औंधच्या राजाचा सत्यातला प्रयोग सिनेमा म्हणून बर्लिन फिल्म फेस्टिवल गाजवून आला…

बिनभिंतीचा तुरुंग कधी ऐकलाय का? तुम्हाला एखाद्या कवीची कल्पनाच वाटेल.

पण एका कवीने ही कल्पना आपल्या लेखणीने सिनेमाच्या पडद्यावर देखील साकारली होती ‘दो आंखे बारह हाथ’ या चित्रपटात !

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद लिहिले होते. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन व्ही.शांताराम यांनी केलं होतं. सिनेमातल्या जेलर आदिनाथच्या मुख्य भूमिकेत सुद्धा खुद्द व्ही. शांताराम हेच होते.

या चित्रपटाचा नायक असणारा जेलर आदिनाथ पॅरोलवर असणारे भडक माथ्याचे ६ खुनी कैदी निवडतो आणि वरिष्ठांसकट सगळ्यांचा विरोध पत्करून एक नवीन प्रयोग करून बघतो. या क्रूर कैद्यांना कोणत्याही साखळदंड,जेलशिवाय सुधारायचं आव्हान त्यानं स्वीकारलेलं असतं. तो त्या कैद्यांना एका शेतात  घेऊन येतो आणि तिथेच कोणत्याही पहाऱ्याशिवाय या सहा कैद्यांसह राहायला लागतो. शेती पिकवतो. कैद्यांचाही स्वतः वर विश्वास नसतो. ते पळून जातात पण नंतर परत येतात. जेलर त्यांचा विश्वास जिंकतो,

असं या चित्रपटाचं एकंदरीत कथानक.

“ऐ मलिक तेरे बंदे हम” हे अतिशय समर्पक आणि आपल्या सर्वानाही सत्याचा मार्ग दाखवणारं गाणं सुद्धा याच चित्रपटातलं. माणसातल्या माणुसकीच्या भावनेला साद घालणारा  हा चित्रपट त्याकाळात गाजला.

अनेक राष्ट्रीय पुरस्कारांसह ‘गोल्डन ग्लोब’ आणि जर्मनीच्या बर्लिन चित्रपट महोत्सवातील  मानाच्या  ‘सिल्व्हर बेअर’ पुरस्कारावर देखील या चित्रपटाने आपली मोहोर उमटविली.

मात्र ‘बिनभिंतीचा तुरुंग’ ही खरंच  गदिमासारख्या महाकवीला सुचलेली कवीकल्पनाच होती का?

बऱ्याच वेळा चित्रपटात आदर्शवादाच्या गप्पा सांगीतलेल्या असतात. त्या कधी व्यवहारी दुनियेत खऱ्या ठरत नाहीत. ‘बिनभितीचा तुरुंग’ ही सुद्धा अशीच अवास्तव वाटणारी आदर्शवादी कल्पना वाटते. मात्र तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण असा तुरुंग अस्तित्वात आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडीपासून ४ किमी अंतरावर ‘स्वतंत्रपूर खुली वसाहत’ म्हणून हा तुरुंग प्रसिद्ध आहे. याच तुरुंगामुळे गदिमांना ‘दो आंखे बारह हाथ’ची कथा सुचली आणि त्यांनी ती पडद्यावर आणली.

प्रत्यक्षात हा प्रयोग केला होता औंधच्या राजानं. भवानराव पंतप्रतिनिधी.

राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे औंधचा राजा. औंधसारख्या छोट्या दुष्काळी संस्थानाचा हा राजा पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल स्वतः गांधीजींनी  घेतली होती, इतका हा मोठा माणूस.

त्यांनी आपल्या प्रजेला आपलं कुटुंब समजलं. शाळा-वसतीगृह काढली आणि तिथं विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. किर्लोस्करवाडी, ओगले काच कारखाना असे उद्योग त्यांच्यामुळेच तर उभे राहिले. पुरोगामी विचारांचा वारसा चालवला, अस्पृश्यता बंद केली, स्वातंत्र्यलढ्यातल्या प्रतिसरकारला मदत केली. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आपलं राज्य जनतेच्या हाती सोपवलं. असा हा कर्मयोगी.

Balasaheb Pant Pratinidhi
औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी

याचं औंधच्या राजानं गदिमांना शाळेतल्या नाटकात अभिनय करताना पाहिलं आणि ते म्हणाले,

“बाळ तू शिकला नाहीस तरी चालेल, तू टाकीत जा.”

त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. गदिमा आणि औंधच्या प्रजेसाठी ते पितृतुल्य होते.

जेव्हा व्ही.शांताराम आपली हिंदी चित्रपटाच्या निर्मितीची कल्पना घेऊन गदिमांना  भेटले तेव्हा माडगुळकरांनी त्यांना औंधच्या राजाची ‘बिनभिंतीच्या तुरुंगा’ची कथा ऐकवली.

साल होतं १९३९.

मॉरीस फ्रीडमन नावाचा एक  पोलिश इंजिनियर होता. गांधी विचारांनी भारावलेला आणि कायमचा भारतात स्थायिक झालेला मॉरीस औंधच्या राजाचा मित्र होता.  महात्मा गांधीच्या सल्ल्याने औंधच्या पंतप्रतिनिधींनी आपला राज्यकारभार जनतेच्या हाती सोपवून भारतात लोकशाहीचा अनोखा प्रयोग करायचं ठरवलं होतं.

