पॉलिटिकल कनेक्शन आणि डोकॅलिटीमुळे अदानींच्या साम्राज्याचा कोहिनूर ‘मुंद्रा बंदर’ उभं राहिलं

मुंद्रा पोर्ट पुन्हा चर्चेत आलं आहे. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने मिठाच्या खेपेत लपवून ठेवलेले सुमारे ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्राम कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे. याआधी १३ सप्टेंबर रोजी गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून सुमारे ३,००० किलोग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले होते. ज्याची किंमत सुमारे २०,००० कोटी रुपये होती असं सांगण्यात येत होतं.

मुंद्रा बंदर हे भारतातील सगळ्यात मोठं बंदर आहे. न्हावा शेवा बंदराशी याचा क्रमांक खाली वर होत असतोय मात्र पहिल्या दोन मध्ये तर हे बंदर असतंय. पण सर्वात मोठे बंदर एवढंच या बंदरांची ओळख नाहीये.

मुंद्रा पोर्ट हा भारतातल्या सगळ्यात श्रीमंत माणूस असलेल्या गौतम अदानी यांच्या मालकीचा आहे ही याची खरी ओळख आहे.

अदानींच्या साम्रज्याचा कोहिनूर म्हणून आज मुंद्रा पोर्टची ओळख आहे. नुसता पोर्टच नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर, पॉवर या सर्व क्षेत्रात अदानींना मक्तेदारी निर्माण करणं शक्य झालंय ते या मुंद्रा बंदरामुळे.

तर बघूया गोष्ट अदानींच्या साम्रज्याचा कोहिनूरची..

या गोष्टीची सुरूवात होते ८० च्या दशकामध्ये. वडिलांना बिझनेसमध्ये मदत न करता शिक्षण अर्ध्यात सोडून गौतम अदानी यांनी मुंबई गाठली. यावेळी त्यांचे वय १८ वर्षे होते. याकाळात ते लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करायचे. पुढे हिर्‍याच्या व्यवसायात उतरले. वयाच्या अवघ्या २० वर्षी अदानींनी मुंबईत स्वत:चा डायमंड ब्रोकरेजचा बिझनेस सुरु केला होता.

पण पुढे आपल्या मोठ्या भावाच्या आग्रहावरून गौतम अदानी पुन्हा गांधीधामला परत आले. तिथे त्यांनी प्लास्टिक फॅक्टरीत काम करायला सुरुवात केली. पण त्या व्यवसायावर खूप मर्यादा होत्या. त्यावेळी अदानींना महिन्याला २० टन पीव्हीसीची गरज होती. पण त्यावेळी भारताचं पेट्रोकेमिकल महामंडळ हे पीव्हीसीचं एकमेव निर्यातदार होते आणि ते एकावेळी केवळ २ टनापर्यंतच निर्यात करत होते.

अदानी यांनी इथली संधी ओळखली आणि १९८८ मध्ये कांडलामार्गे स्वतः प्लॅस्टिकच्या आयातीला सुरूवात केली.

‘कुछ नया करते हैं’ असं सातत्यानं म्हणत गौतम अदानी आव्हान स्विकारायचे आणि यशस्वी पण करायचे. अदानी यांच्या या उद्योगामुळे ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. नेते मंडळी, राजकारणी लोकांच्यासोबत उठ-बसं सुरु झाली.

विशेषतः त्यावेळी ते काँग्रेसचे तेव्हाचे दिग्गज नेते चिमणभाई पटेल आणि केशूभाई पटेल यांच्याशी जवळीक वाढली.

याकाळात गौतम अदानी यांना पायाभूत सुविधा उभारणी उद्योगात पडण्याची महत्त्वाकांक्षा तयार झाली. त्यांनी बंदर उभारणीचा बराचं अभ्यास केला. योगायोगाने त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल होते आणि त्यांच्याकडे बंदर हे खात होते. अदानी यांनी त्यावेळी चिमणभाईंकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला.

अखेरीस १९९१-९२ साली चिमणभाई पटेल सरकारने कच्छ किनारपट्टी जवळील ३ हजार एकर जमीन अदानी आणि शेती उद्योग करत असलेल्या कारगिल समूह यांना संयुक्तरित्या मिठाच्या उत्पादनासाठी देऊ केली.

