कर्जबाजारपणामुळे त्यांनी स्वत:ला संपवलं, अस आपण म्हणत असू तर आपण मुर्ख आहोत..

CCD चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह अखेर मिळाला. काल त्यांनी नेत्रावती नदीच्या परिसरातून बेपत्ता झाल्याच सांगण्यात आलं होतं. या ठिकाणाहून काहीच अंतरावर पोलीसांना त्यांचा मृतदेह मिळाला. CCD  हा तोटात गेलेला ब्रॅण्ड आहे, वाढती स्पर्धेत CCD टिकू शकला नाही अशा चर्चा माध्यमांमधून रंगल्या. अखेर माध्यमांनी देखील सिद्धार्थ यांचा उल्लेख CCD या ब्रॅण्डभोवतीच केला. कॉफी शॉप ओपन करण्याची एक कल्पना म्हणून त्यांच उल्लेख केला जावू शकतो, 

पण व्हि. जी. सिद्धार्थ इतक्यापुरतेच मर्यादित नव्हते. तोट्यात जावून आत्महत्या केलेला उद्योजक म्हणून त्यांना आपण लक्षात ठेवणार असू तर आपणच मुर्ख ठरू. भारतात कॉफी शॉप चा प्रकार सुरू करणारा उद्योजक आणि भारताची कॉफी जगाच्या मार्केट मध्ये विकू शकणारा उद्योजक म्हणून आपण सिद्धार्थ यांना लक्षात ठेवायला हवं, म्हणूनच बोलभिडू वाचकांसाठी हा लेख. 

कर्नाटकत पश्चिम घाटामध्ये असणारं चिकमंगळूर हे कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इथेच सुमारे दिडशे वर्षांपासून कॉफीचं उत्पादन करणाऱ्या श्रीमंत कुटूंबात सिद्धार्थ यांचा जन्म झाला. सिद्धार्थ यांच्या घरचा व्यवसायचं कॉफी उत्पादनाचा. घरची श्रीमंती आणि चांगला चालणारा व्यवसाय. सिद्धार्थ यांनी मंगलोर विद्यापीठातून मास्टर्स केलं आणि स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याच्या हेतूने मुंबई गाठलं.

J.M. Financial लिमिटेड मध्ये त्यांनी इंटर्न म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांच वय होतं २४ वर्ष. दोन वर्षांचा अनुभव घेतला आणि बंगलोर गाठलं. स्वत:च काहीतरी करायचं म्हणून वडिलांकडून ३० हजार रुपये घेतले आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक केली. वेटूवेल्थ या कंपनीसोबत भागिदारी करत पहिल्यांदा स्वत:च्या उद्योगात पाऊल टाकलं. 

१० ते १५ वर्ष त्यांनी एन्व्हेस्टर म्हणून स्वत:च नाव कमावलं. उत्तम उद्योजक म्हणून माणसं त्यांच्याकडे गुतंवणूक करु लागले. घरची श्रीमंती सिद्धार्थ यांच्या चौकटीबाहेरच्या व्यवसायामुळे वाढली होती. त्याच काळात घरातल्या मुळच्या व्यवसायात देखील काहीतरी वेगळं कराव अस वाटत होतं. 

त्या काळात कॉफीच्या आयात निर्यातीवर मोठ्ठे निर्बध होते. भारतीय मार्केट खुलं झालेलं नव्हतं. शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका कॉफी उत्पादनाकांना बसत असे. एकतर भारतात कॉफी पिण्याच प्रमाण तितकं मोठ्ठ नव्हतं आणि दूसरी गोष्ट कॉफीच्या निर्यातीवर असणारे निर्बंध. या दोन्ही कारणामुळे कॉफीचे उत्पादक खूपच कमी पैसै मिळवत असत. 

अशा वेळी कॉफीवरचे निर्बंध शासनाने उठवायला हवेत म्हणून त्यांनी पाठपुरावा करण्यास सुरवात केली.

दूसरीकडे कॉफीच्या मळ्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केली. एक एक करत हजारों एकरचे कॉफीचे मळे त्यांनी विकत घेतले. तरिही मुद्दा होता तो कॉफीच्या निर्यातीवर असणारे निर्बंध. 

