कधीकाळी पोलिसांवर दगडफेक केली होती, सध्या जम्मू-काश्मीरमधील फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळखली जाते…!!!
साधारणतः दीड वर्षांपूर्वी श्रीनगरमधील एका मुलीचा फोटो देशभरात व्हायरल झाला होता. या फोटोत एक जमाव पोलिसांवर दगडफेक करत होता आणि त्या जमावाचं नेतृत्व एक साधारणतः विशीतली मुलगी करत होती. खरं तर पोलिसांवर दगड फेकणारी मुलगी हा काही तीचा भूतकाळ नव्हता, भविष्य देखील नाही. कारण या घटनेपूर्वी देखील ती फुटबॉल खेळायची, परंतु तोपर्यंत काही तिचं नांव काश्मीर खोऱ्यापलीकडे कुणाला फारसं माहित नव्हतं. मात्र अचानक एक असा प्रसंग घडला की काश्मीर खोऱ्यातील दगडफेक करणाऱ्या महिलांची ‘पोस्टर गर्ल’ म्हणून ती ओळखली जाऊ लागली होती. माध्यमांनी एका घटनेवरून रंगवलेल्या प्रतिमेमुळे तीच्या फुटबॉलमधील कामगिरीवर आणि योगदानावर अक्षरशः पाणी फेरल गेलं. पण या मुलीने धाडसाने या परिस्थितीचा देखील सामना केला आणि एका घटनेमुळे झालेली ‘दगड फेकणारी मुलगी’ ही आपली प्रतिमा धुवून टाकत जम्मू काश्मीरमधील युवतींसाठीची प्रेरणास्थान आणि जम्मू काश्मीरमधील महिला फुटबॉलचा चेहरा म्हणून समोर आलीये.
‘आफशा आशिक’ तीचं नांव.
जम्मू काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कॅप्टन आणि गोलकीपर असणारी आफशा जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहिली महिला फुटबॉल प्रशिक्षक देखील आहे. जम्मू काश्मीरमधील लहान मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्याचं काम देखील ती करते.
आफशा एका पारंपारिक मुस्लीम कुटुंबातली मुलगी. तीला लहानपणापासूनच फुटबॉलची आवड होती आणि याच खेळात ती स्वतःच भवितव्य बघत होती. फुटबॉल खेळण्यासाठी ज्यावेळी कुटुंबाकडे परवानगी मागितली त्यावेळी कुटुंबीयांनी स्पष्ट शब्दात नकार कळवला. मुलांचा खेळ तुला कशाला खेळायचाय असा कुटुंबियांचा थेट सवाल. पण आफशा काही हार मानणाऱ्यातली नव्हती. कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता तीने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. फुटबॉल खेळण्यासाठी काश्मीर खोऱ्यात, त्यातही एका मुलीसाठी वातावरण किती प्रतिकूल असू शकतं, याची आपण कल्पना केलेलीच बरी. पण अशाही परिस्थितीत ती खेळत होती, मुलांच्या संघासोबत सराव करत होती.
आफशाचं फुटबॉलप्रतीचं पॅशन बघून शेवटी कुटुंबियांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनीही आपल्या मुलीच्या स्वप्नपूर्तीच्या पंखांना बळ देण्यासाठी तीची साथ द्यायचं ठरवलं. तोपर्यंत जम्मू काश्मीर खोऱ्यात फुटबॉलर म्हणून तीचं नांव व्हायला लागलं होतं. ती स्वतः तर फुटबॉल खेळत होतीच, पण त्याचवेळी तीने इतर मुलांना फुटबॉल प्रशिक्षण द्यायला देखील सुरुवात केली होती.
दगडफेक प्रकरण
“एके दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन फुटबॉलच्या मैदानावर सरावाला चालले होते. त्यावेळी एक जमाव पोलिसांवर आधीपासूनच दगडफेक करत होता. अशावेळी पोलिसांनी आम्हाला देखील आडवलं आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही दगडफेक करणाऱ्या जमावातील नसून फुटबॉल खेळायला चाललो आहोत, हे सांगून देखील पोलीस ऐकायला तयार नव्हते. एका पोलिसाने तर सोबतच्या एका विद्यार्थिनीला तोंडात चापट मारली. अशावेळी मला देखील राग आला होता, मला शांत बसणं शक्य नव्हतं त्यामुळे मी याविरोधात भूमिका घ्यायचं ठरवलं” माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आफशा सांगत होती.