मात्र त्याच वेळी तिथं कामगारे नेते जॉर्ज फर्नाडिस यांचा एक संप झाला आणि या प्रकल्पामधून कारगिलने माघार घेतली. अदानी मात्र प्रकल्पावर कायम राहिले. कांडला आणि मुंबई बंदरांवर होणाऱ्या विलंबामुळे अदानी समूहाला वर्षाकाठी ८-१० कोटी रुपयांचा तोटा होत होता. याला  कंटाळून अदानींनीं मुंद्राचे खाजगी बंदरात रूपांतर करण्याचा विचार सुरू केला. १९९१ मध्ये उदारीकरण सुरू झाले. झालेच होते. 

या सगळ्यांचा फायदा घेत  १९९८ मध्ये मुंद्रा येथे पहिले जहाज दाखल झाले.

कच्छ किनारणपट्टीवर तग धरून राहणं अदाणींना चांगलंच फायद्याचं ठरलं आणि याला जोड मिळत गेली अदाणींच्या राजकीय पक्षांशी जवळीक साधण्याच्या स्किलची. याचा सर्वात जास्त फायदा झाला लाखो एकर जमीन मिळवण्यात. या जमिनींमुळे अदानींनी बंदराच्या बाजूला स्पेशल इकॉनॉमिक झोन देखील उभारलं आहे

काँग्रेस असू दे की भाजपा अदाणींना मागेल तशी जमीन मिळत गेली.

त्यांना १९९३ मध्ये काँग्रेसच्या  चिमणभाई पटेल सरकारकडून आणि नंतर १९९४ मध्ये शंकरसिंह वाघेला यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस  सरकारकडून मुंद्रा येथे पडीक जमीन मिळाली. त्यानंतर १९९९ मध्ये केशुभाई पटेल आणि २००५ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून अदाणींना जमीन मिळत गेली.

मुंद्रा इथं अदाणींना सगळ्यात जास्त जमीन नरेंद्र मोदी यांच्या काळात मिळाली.

२००५ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने ५५९० हेक्टर  म्हणजेच १३८१३ एकर जमीन १४.५० पर स्केअर फूट भावाने अदाणींना दिली. अदानी समुहाचे अधिकारी सांगतात की अदानी पोर्ट आणि सेझ आता जिथे आहे तो संपूर्ण भाग पूर्णपणे नापीक होता.

मोदींच्या काळात अगदी १ रुपया ते ३२ रुपये प्रति चौरस मीटर दराने मिळालेली जमीन इतर कंपन्यांपेक्षा खुपच कमी दराने मिळाली होती. 

अदाणींच्या तुलनेत राज्यांत इतर कंपन्यांना जेव्हा जमिनी देण्यात आल्या त्यांच्या दर अदानींना देण्यात आलेल्या जमिनींपेक्षा कित्येक पटींनी जास्त होता. टाटा मोटर्सला त्याच्या साणंद (अहमदाबाद जवळ) नॅनो कार प्लांटसाठी १११० एकर जागा प्रति चौरस मीटर ९०० रुपये या दराने, फोर्डला ४६० एकर जमीन ११०० प्रति चौरस मीटर दराने, मारुती सुझुकीला हंसलपूर येथे सुमारे ७०० एकर जमीन ६७० रुपये प्रति चौरस मीटर दराने देण्यात आली होती.

सवलतीच्या किंमतीव्यतिरिक्त, समूहाला भूसंपादनाच्या अडथळ्यांचा सामना करावा लागला नाही, कारण राज्याने अदानी बंदरासाठी बिगर कृषी सरकारी जमीन दिली आहे.

पण नुसत्या जमिनींसाठीच अदानी यांनी हे बंदर घेतलं नव्हतं. भारताच्या उत्तर-पश्चिम किनार्‍यावर कच्छच्या आखाताच्या तोंडावरील मुंद्राचे बंदराचे स्थान हे पश्चिम आशिया, आशिया, आफ्रिका इथून होणाऱ्या समुद्री वाहतुकीसाठी अत्यंत मोक्याचं आहे.

तसेच परदेशी व्यापाराचे केंद्र म्हणून काम करण्यासाठी मुंद्रा बंदर प्रमुख जागतिक सागरी व्यापार मार्गांजवळ आहे.

