कॉलर ताठ करा, सगळं जग वापरतंय त्या फोटोशॉपचा CEO पण भारतीयच आहे

ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल या भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाली आणि सोशल मीडियावर एकच गलका झाला. आता साहजिकच आहे भिडू, एखादी भारतीय व्यक्ती मोठ्या पदावर जातीये म्हणल्यावर कॉलर जरा टाईट होणारच की. बरं कंपनीही काय साधी नाही, जगातले सगळे ट्रेंड जिथं घडतात बिघडतात त्या ट्विटरमधली महत्त्वाची खुर्ची आपला भारतीय माणूस सांभाळणार याचा आनंद ओसंडून वाहिला.

तुम्ही जरा बातम्या निरखून वाचत असाल किंवा तुमचं ब्रेकिंग न्यूजच्या पलीकडं लक्ष असेल, तर तुम्हाला हे माहितीच असेल की, एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचा सीईओ भारतीय माणूस झाल्याची ही काय पहिलीच वेळ नाही. याआधीही भारतीयांनी मोठमोठी पदं भूषवली आहेत आणि कंपन्यांना पुढं नेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

ही गोष्ट अशाच एका सीईओची आहे, ज्याच्या प्रवासाची सुरुवात झाली हैदराबादमधून आणि प्रवास पोहोचला थेट बराक ओबामांसोबत काम करण्यापर्यंत. विशेष म्हणजे एवढी मोठी मजल मारूनही त्यांनी भारतासोबत असलेली नाळ तोडलेली नाही.

फोटोशॉप या सॉफ्टवेअरबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. कुणाचा फोटो गोऱ्याचा काळा करायचा असेल, कुणाचा काळ्याचा गोरा करायचा असेल, कुणाला बारीक करायचं असेल, तर कुणाला जाड. फोटोशॉपवर सगळं शक्य होतंय. फोटोशॉप सोबतच लाईटरूम, आफ्टरइफेक्ट, फ्रेममेकर, प्रीमिअर प्रो अशी अनेक सॉफ्टवेअर आपल्यापैकी कित्येक जण वापरतात. हे सगळे सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी म्हणजे ॲडॉब.

फोटोशॉपशिवाय कॉलर टाईट होण्याची गोष्ट म्हणजे, या ॲडॉबच्या सीईओ पदाची खुर्ची सांभाळणारा माणूस भारतीय आहे. त्यांचं नाव शंतनू नारायेन. गेली १४ वर्ष ते ॲडॉबचे सीईओ म्हणून काम पाहत आहेत.

नारायेन मूळचे हैदराबादचे. त्यांच्या वडिलांचा प्लॅस्टिकचा बिझनेस होता. आपल्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवावं हा त्यांचा निर्णय आधीपासूनच ठरलेला. कारण हैदराबादच्या शाळेत शिकल्यानंतर, इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेण्यासाठी ते अमेरिकेत गेले. तिथंच त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली. इतर स्थलांतरितांचं असतं, बऱ्यापैकी तसंच आयुष्य नारायेन यांचं होतं.

त्यांनी ॲपलमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर, स्विच मारत सिलिकॉन ग्राफिक्समध्ये डायरेक्टर म्हणून काम केल्यावर; त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पिक्ट्रा कंपनी स्थापन केली. पुढं त्यांनी आणखी मोठा स्विच मारला आणि ॲडॉब कंपनीचे वाईस प्रेसिडेंट म्हणून जबाबदारी स्वीकारली.

त्यांचं काम इतकं पॉवरफुल होतं, की पुढच्या दहा वर्षांत त्यांच्यावर सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली. २००७ मध्ये ते ॲडॉबचे सीईओ झाले आणि त्यांनी ॲडॉबला सर्वदूर पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. ॲडॉबला फायदा करून देणारे जवळपास ३०० करार त्यांनी ‘क्रॅक’ केले.

ॲडॉबसोबतच, त्यांनी डेल आणि फायझर कंपनीमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मॅनेजमेंट ॲडव्हायझरी बोर्डावरही नारायेन यांनी काम केलं आहे.

विशेष म्हणजे अनेक पुरस्कार, मोठमोठ्या याद्यांमध्ये आलेलं नाव यापलीकडे जाऊन नारायेन यांनी दोन गोष्टी जपल्या आहेत. त्या म्हणजे क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि भारताशी जोडली गेलेली नाळ. अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. सोबतच सेलिंग खेळात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्वही केलं आहे.

याचवर्षी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ॲडॉब भारताच्या डिजिटल इंडिया प्रकल्पात मदत करेल असं सांगितलं. सोबतच भारतीय मुलांपर्यंत ॲनिमेशनद्वारे वेगवेगळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं.

थोडक्यात काय तर भविष्यात ॲडॉबनं भारतातल्या चिमुकल्यांसाठी एखादा भारी प्रकल्प सुरू केला, तर हरखून जाऊ नका. कारण, कंपनी फॉरेनची असली तरी प्रेसिडेंट आणि सीईओ मात्र आपल्या भारतीय माणूसच आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.