पुढे बोलताना आफशा सांगते की, “विरोध प्रदर्शनाला जाताना माझी विद्यार्थिनी मला सांगत होती की यामुळे माझी प्रतिमा खराब होईल. पण यावेळी मला माझ्या प्रतिमेपेक्षा भूमिका घेणं महत्वाचं वाटत होतं. माझ्या विद्यार्थिनींसाठी आणि फुटबॉलसाठी देखील ही भूमिका घेणं गरजेचं होतं. आम्ही विरोध प्रदर्शनात सहभागी झालो आणि त्यातच हे दगडफेक प्रकरण झालं. त्यावेळचा माझा दगडफेक करतानाचा फोटो माध्यमांमध्ये प्रकाशित झाला आणि माझं चित्र ‘दगडफेक करणारी मुलगी’ म्हणून देशभरात रंगवलं गेलं. वास्तविक पाहता मी त्यापूर्वी देखील कधी दगडफेक केली नव्हती आणि त्यानंतर देखील कधी दगडफेक केली नाही. परंतु माध्यमांना मात्र ते तसं चित्र रंगवण्यातच अधिक रस होता. माझा प्रवास कधीच ‘स्टोनपेल्टर ते फुटबॉलर’ असा नव्हता. मी आधीही फुटबॉलर होते आणि आताही फुटबॉलरच आहे.”
काश्मीर खोऱ्यातील फुटबॉलच्या प्रसारासाठी प्रयत्न
याप्रकरणानंतर काही दिवसात तीने काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली आणि काश्मीर खोऱ्यातील मुलींच्या फुटबॉलसाठी अधिकाधिक सुविधा पुरविण्याची विनंती केली. त्यावेळी देखील ‘पोलिसांवर दगडफेक करणारी मुलगी’ अशी प्रतिमा होऊनही या प्रकरणातील आपल्या भूमिकेवर ती ठाम राहिली आणि आपलं फुटबॉल प्रशिक्षणाचं काम देखील तीने सुरूच ठेवलं. पुढच्या काही दिवसातच ती जम्मू काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार देखील झाली आणि तीच्याच नेतृत्वात प्रथमच जम्मू काश्मीरच्या संघाने ‘नॅशनल वूमन लीग’मध्ये भाग घेतला. जम्मू काश्मीरमध्ये महिला फुटबॉल आणि एकूणच क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी ती सध्या प्रयत्न करतेय. या भागातील खेळाडूंचे प्रश्न घेऊन आफशाने गेल्या वर्षी आपल्या २३ खेळाडूंसह दिल्लीत जाऊन गृहमंत्री राजनाथ सिंग यांची देखील भेट घेतली. राजनाथ सिंग यांनी देखील तीच्या प्रयत्नांची दखल घेऊन या मुलींना खेळात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेण्याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना फोन करून सूचना दिल्या होत्या.
लवकरच येतोय नवीन चित्रपट
आफशाच्या या संपूर्ण प्रवासावर ‘होप सोलो’ नावाचा बॉलीवूडपट देखील येऊ घातलाय. ‘होप सोलो’ ही अमेरिकन फुटबॉलर असून सद्यस्थितीत ती महिला फुटबॉलमधील सर्वोत्तम गोलकीपर समजली जाते. मनीष हरिशंकर हे हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून प्रसिद्ध अभिनेते गुलशन ग्रोवर आणि त्यांचा मुलगा संजय ग्रोवर हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. ‘अथिया शेट्टी’ ही या चित्रपटात आफशाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात भूमिका करण्याविषयी आफशाला देखील विचारण्यात आलं होतं, परंतु ही ऑफर तीने नाकारली. ती संपूर्ण लक्ष फुटबॉलवरच देऊ इच्छिते. भविष्यात भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळणं हेच आपलं स्वप्न असल्याचं ती सांगते.