काही तरी मोठा इतिहास दडला असेल हे नक्की.

काय आहे स्वारगेटच्या नावामागच स्टोरी?

पुणे ही शहाजीराजे भोसलेंची जहागीर. त्यांनी दक्षिणेकडे गेल्यावर मुरारजगदेवने गाढवाचा नांगर फिरवून ती लुटली. गावावर शाप बसला अशी समजूत करून घेऊन लोक गाव सोडून गेले.

पण महाराष्ट्रात परतलेल्या जिजाऊंनी बाळ शिवबाच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला आणि गावाची पुनर्स्थापना केली. लोकांची भीती मोडून त्यांना गावात परत यायला लावलं.

रयतेमध्ये विश्वास वाढवा म्हणून पुण्यात एक महाल बांधून घेतला आणि शिवबासह त्या तिथे राहु लागल्या.

हाच तो लाल महाल.

लाल महालात महाराजांच बालपण गेलं. पुण्याच्या आसपासच्या मावळात त्यांना आयुष्यभराचे सवंगडी भेटले ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी महाराजांसोबत रक्त अर्पण केलं.

तोरणा, कोंढाणा, पुरंदर, लोहगड अशा चोहोबाजुनी मजबूत किल्ल्यांनी पुण्यावर एक प्रकारे छत्र धरले.

स्वराज्याची स्थापना झाल्यावर शिवरायांनी पुण्याजवळच्याच राजगडावर आपली पहिली राजधानी स्थापन केली. शिवरायांच्या हालचाली मुळे आदिलशाही, मुघल असे गनीम सावध झाले.

सर्व प्रथम आदिलशहाने स्वराज्यावर हल्ला केला मात्र अफझलखानाचा उडालेला फज्जा पाहून त्यांचे अवसान गळाले.

हे सर्व पाहत असलेल्या औरंगजेब बादशाहने आपला लाडका मामा शाहिस्तेखानाला शिवसाम्राज्याच्या विनाशासाठी पाठवून दिले.

जानेवारी 1660 साली महाकाय मुघल सैन्य शाहिस्तेखान मोठ्या आत्मविश्वासाने महाराष्ट्रात घुसला. त्याने चाकण कल्याण, सासवड इंदापूर जिंकून घेतले.

आणि स्वराज्याभोवती आपला फास आवळला.

सह्याद्रीच्या गडकिल्ल्यावर मराठ्यांना हरवणे शक्य नाही हे खानाला ठाऊक होते. अफझलखानाने केलेली चूक करायची नाही म्हणून छ. शिवाजी महाराजांना मोकळ्या रणांगणात आणायचे प्रयत्न चालू केले.

सर्वप्रथम त्याने पुणे जिंकून घेतले व शिवरायांच्या लालमहालात मुक्काम ठोकला. आसपासच्या रयतेवर जुलूम करणे, धार्मिक विटंबना करणे, शिवरायांच्या सरदारांना फोडणे असे प्रकार सुरू केले.

शाहिस्तेखानाचे हे उद्योग पाहून महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली.

पण त्यांनीं योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम बाळगला.

शाहिस्तेखान पुण्यात तब्बल दोन वर्षे ठाण मांडून होता. त्याने अख्ख्या पुण्याला छावणीचे स्वरूप आणले होते. जागोजागी चौक्या स्थापन केल्या होत्या. पुण्यात कोणालाही सहज प्रवेश करता येणे शक्य नव्हतं.

सर्वात मुख्य चौकी होती कात्रज घाटाच्या रस्त्यावर.

मराठे आले तर कात्रजवरून येतील याची शाहिस्तेखानाला खात्री होती.

ही मुख्य चौकी म्हणजे आजचे स्वारगेट. तिथे कायम घोडे स्वारांची गस्त सुरू असायची. एकप्रकारे पुणे लॉकडाऊन केले होते.

एका लग्नाच्या मिरवणुकीच निमित्त करून खुद्द शिवाजी महाराज पुण्यात शिरले. त्यांचं अख्ख बालपण याच गावात गेले असल्यामुळे त्यांना लाल महालात घुसण्यास कोणतीही अडचण आली नाही.

६ एप्रिल १६६३ च्या पहिल्या प्रहरात काळोख साधून महाराज व त्यांचे शूर मावळे महालात शिरले. खानाचा मुलगा मारला गेला.

जनानखाण्यात लपलेला शाहिस्तेखान जखमी झाला.

मुघल सैन्य सावध होण्याच्या आत शिवाजी महाराज व त्यांचे मावळे सिंहगडाच्या दिशेने गेले. मुघल सैनिकांना फसवण्यासाठी कात्रजच्या घाटात बैलाच्या शिंगावर मशाली बांधल्या. काळोखात तो दिव्याचा प्रकाश पाहून मुघल पहारेकरी कात्रजकडे गेले

आणि महाराज सुरक्षितपणे सिंहगडावर पोहचले. एक वेडं धाडस यशस्वी ठरलं. मुघलांना कायमचा धडा शिकवण्यात आला.

अपमानित झालेला शाहिस्तेखान आपली तुटलेली बोटे घेऊन दिल्लीला परत गेला जाताना पुण्यात स्वारगेट सोडून गेला.

ज्यांनी ज्यांनी पुण्यावर राज्य केलं त्यांनी आज स्वारगेट आहे त्या ठिकाणी चौकी उभी केली.
पुण्यात प्रवेश करायचा झाला तर तिथल्या घोडेस्वार पहारेकऱ्यांना ओळख पटवूनच मगच गावात शिरता येई.

पेशवाईत जकात गोळा करण्यासाठी हे मुख्य ठाणे होते.

पुढे इंग्रज अमलात कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार झाले. आणि नाके किंवा चौकी असे न राहता त्याचे नाव ‘गेट’ असे झाले. म्हणून घोडेस्वार तैनात असलेले नाक्याचे ठिकाण पुढे “स्वारगेट” असे ओळखले जाऊ लागले.

आज स्वारगेटप्रमाणे रामोशीगेट, म्हसोबागेट, पुलगेट, पेरुगेट ही गेट आजही पुण्यात अस्तित्वात आहेत.

1940 पासून स्वारगेटला बस धावू लागल्या.

तिथे पुण्याचं मुख्य बस स्थानक बांधण्यात आलं. आज इथेच मेट्रोचही काम सुरू आहे. पीएमपीएलच्या बस स्थानकाला छत्रपती शाहू महाराजांच नाव देण्यात आलंय तर

स्वारगेटच्या चौकाचे आजचे नाव देशभक्त केशवराव जेधे चौक’ असे आहे.

त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह त्यांचा संक्षिप्त जीवनपट येथे लावला आहे. चौकातून गेलेल्या उड्डाणपुलास सुद्धा त्यांचेच नाव आहे. तरीही तो स्वारगेट चौक या पुण्यातल्या इतर ठिकाणांप्रमाणे जुन्या नावानेच ओळखला जातो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.