इंग्रजांनी २ लाखात ताजमहल विकला होता, पण पुढे एक घोळ झाला.

लॉर्ड विल्यम बेंटिक हा इंग्रज शासक आपल्याला माहित असतो तो त्याने भारतीय शिक्षण व्यवस्थेत केलेल्या सुधारणांसाठी किंवा राजा राममोहन रॉय यांनी त्याच्या मदतीने केलेल्या सतीप्रथेच्या उच्चाटनाच्या प्रयत्नासाठी.
पण याच लॉर्ड विल्यम बेंटिकबद्दलची एक गोष्ट तुम्हाला माहित असण्याची शक्यता फारच कमी आहे.
ती गोष्ट म्हणजे या माणसाने चक्क ताजमहाल विकायला काढला होता. ब्रिटीश उमराव आणि राजकारणी लॉर्ड मार्क्स बेरेस्फोर्ड आणि सर विल्यम स्लिमन यांनी यासंदर्भात लिहून ठेवलंय.
लॉर्ड विल्यम बेंटिक हा १८२८ साली भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आला होता.
त्यावेळी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला आर्थिक तंगीचा सामना करायला लागत होता. त्यामुळे सर्वप्रथम खर्चाचं गणित व्यवस्थित बसवून कंपनीचा आर्थिक समतोल व्यवस्थित राखणे, ही बेंटिकची प्राथमिकता होती. म्हणूनच मोठ्या प्रमाणात पैसा उभारण्यासाठी ताजमहाल विक्रीला काढायचा निर्णय बेटिंकने घेतला होता. विशेष म्हणजे अशाच प्रकारचा एक प्रयत्न त्याने यापूर्वी देखील केला होता.
१८३० सालच्या आपल्या आग्रा भेटीत त्याने आग्र्याच्या किल्ल्यातील शाही हमामाची मोडकळीस आल्याचे कारण देत तोडफोड केली होती. त्याच्या अवशेषांची विक्री करत सरकारसाठी पैसा उभारला होता आणि त्यातील काही किमती अवशेष त्याने आपल्या मायदेशी इंग्लंडला देखील पाठवले होते.
हे अवशेष आज देखील लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात उपलब्ध आहेत. ताजमहालासंदर्भात देखील अशीच योजना बेंटिकच्या डोक्यात होती.
तर हा असाच इस्ट इंडिया कंपनीसाठी पैसे उभारण्यासाठी बेंटिकने घेतलेला हा निर्णय. यासंदर्भातील लिलावाची प्रक्रिया नेमकी कशी पार पडली याबाबतीत २ मतप्रवाह बघायला मिळतात.
काही इतिहासकारांच्या मते बेंटिकने पहिल्यावेळी लिलावाची घोषणा केली ती १८३१ साली. त्यावेळी शेठ लक्ष्मीचंद यांनी ताजमहालाच्या खरेदीसाठी २ लाखांची बोली लावली. परंतु ही किंमत खूपच कमी असल्याचे कारण देत त्यांची बोली नाकारण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांनी बेंटिकने दुसऱ्या लिलावाची घोषणा केली. या लिलावात देखील सर्वाधिक बोली लावणारी व्यक्ती होती शेठ लक्ष्मीचंद.
यावेळी त्यांनी बोली लावली होती ७ लाखांची. आता हा व्यवहार नक्की होणार आणि ताजमहाल शेठ लक्ष्मीचंद यांच्या मालकीचा होणार हे जवळपास नक्की झालेलं असताना ही बातमी ब्रिटीश संसदेपर्यंत पोहोचली आणि तिथे मोठा गदारोळ माजला. ताजमहालाच्या या खरेदी-विक्री व्यवहारामुळे धार्मिक दंगे होण्याची शक्यता लक्षात घेऊन ब्रिटीश संसदेने हा व्यवहारच रद्द ठरवला आणि ताजमहालाची विक्री झाली नाही.
ताजमहालाच्या विक्री प्रक्रिये संदर्भात जो दुसरा मतप्रवाह आहे त्यानुसार शेठ लक्ष्मीचंद यांना ताजमहाल पहिल्या लिलावा वेळीच विकण्यात होता. म्हणजे फक्त २ लाख रुपयांमध्ये. परंतु शेठ लक्ष्मीचंद ज्यावेळी ताबा घेण्यासाठी ताजमहालला गेले त्यावेळी तेथील स्थानिकांनी त्यांना विरोध केला आणि हा व्यवहार बारगळला.
दुसऱ्या लिलावाच्या वेळी मात्र इच्छुक खरेदीदारांची संख्या वाढली आणि लिलावामध्ये शेठ लक्ष्मीचंद यांना ताजमहाल ७ लाखांना मिळाला. परंतु त्याचवेळी ब्रिटीश सैन्यातील कुठल्यातरी अधिकाऱ्याने ही बातमी आपल्या मायदेशी इंग्लंडला कळवली. ब्रिटीश संसदेसमोर ज्यावेळी हा विषय आला त्यावेळी संसदेने मूर्खपणाचे कृत्य म्हणून हा व्यवहार रद्दबातल ठरविला.
या व्यवहारातील प्रमुख खरेदीदार असणाऱ्या मथुरेच्या शेठ लक्ष्मीचंद यांचे वंशज असणाऱ्या विजय कुमार जैन यांनी देखील अशा प्रकारचा व्यवहार पार पडला होता आणि ताजमहालाची मोडतोड होऊ नये आणि हा ऐतिहासिक वारसा जपला जावा म्हणून आपले पणजोबा शेठ लक्ष्मीचंद यांनी लॉर्ड बेन्तिक यांच्याकडून ताजमहाल खरेदी केला होता, अशी माहिती ताजमहालाच्या जागेच्या वादासंबंधीच्या एका प्रकरणात माध्यमांशी बोलताना दिली होती.