डी मार्ट खरच दाऊदचं आहे काय..? 

रिलायन्स, बिग बझार, स्टार बझार, मोर बझार, आधार… 

आले किती आणि गेले किती संपले भरारा. सगळ्या गावात असतोय डी मार्टचा दरारा. भारताच्या गेल्या दहा वर्षाचा इतिहास काढला तर स्टार बझार कोणे एकेकाळी बाप होतं. भरारा प्रत्येक गावात बिग बझार सुरू झालेले. रिलायन्सचं पण तसच. पण कोणालाच परवडलं नाही आणि हळुहळु करत प्रत्येकाने हात आखडते घेतले. टाटा ग्रुपचा स्टार बझार आणि बिर्ला ग्रुपच्या मोर बझारचा तर अक्षरश: बाजार उठला.  

पण या सगळ्या बाजारपणात एक बझार मात्र अजून टिकून आहे तो म्हणजे डी मार्ट. 

अंबानी सगळ्यात मोठ्ठा माणूस तरी रिलायन्स म्हणावा तसा चालला नाही. टाटा पण यात उतरलेले पण त्यांचा पण स्टार यात चमकू शकला नाही. बिर्ला मोर बझार घेवून या सेक्टरमध्ये उतरले पण ते देखील संपले. टाटा, बिर्ला, अंबानी यांसारखे रथीमहारथी इथे संपले. पण डी मार्ट टिकून राहिलं.

मग लोकं म्हणायला लागली, डी मार्ट दाऊदची कंपनी आहे.

टाटा, बिर्ला, अंबानीला टक्कर देतय म्हणल्यातर अफवा पचण्यासारखी होती. त्यात ब्रॅण्डच्या नावात डि होतं. डी वरुन D कंपनी आणि D कंपनी म्हणजे दाऊद. अफवा पसरवणाऱ्या व्यक्तिनं पहिल्यांदा डोकं लावलं असणार. त्यात बझार तर जोरात चालू होता. सगळ्यात स्वत: तर डी मार्टलाच द्यायला परवडायचं. काही लोकांना तर अस वाटायचं की दाऊद दुबईतनं माल उचलतोय आणि इंडियात आणून टाकतोय. 

च्या गावात आईशप्पथ सांगतो हि अफवा ऐकल्यानंतर पाठीमागं चार पाच बॉडीगार्ड घेवून, तोंडात सिगार ठेवून, डोळ्यावर गॉगल लावून डोळ्यापुढे येणारी दाऊदची इमेज संपली आणि तिथ मला गुजराती मारवाडी समाजातला दाऊदभैय्या दिसू लागला. 

तर हे सगळं का झालं कशामुळे झालं हे सांगितलच पण दाऊद आणि डिमार्ट हे समीकरण लय लोकांच्यात घुसलं. त्यानंतर इंटरनेटचा वापर वाढला. शहाण्या लोकांनी डी मार्ट वाल्याच नाव शोधून काढलं. पण इथपण एक गोची होती. त्या नावाचा माणूस आपणाला दूसऱ्या कुठल्याच बिझनेसमध्ये दिसत नव्हतां. तो काय करतो ते पण माहिती नव्हतं. मग परत असच वाटलं की,दाऊदनं काळा पैसा त्याच्याकडं दिला असणाराय. 

असो लय झालं आत्ता सांगतो डी मार्ट कुणाचं आहे ते. 

डी मार्टच्या मालकांच नाव आहे राधाकृष्णन दमानी. 

राधाकृष्णन दमानी हे इन्व्हेस्टर. ते स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावतात. स्टॉक मार्केटमध्ये कस असतं की समजा एखाद्या कंपनीचे शेअर घेतले आणि पैसे यायला लागले तर लगेच विकून मोकळं होणारी लोक असतात. दररोज डोळं फाडून फाडून स्क्रिनकडं बघतात आणि हिशोब लावून पैसे कमवतात. दूसऱ्या प्रकारची लोकं असतात ती राधाकृष्णन दमानी यांच्यासारखी. ती काय करतात तर लयलय अभ्यास करुन एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतात आणि कमीत कमी पाच वर्ष त्याच्याकडे ढुंकून बघत नाहीत.