मधल्या काळात सिद्घार्थ यांच लग्न माजी परराष्ट्र मंत्री आणि कर्नाटकचे माजी आमदार एस.एम. कृष्णा यांच्या मुलीसोबत झालं होतं. हातात असणारा पैसा देखील वाढला होता. राजकिय हितसंबध तयार झाले होते. या दरम्यान नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांनी खुले धोरण स्वीकारले होते. शेती संबधित उत्पादनांवरील आयात निर्यातीचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. तरिही कॉफीच्या निर्यातीवरचे निर्बंध उठवण्यात आले नव्हतेच.

योगायोगाने एक दिवस मनमोहन सिंग यांच्यासोबत सिद्धार्थ यांची भेट झाली.

त्या भेटीतच कॉफी उत्पादकांचे प्रश्न कॉफीला खुल्या बाजारपेठेत घेवून जाण्यासंबधी शासकिय अडचणींचा पाठा सिद्धार्थ यांनी मनमोहन सिंग यांच्यासमोर वाचला. सिद्धार्थ यांच मत ऐकून मनमोहन सिंग म्हणाले होते की, हा विषय मला इतक्या उशीरा का समजला. कॉफी उत्पादनकांचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे भारतालाच परकिय चलन मिळेल. 

त्यानंतरच्या घडामोडीत निर्णय घेण्यात आले आणि कॉफीच्या आयत निर्यातीचे प्रश्न मिटवण्यात आले. पक्के गुंतवणूकदार असणाऱ्या सिद्धार्थ कॉफीच्या मळ्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केली. एक एक करत त्यांनी १०,००० एकरहून अधिक कॉफीच्या मळ्यांमध्ये गुंतवणूक केली होती. अर्थव्यवस्था खुली झाल्याने त्यांना अपेक्षेहून अधिक फायदा झाला. 

१९९३ साली त्यांनी AMALAGAMATED BEAN COFFEE TRADING COMPANY या कॉफी एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीची स्थापना केली.  स्वत: उत्पादन केलेली ३००० टन आणि स्थानिक कॉफी मळेवाल्यांकडून घेतलेली २०,००० टन इतकी कॉफी एका वर्षात एक्स्पोर्ट करु लागली.

हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात चालू लागलं. बड्या उद्योगपतींच्या यादीत आत्ता सिद्धार्थ याच्या नावाचा उल्लेख केला जावू लागला. 

याच दरम्यान सिद्धार्थ यांच्या डोक्यात एक नवीन आयडिया आली. त्याच आयडियाचं फायनल आऊटपूट म्हणजे CCD अर्थात कॅफे कॉफी डे. 

सिद्धार्थ यांनी आपल्या डोक्यातील कल्पना आपल्या मित्राला बोलून दाखवली. तेव्हा त्या मित्राने हा प्लॅन कचऱ्याच्या पेटीत टाकण्याच्या लाइकीचा असल्याच सांगितलं. तो म्हणाला, जर एका हॉटेलमध्ये जावून पोटभर खावून पाच रुपयची कॉफी लोक पित असतील तर कुठल्यातरी हॉटेलमध्ये फक्त कॉफी पिण्यासाठी लोक का येतील. मित्राचं मत पटण्यासारखचं होतं. कारण त्यावेळी कॅफेची सुरवातच झाली नव्हती. अशी कोणती गोष्ट येणाऱ्या काळात मार्केटवर मोठ्ठा कब्जा मिळवेल हे देखील लोकांच्या ध्यानीमनी नव्हतं. 

सिद्धार्थ यांनी देखील बरीच सल्लामसलत करुन या आयडियाला केराची टोपली दाखवली. पण झालं अस की दरम्यानच्या काळात सिद्घार्थ बिझनेस मिटींगच्या संदर्भात युरोपमध्ये गेले. तिथे एका रेस्टोबारमध्ये ते बसले होते. त्यांना इटरनेटची आवश्यकता होती म्हणून ते एका बारमध्ये पोहचले. थंडगार बियर आणि सोबत इंटरनेट. इथं माणसं दिवसदिवसभर बसून होते. वाटलच तर कोणी बियरची ऑर्डर द्यायचा नाहीतर तसच बसून रहायचा. 

सिद्धार्थ यांच्या डोक्यात हेच बिझनेस मॉडेल सुरू झालं. आपल्याकडे कुठल्यातरी हॉटेलमध्ये गेलं की खालं की दूसऱ्या मिनटाला टेबल रिकामा करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी कामाशिवाय बसू नये ची पाटी असते. CCD ची मुळ आयड्या हिच होती की काम नसलं तरी बसावं. 