मुंद्राचं स्थान अजून एका कारणासाठी मोक्याचं आहे ते म्हणजे भारताच्या उत्तर आणि उत्तर पश्चिम भागातील जमिनीने वेढलेली राज्ये ज्यांना समुद्र लागून नाहीये त्यांच्यासाठी मुंद्रा एक महत्वाचं बंदर आहे. कच्च्या तेल, कोळसा, खते, अन्नधान्य आणि कंटेनर कार्गो यांसारख्या वस्तूंमधील भारतातील सुमारे अर्धा व्यापार हा उत्तर आणि वायव्य भारतातील मालवाहू केंद्रांद्वारे केला जातो ज्यामध्ये दिल्ली, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब ,उत्तर प्रदेश आणि याचा सर्वाधिक फायदा मुंद्रा बंदराला होतो.

अदानींनी स्वतः देखील या बंदराच्या गुणवत्तेकडे लक्ष दिलं आहे. 

बंदर म्हणून,मुंद्रा हे देशातील सर्वात खोल बंदर आहे.

बंदरामध्ये  १७.५ मीटर पाण्याची खोली आहे त्यामुळं इथं मोठी व्यापारी जहाजं  ज्यांना कॅप्साइज जहाजं म्हणतात ती सहज उतरवता येतात. कॅप्साइज जहाजे १,७५,००० हजार टनांनपर्यंत माल हाताळू शकतात. कोळसा ,लोखंड, पोलाद, धान्य यांसारख्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होणाऱ्या गोष्टींसाठी ही जहाजं महत्वपूर्ण असतात. केंद्र सरकारच्या मालकीच्या बंदरांपैकी फक्त विशाखापट्टणम हेच बंदर मुंद्रासारखं अशी कॅप्साइज जहाजं  हँडल करू शकतंय. त्यामुळंच कांडला सारखं सरकारी बंदर शेजारी असताना देखील मुंद्रा बंदरात नेहमी रहदारी राहते.

त्याचबरोबर खाजगी बंदर असल्याने मुंद्रा बंदराच्या फी अदानी  बाजाराच्या ट्रेंडनुसार कमी जास्त होऊ  शकतात. त्यामुळं मागणी नसेल तर स्वस्तात आणि मागणी जास्त असेल दर वाढवून सेवा देणं खाजगी बंदरांना शक्य आहे.

जेव्हा अदानी बंदर उभं राहत होतं ते रेल्वे लाइनशी कनेक्ट नव्हत. मग अदानींनी स्वतःच्या पैश्याने ६४ किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक उभारला आणि मुंद्रा जवळची रेल्वे लाइन असलेल्या आदिपूरला जोडला.

या सर्व कारणांमुळेच मुंद्रा बंदर हे भारतातील सगळ्यात मोठं बंदर असलेल्या न्हावाशेवाच्या जवाहरलाल नेहरू पोर्टल टफ फाईट देत असतं.

२०२१ मध्ये तर जेएनपेटी पोर्टला मागे टाकत मुंद्रा भारतातलं सगळ्यात मोठं कंटेनर पोर्ट ठरलं होतं. २०२१ च्या आर्थिक वर्षात मुंद्रामधून ७.२२ दशलक्ष ट्वेन्टी फूट इक्विव्हॅलेंट युनिट (TEU) वाहतुक झाली होती. तर जेएनपीटीने ४.६८ दशलक्ष टीईयू हाताळले होते.

जसं जसं बंदर उभा राहत होतं त्याचा फायदा अंबानींना बाकी व्यवसायात देखील झाला.

अदानींना कोळसा, लोहखनिज आयात करण्यासाठी स्वतःच हक्काचं बंदर मिळालं. त्यामुळं त्यांना अदानी पॉवरचा विस्तार करण्यास मदत झाली. अगदी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अदानी खाणी विकत घेऊ लागले. बंदर बांधणीचा फायदा अदानींना त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या उभारण्यात झाला.

सुरवातीला ६४ किलोमीटर रेल्वे लाइन उभारणाऱ्या अदाणींकडे आज ३०० किलोमीटर रेल्वे लाइन आहे.

अदानींचा बंदर व्यवसायातील मुंद्रा पोर्टपासून सुरु झालेला प्रवास आता अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीपर्यंत आला आहे.

 या कंपनीकडे आज भारतातील १२ बंदरं आहेत.

अदानींचा मुलगा करण अदानी हा या कंपनीचा सीईओ आहे. २०३० पर्यंत या कंपनीला जगातील टॉपची पोर्ट कंपनी बनवण्याचं लक्ष करण अदानी यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळं अदानी यांच्या बिझनेस वाढीचा वेग पाहता हे लक्ष काय अवघड वाटत नाही.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.