आजही चेन्नईच्या रेड लाईट एरियात ‘ऑटो शंकरची’ दहशत आहे
वर्ष १९८७-८८, चेन्नईतून ९ तरुण मुली बेपत्ता झाल्या होत्या. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. गायब झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती, परंतु पोलिसांकडून कसलीच मदत मिळत नव्हती. उलट मुली स्वतःच पळून गेल्यात असं सांगून पोलीस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते.
अशात गायब झालेल्या मुलींपैकी एक मुलगी कशीबशी जीव वाचवून पळाली आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. या मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाची चौकशी केली आणि त्यातून जे समोर आलं ते भयंकर होतं.
गुन्हेगारी जगतातील एक क्रूर चेहरा लोकांच्या समोर आला होता. सहा महिन्यात या माणसाने मद्रासला स्मशानभूमीत परावर्तीत केलं होतं.
‘ऑटो शंकर’. खरं नांव ‘गौरी शंकर’ पण ऑटो चालवायचा म्हणून त्याचं नांव पडलं ऑटो शंकर.
प्रकरणात जसजशी चौकशी होत गेली तसतशी ऑटो शंकरची कृष्णकृत्ये बाहेर येऊ लागली. तो तरुण मुलींचं अपहरण करत असे. त्यांच्यावर बलात्कार करत असे. बलात्कारानंतर त्या मुलींना एक तर आपल्या कुंटणखाण्यावर काम करण्यासाठी तयार करत असे किंवा तसं नाही झालं तर तो त्यांना जिवंत जाळून टाकत असे. मृतदेह जमिनीत किंवा भिंतीत पुरून टाकत असे किंवा समुद्रात फेकून देत असे.
‘गौरी शंकर’ असं शिवाचं दुहेरी नांव धारण करणारा हा माणूस सुरुवातीला तामिळनाडूतील पेरियार नगर मध्ये पेंटर म्हणून काम करत असे आणि तो चित्रपटांचा मोठा शौकीन होता. पुढे तो ऑटो चालवायला लागला.
याच दरम्यान तामिळनाडू सरकारने दारूबंदी केली होती. कुठल्याही वस्तूवर बंदी आणली की त्या वस्तूची स्मगलिंग वाढते हा आजपर्यंतचा अनुभव तामिळनाडूमध्ये देखील तेच झालं. स्मगलिंगमध्ये मिळणाऱ्या पैशाने शंकरला आकर्षित केलं आणि तो आपल्या ऑटोमधून दारूची तस्करी करू लागला. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी हा सुरक्षित उपाय होता.
दारूच्या तस्करीत ऑटो शंकरने आपलं बस्तान बसवलं होतं. त्याने आपली एक गँग देखील बनवली होती. या गँगमध्ये त्याचा छोटा भाऊ ऑटो मोहन देखील त्याच्या सोबत होता. अजून काही साथीदार होते. दारूच्या तस्करीत जम बसविल्यावर आता ही गँग वैश्या व्यवसायात देखील उतरली होती. एका हॉटेलमध्ये त्याने आपला कुंटणखाना सुरु केला होता. पेरियार नगर आणि मद्रासमधील एलबी रोडवरील लॉजमध्ये तो हा कुंटणखाना चालवत असे.
पोलिसांच्या सहकार्याशिवाय या गोष्टी करणं शक्यच नव्हतं. अर्थात अनेक पोलीसवाल्यांना तसच राजकारण्यांना त्यानं खिशात घातलं होतंच. अनेकवेळा त्याचे ग्राहक हे मुख्यत्वे पोलीस आणि राजकारणीच असत. एकूणच काय तर या दोहोंच्याही कृपाशीर्वादाने त्याने या धंद्यात आपला जम बसवला होता.
१९८८ साली मुली गायब होण्याच्या प्रकरणात तो पहिलांदा पोलिसांच्या ताब्यात आला. त्यावेळी देखील सुरुवातीला पोलिसांनी प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला होता, पण त्यावेळी तामिळनाडूमध्ये राष्ट्रपती शासन लागू होतं. अर्थात प्रशासकीय यंत्रणा राज्यापाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या ताब्यात होती. गायब झालेल्या मुलींचे कुटुंबीय ज्यावेळी पी.सी. अलेक्झांडर यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रकरणाच्या चौकशी खास टीमकडे सोपवली.
ऑटो शंकर पकडला गेल्यानंतर त्याने पोलिसांसमोर आपल्या कृष्णकृत्यांची कबूली दिली. यामध्ये ६ खुनांची जबाबदारी त्याने स्वीकारली. पेरियार नगर परिसरात पोलिसांना भिंतीत गाडलेले मृतदेह मिळाले.
शंकरच्या घरातून एक डायरी मिळाली ज्यातून त्याचे अनेक पोलिसांशी असलेले संबंध समोर आले. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अटक केल्यानंतर त्याला मद्रास सेन्ट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, पण तिथून देखील त्याने पोलिसांच्या मदतीने धूम ठोकली. पुढे पोलिसांनी त्याला ओडिशामधून अटक केली. पळून जाण्यात त्याला मदत करणाऱ्या पोलिसांना देखील सजा देण्यात आली.
न्यायालयाने त्याला फाशीची सजा सुनावली. त्याने दयेचा अर्ज केला मात्र तो फेटाळण्यात आला. एप्रिल १९९५ मध्ये त्याला फासावर लटकाविण्यात आलं.
हे ही वाच भिडू.
- उपहार थिएटरच्या अग्नीकांडात अनेक जवानांना जीव गमवावा लागला होता
- दिव्या भारतीने आत्महत्या केली होती की तिचा खून झाला होता?
- एका रुमालाने ९३१ लोकांची हत्या करणारा ‘ठग बेहराम’.
Res sir,
Krushnakrutya Ha Shabd Vaparne Tala
With regard
Sunil Nillewar
9890397033