त्यावेळी मॉरीस संविधान लिखाण आणि इतर गोष्टींमध्ये पंतप्रतीनिधींना मदत करत होता. त्यानेच पंतप्रतिनिधी महाराजांना बिनभिंतीच्या तुरुंगाची कल्पना सुचवली. महाराजांना ती आवडली आणि स्वतंत्रपूर उभं राहिलं.

maurice frydman
मॉरीस फ्रिडमन

मोठमोठ्या जेलमध्ये  मोठ्या मोठ्या भिंती असतात. तारांची कुंपणे असतात. अनेक पहारेकरी असतात मात्र तरीही अनेकदा कैदी तिथून पळून जातात. स्वतंत्रपूर वसाहतीमध्ये अशी कोणतीही सुरक्षायंत्रणा नव्हती आणि विशेष म्हणजे आजही नाही.

अजूनही औंधच्या राजाने बनवलेली ही व्यवस्था महाराष्ट्र शासनाने जशास तशी कायम ठेवली आहे.

कैद्यांच्या माणुसकीवर विश्वास ठेऊन गेली ऐंशी वर्ष अव्याहतपणे हा प्रयोग सुरु आहे.

आजही जन्मठेपेची शिक्षा झालेले सत्तावीस कैदी आपल्या कुटुंबांसमवेत तिथे राहतात. त्यांना जमीन दिलेली असते आणि ही जमीन ते कसतात. तिथे बनवलेला माल बाजारात जाऊन विकून येतात. त्यांनी पळून जायचं ठरवलं तर कोणीही त्यांची वाट अडवू शकत नाही. मात्र ते स्वतःच तिथून जात नाहीत.

सुरवातीच्या काळात काहीजण स्वतंत्रपूर वसाहतीतून पळून गेले होते मात्र मॉरीस फ्रेडमनसोबत ही वसाहत सांभाळणाऱ्या अब्दुल काझी गुरुजींच्या प्रेमाने त्यांना परत खेचले. स्वतःहून परत आलेल्या कैद्यांनी काझी मास्तरांचे पाय धरले. त्यानंतर मात्र  अशी घटना पुन्हा कधीच घडली नाही.

सुरवातीला काळात आसपासच्या गावातील लोक कैद्यांकडे संशयास्पद नजरेने बघत असत.

त्यांच्या शेतात पिकवण्यात आलेला शेतमाल आणि भाजीपाला विकत घ्यायचा नाही, अशी भूमिका घेऊन त्यांना विरोध देखील करण्यात आला, पण कालांतराने आटपाडीच्या गावकऱ्यांनी या कैद्यांना आपलं मानलं. सणासमारंभाच्या वेळी हे कैदी गावकऱ्यांमध्ये मिसळतात. बैलपोळ्याच्या मिरवणुकीत तर पहिला मान कैद्यांच्या बैलांनाच असायचा. आजही  कैद्यांच्या पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी गावकऱ्यांनीच स्वीकारलेली उचलेली आहे.

स्वतंत्रपूर वसाहतीमधील हे कैदी समाजोपयोगी कामात कायमच पुढे असतात. आटपाडीचा तलाव सुद्धा मॉरीसच्या मार्गदर्शनाखाली कैद्यांनीच उभारलेला आहे.

१९७२ सालच्या भीषण दुष्काळात या कैद्यांनी ‘आई तुला कशी म्हणू मी’ नावाचं नाटक बसवलं आणि ५० पैसे तिकिटावर ते गावागावात दाखवलं. यातून मिळालेले ७००० रुपये त्यांनी दुष्काळनिधीला दिले. आताही आमीर खानने सुरु केलेल्या ‘पाणी फौंडेशन’च्या ‘वॉटर कप’ स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला होता.

‘स्वतंत्रपूर खुल्या जेल’च्या यशस्वी प्रयोगामुळे १९७१ सालच्या ‘महाराष्ट्र खुले कारागृह अधिनियम’ अंतर्गत महाराष्ट्रात आणखी १३ खुले कारागृह बनवण्यात आले. मे २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाने आणखी सहा खुल्या कारागृहांच्या निर्मितीची  घोषणा केली आहे.

गुन्हा करणारा माणूस हा कायम गुन्हेगार नसतो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत भावनावेगात माणूस गुन्हा करायला प्रवृत्त होतो आणि सारा समाज त्याला गुन्हेगार म्हणून तिरस्काराची वागणूक देतो. चांगलं वागण्याची आणि सुधारण्याची संधी न मिळाल्यामुळ तो अट्टल गुन्हेगार बनतो.

गुन्हेगारामधला माणूस शोधून त्याच्यातल्या चांगुलपणाला माणुसकीची उब देऊन समाजात जगण्याचं बळ देण्यासाठी औंधच्या राजानं हा प्रयोग केला आणि त्याच्या महान शिष्यानं हा प्रयोग आपल्या लेखणीद्वारे सातासमुद्रापार नेला.

हे ही वाच भिडू

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.