झालं त्यांनी पुन्हा आपल्या मित्राला हि आयडिया सांगितली. त्यासाठी भांडवल लागणार होतं दिड कोटी रुपये. हजारो टनांनी कॉफी एक्स्पोर्ट करणाऱ्या सिद्धार्थ यांच्यासाठी ती खूपच कमी रक्कम होती. गुंतवणूक करायचं ठरलं आणि १९९६ साली बंगलुरच्या बिग्रेड रोडवर पहिलं CCD सुरू झालं. 

कंपनीची पहिली पॉलिसी होती १०० रुपयात एक कॉफी आणि एक तास मोफत इंटरनेट. लक्षात घ्या तो काळ १९९६ चा होता. आज रिलायन्स जिओने ज्या प्रकारे मोफत इंटरनेट देण्याचा क्रांन्तीकारी निर्णय घेतला त्याहून अधिक मोठ्ठा हा निर्णय होता. बघता बघता तरुणांची पाऊलं CCD कडे वळली. चहा पिण्याहून कॉफी पिणं हे याच मार्केटमुळे प्रतिष्ठेच होवू लागलं. 

पण CCD चा म्हणावा तसा विस्तार झाला नाही. कंपनीकडूनच त्यासाठी हालचाली घेण्यात येत नव्हत्या. त्या दरम्यान कॉफी शॉपची हि आयडिया अनेकांनी चोरली. दूसऱ्या मातब्बर कंपन्या देखील कॅफेच्या या आयड्याचा विचार करु लागले. 

दरम्यानच्या काळात मोठमोठ्या कंपन्यानी यामध्ये बस्तान बसवलंच होतं. CCD ने अखेर मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. धाडसी निर्णय घेतल मोठमोठ्या प्रतिस्पर्धकांच्या आऊटलेट समोरच CCD सुरू करण्याच ठरलं आणि भारतात २५ CCD सुरू करण्यात आली. एका वर्षात पुढच्या एका वर्षातच CCD च्या फ्रन्चायझी घेण्यासाठी त्यांच्या दारात रांग लागली. एका वर्षात देशभरात CCD च्या पाचशेहून अधिक शाखा सुरू झाल्या. तो काळात CCD च्या सुरू होण्याचा वेग पाहिला तर भारतात दिवसाला दोन नवे CCD आऊटलेट सुरू होत होते. 

मोठमोठ्या शहरापुरत मर्यादित न राहता CCD जिल्ह्याच्या ठिकाणी आली. मोठ्या शहरांच्या बाजूला असणारी उपनगर टार्गेट करण्यात आली. कॉलेज कॅम्पस टार्गेट करण्यात आले. या CCD बसून अनेकांनी सिनेमाच्या स्टोऱ्या लिहल्या, याच CCD त बसून अनेकांनी पहिलं प्रपोज केलं, लग्नाचा निर्णय घेतला, दारू न पिता ब्रेकअप साजरं करण्यासाठी लोकांना शांततेत असणार CCD जवळच वाटलं. A Lot can happen over a coffee या टॅगलाईनला CCD पुर्णपणे जागलं. 

CCD बु़डलं का तर नाही. CCD ने कॅफे इन्फ्रिया विकत घेवून जगभर पाऊल टाकण्यास सुरवात केली होती ती २०१० साली. त्यानंतर जगभरात १८,००० CCD च्या शाखा असल्याचं सांगितलं गेलं. पुढे पुढे आर्थिक गणित फिसकटत गेली. फोर्ब्स च्या यादीत साठेआठ हजार कोटींची संपत्ती असणारे सिद्धार्थ अखेर आर्थिक संकटामुळे कोसळले.

पण इथचं मला अजून एका कॉफी शॉप बद्दल सांगू वाटतं,

मराठवाड्यातून पुण्यात जगायला आलेल्या मुलानं एक छोटं कॉफी शॉप टाकलं. दोन रुपये मिळण्याची खात्री नसलेल्या त्या मुलाने आज पुण्याच चार कॉफी शॉप तयार केली. मराठवाड्यातल्या त्या पोराला जगायची आयड्या देणारे सिद्धार्थ होते. त्यामुळच वाटतं आपण कर्जबाजारी पणामुळे त्यांनी आत्महत्या केली म्हणत असू तर आपण मुर्खच आहोत. 

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. sumit says

    Sir te dona mula kon aahit ani tyanchya cafe che nav kay aahi

Leave A Reply

Your email address will not be published.