वडिलांच्या खुनानंतर आईनं ज्युडो शिकायला पाठवलं, पोरीनं त्याच खेळात मेडल जिंकलं…

दिल्लीची राजौरी पोलीस चौकी, साधारण दुपारनंतरची वेळ, पोलिसांची रोजची कामं, गुन्हेगारांच्या चौकश्या, तक्रारदार, थोडक्यात इतर कुठल्याही चौकीत असतो अगदी तसाच माहोल. पण या सगळ्या गोंधळात त्या चौकीत एक लहान मुलगी असायची, कधी अभ्यास करत तर कधी खेळत.

शाळा सुटली की ही मुलगी थेट चौकीतच यायची आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर असलेल्या आपल्या आईची ड्युटी संपली की तिच्यासोबत घरी जायची. ही त्या मुलीच्या आयुष्यातल्या अनेक वर्षांची कहाणी.

त्या स्ट्रगलला काही वर्ष उलटून गेली, आता त्याच चौकीत वाढलेल्या मुलीनं देशासाठी कॉमनवेल्थ मेडल जिंकलंय.

ही गोष्ट आहे, तुलिका मानची.

सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तुलिकानं ७८ पेक्षा जास्त किलो वजनी गटात ज्युडो खेळात सिल्व्हर मेडल जिंकलंय. खरंतर तुलिका गोल्ड मेडल जिंकेल याची पूर्ण शक्यता व्यक्त करण्यात येत होती, मात्र फायनलमध्ये तिच्याकडून झालेले फाऊल आणि काउंटर अटॅक करण्यात आलेलं अपयश यामुळं तिचं गोल्ड हुकलं.

तुलिकानं जिंकण्याचं श्रेय आपल्या कोच आणि आईला दिलं, कारण तिच्या आईनं केलेल्या त्यागाशिवाय आज इतकी मोठी झेप घेणं तुलिकाला शक्यच नव्हतं.

तुलिकाचं कुटुंब दिल्लीचं. तुलिका साधारण १४ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा खून करण्यात आला. मोठं संकट कोसळलं होतं, ज्यातून तिच्या आईला एकटीला मार्ग काढायचा होता. तिची आई अमृता या राजौरी पोलिस स्टेशनमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून ड्युटीला होत्या. संकट कोसळलं असलं, तरी त्यांनी हार मानायची नाही असं ठरवलं.

रोज पहाटे उठून त्या तुलिकाला शाळेत सोडायला जायच्या, तिथून २० किलोमीटर प्रवास करुन पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये ड्युटीला हजर व्हायच्या. पण मुख्य प्रश्न होता, तो म्हणजे तुलिका दिवसभर कुठे राहणार ? घरी तिची काळजी घ्यायला कुणी नव्हतं, त्यामुळं तिच्या आईनं तिला आपल्यासोबतच पोलिस स्टेशनमध्ये थांबवायचं ठरवलं.शाळेतून थेट स्टेशनमध्ये येत, आईची ड्युटी संपेपर्यंत तुलिका तिथंच अभ्यास करत किंवा खेळत असायची. 

पण तिच्या आईला जाणवलं की, तिनं इथं गुन्हेगारांच्या आजूबाजूला राहणं बरोबर नाही. तिचा वेळ कुठंतरी चांगल्या ठिकाणी जावा म्हणून अमृता यांनी तुलिकाला ज्युडो शिकायला पाठवलं.

हळूहळू तुलिकाला ज्युडोची गोडी लागली, ती खेळात प्रगतीही करत होती. या मायलेकींनी ठरवलं की, तुलिकानं याच खेळात करिअर करावं. मात्र हे एवढं सोपं नव्हतं, ज्युडो हा कुस्तीप्रमाणंच ताकदीचा खेळ, त्यासाठी खुराकही दणकट हवा.

अमृता यांनी या गोष्टीतही हार मानली नाही, त्यांनी कर्ज काढली, कष्ट केले आणि पै-पै जमवून मुलीला पाठिंबा दिला.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘जर मी १० रुपये कमवत असेल, तर तुलिकाच्या तयारीसाठी मी ४० रुपये दिले. ३-४ कर्ज काढली, पेन्शन फंडमधून पैसे काढले. सगळ्या आयुष्याची कमाई मुलीच्या खेळासाठी लावली.’

या सगळ्या कष्टाचं पांग तुलिकानं कॉमनवेल्थ मेडल जिंकून फेडलं.

या विजयात तुलिकाचंही कौतुक करायला हवंच. एका वर्षाआधी तुलिकाचं वजन जवळपास ११५ किलो होतं. कॉमनवेल्थ गेम्ससाठी तिच्या नावाचा विचारही करण्यात आला नव्हता. मात्र तिनं ७८ किलो हून अधिक वजनी गटात खेळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, आपलं वजन कमी करत ८५-९० किलोपर्यंत खाली आणलं, आपल्याला स्थान मिळावं यासाठी लढली आणि स्पर्धेसाठी सज्ज झाली.

नॅशनल चॅम्पियन असलेल्या तुलिकाला यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये अनेक खडतर आव्हानांना सामोरं जावं लागलं, मात्र तिनं रुपेरी यश मिळवत आपल्या प्रयत्नांना, आईच्या कष्टांना न्याय दिला.

जरी तुलिका अपघातानं ज्युडोमध्ये आली असली, तरी तिच्या या यशामुळे कित्येक मुला-मुलींना ज्युडो खेळण्याची प्रेरणा मिळेल हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.