गोष्ट तेव्हाची जेव्हा स्ट्रगलर असलेल्या अनुराग कश्यपकडे एका जेवणाचेही पैसे नव्हते

गँग्ज ऑफ वासेपूर सारखे गावाकडच्या मातीतले तुफान हाणामारी शिव्यांचा भडिमार असलेले इंडी सिनेमे बनवणारा अनुराग कश्यप आणि यशराज सारख्या मोठ्या बॅनर खाली रोमँटिक फॅमिली सिनेमाचा सुपरस्टार शाहरुख खान.

भारतीय फिल्मइंडस्ट्री मधील दोन ध्रुवाची दोन टोकं. हे कधी एकत्र येऊ शकतात यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

पण हे खरं आहे .

नुकताच मिडडे इंडियाच्या सीट विथ हिटलिस्ट या कार्यक्रमादरम्यान एका इंटरव्ह्यू मध्ये अनुराग कश्यपने त्यांच्या मैत्री बद्दल सांगितलं.

हे दोघेही मूळचे दिल्लीचे. दोघेही शिकायला हंसराज कॉलेजमध्ये होते. शाहरुख अनुरागचा बराच सिनियर होता. पण नाटकाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली असावी.

पुढे शाहरुख टीव्ही सिरियल्स मध्ये काम करू लागला, सिनेमात गेला.

बघता बघता सुपरस्टार झाला. कोणत्याही गॉडफादरचा हात नसतानाही मुंबईच्या फिल्मइंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा निर्माण करणारा शाहरुख अनुराग सारख्या अनेकांसाठी प्रेरणास्थान होता.

अनुराग देखील मुंबईला आला. पण त्याला यश शाहरुख एवढं सहज मिळालं नाही. सुरवातीला टीव्ही सिरीयल साठी डायलॉग लिहिणे, स्क्रिप्ट लिहिणे अशी कामे मिळत गेली पण त्याच क्रेडिट मिळायचं नाही.

हळूहळू राम गोपाल वर्माचा असिस्टंट इथंपर्यंत त्याची प्रगती झाली,

त्याच्या सत्या सिनेमाची स्क्रिप्ट अनुरागने लिहिली. तिथून मात्र त्याच आयुष्य बदललं. लोक ओळखू लागले, बिग बजेट सिनेमासाठी स्क्रिप्ट रायटिंग ची ऑफर मिळू लागली.

पण आदर्शवादी अनुराग ला पैसे कमवण्यात इंटरेस्ट नव्हता. त्याला सिनेमा बनवायचा होता पण कोणतीही तडजोड न करता.

पांच या सिनेमा पासून त्याची सुरवात झाली.

त्याचे सुरवातीचे कित्येक सिनेमे बनताना प्रोड्युसर मिळायचे नाहीत, प्रोड्युसर मिळाले तर सिनेमाला सेन्सॉरच सर्टिफिकेट मिळायचं नाही. काही न काही कारणाने अनुराग चे सिनेमे रिलीजच होत नव्हते.

प्रचंड स्ट्रगलिंगचा काळ.

अनुराग साठी हा बॅड पॅच होता. कोणतीही गोष्ट मनाप्रमाणे होत नव्हती. घरून मिळणारे पैसे देखील संपले होते. अक्षरशः रस्त्यावर येण्याची पाळी आली होती.

एके रात्री तो मुंबईत बँडस्टँडच्या जवळ हिंडत होता, त्याच्या खिशात जेवणासाठीही पैसे नव्हते. भूक तर प्रचंड लागली होती.

समोर बघितला तर एक आलिशान बंगला होता आआणि बाहेर पाटी होती, मन्नत

हा शाहरुख खानचा बंगला होता. अनुराग थेट त्याच्या घरात घुसला. शाहरुखला जाऊन भेटला. शाहरुख त्याला ओळखत होता. त्याला अनुराग किती टॅलेंटेड आहे हे ठाऊक होतं.

अनुराग ला भूक लागली आहे हे कळल्यावर शाहरुखने स्वतः किचन मध्ये जाऊन त्याच्यासाठी ऑम्लेट बनवलं.( कारण त्याला फक्त तेव्हढंच बनवता येत होतं.)

दोघांनी त्या रात्री खूप गप्पा मारल्या.

शाहरुख अनुराग ला सांगत होता की जर मी सांगतो तसं वागलास तर तू फिल्मइंडस्ट्रीमध्ये सगळं यश तुला मिळवता येईल.

पण अगदी रस्त्यावर येण्याची परिस्थिती असलेला अनुराग तशाही अवस्थेत नाही म्हणत होता.

पुढे अनुराग नो स्मोकिंग हा सिनेमा बनवतोय हे कळल्यावर शाहरुख स्वतः त्याला अप्रोच झाला. त्या सिनेमात तोच हिरो बनणार होता पण काही कारणांनी ते बारगळल.

आज अनुराग कश्यप भारताच्या आघाडीच्या फिल्ममेकर्स पैकी एक आहे. जागतिक स्तरावर त्याने स्वतःची ओळख बनवली आहे.

याही पलीकडे त्याची ओळख म्हणजे भांडकूदळपणा. अनुराग त्याची सामाजिक, राजकीय विचारसरणी बेधडक सोशल मीडियावर मांडल्यामुळे बऱ्याचदा अडचणीत सापडतो.

त्याची त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे बऱ्याचजणांशी जोरदार भांडणे कायम होतात.

पण तो ही एक गोष्ट मान्य करतो,

जगात असा एकच माणूस आहे ज्याच्याशी मी कधीच भांडण करू शकणार नाही तो म्हणजे शाहरुख खान. त्याने मला माझ्या वाईट वेळी मदत केली आहे. त्यानं माझ्यावर विश्वास दाखवला, त्याच प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. जरी तो माझ्यावर चिडला तर मी ऐकून घेईन आणि जास्तीतजास्त कोपऱ्यात जाऊन रडेन पण त्याला एक शब्दही उलटं बोलू शकणार नाही.

अजूनही शाहरुख आणि अनुराग यांचा एकत्र सिनेमा आला नाही.

बऱ्याचदा याच्या वावड्या उठत असतात. एकदा तर एका हॉलिवूड स्टार ला घेऊन ते सिनेमा बनवायच्या तयारीला लागले होते पण तेही कॅन्सल झालं.

अनुराग म्हणतोय, आम्ही नक्की काम करू, जो पर्यंत मी शाहरुख खान बरोबर काम करत नाही तो पर्यंत कुठेही जात नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.