आत्ता हिशोबात सांगायचं तर दमानी सायेबांनी HDFC बॅंकेचे शेअर्स घेतलेले तेव्हा त्यांची किंमत होती 10 रुपये. आज HDFC च्या शेअर्सची किंमत आहे 2220 रुपये. 1991 साली याच साहेबांनी VIS इंडस्ट्रिज लिमिटेडचे शेअर्स 20 ते 30 रुपये किंमतीने घेतले होते. त्याची आजची किंमत आहे 3330 रुपये. 

तर अस असतय सगळं. मारवाडीत एक म्हण आहे, 

वधारे वधारे लेवानू.. निचे जाता हे तो बेचवानू… 

सायबांच काम त्याच हिशोबावर चालत. कुठला शेअर्स वाढत जाईल याचा अचूक अंदाज त्यांना असतो. थोडक्यात सांगायच तर भारतातल्या स्टॉक एक्सेंज मार्केटमधले ते टॉम क्रुझ आहे. राकेश झुनझुनवाला देखील त्यांनाच गुरू मानतो. वयाच्या ३२ व्या वर्षी इच्छा नसताना ते या सेक्टरमध्ये आले आणि इतका मोठ्ठा पोर्टफोलियो बनवून बसले. 

पटत नसलं करी हेच आहेत ते, राधाकृष्णन दमानी.

तर मार्केटमध्ये पैसै लावणाऱ्यांच दूसरं तत्व असतं काही रक्कम रियल इस्टेटमध्ये गुंतवूण ठेवणं. जेणेकरून संपुर्ण मार्केट पडलं तर रियल इस्टेट रिकाम्या करून हा तोटा भरून काढता येईल. या सायबांनी पण तसच केल्याच सांगितल जातं.

त्यांनी मुंबई पुण्यासह छोट्यामोठ्या शहराच्या बाहेरच्या जागा घेवून ठेवल्या. ज्या पुढेमागे उपयोगाला येतील अस तत्व होतं. 

त्यानंतर २००२ साली आपण बझार काढू अस त्यांच्या मनात आलं. अॅव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड नावाची कंपनी त्यांनी सुरू केली. या कंपनीची ब्रॅण्ड म्हणजे डी-मार्ट. कंपनीच धोरण तेच बझार चालू करायचे. 

पहिला बझार मुंबईत उभा राहिला. हळुहळु करत एकामागून एक डी मार्ट ओपन होत गेले. त्या वेगाने बिग बझार वाढत होता त्याची तुलना करता डी मार्ट एकदम संथ गतीने वाढत होता. पण काही काळात डी मार्ट सगळ्यात पुढे गेला. टाटा बिर्ला सारख्या माणसांना आपले हात आखडते घ्यायला लागले पण हे कार्यकर्ते काय सुट्टी देत नव्हते. 

त्यानंतर काय झालं तर २२ मार्च २०१७ कंपनी नॅशनल स्टॉक इक्सेंजमध्ये रजिस्टर झाली. या कंपनीच ओपनिंग हे रेकार्ड ब्रेक ओपनिंग होतं. अस सांगतात की त्या दिवशी या साहेबांनी ६ हजार कोटींचा फायदा दोन दिवसात मिळवलेला. १६ सप्टेंबर २०१८ ला कंपनीच कॅपिटलायझेन होतं ९५ हजार कोटी. आज ती भारतातली ३३ व्या नंबरची कंपनी आहे. 

हे सगळं झालं कंपनी बद्दल पण खरा प्रश्न हा सतावतो की सगळे बझार बंद पडले आणि डी मार्ट कस इतक्या जोरात चालू राहिलं. तर त्यांची कारण खालच्या मुद्यात सांगतो. 

१) स्लॉटिंग फी :

स्लॉटिंग फि म्हणजे काय असतं तर समजा मला साबण विकायचा आहे तर माझी इच्छा असते तो साबण डि मार्ट सारख्या ठिकाणी विकला जावा. डि मार्ट वाल्यांनी माझा साबण घ्यायला मला स्लॉटिंग फि द्यावी लागते. तस केलं की डि मार्ट तुमच्या साबण त्यांच्या मार्टमध्ये ठेवतं. हे सगळेच करतात पण डि मार्ट इथं हूशार का आहे. तर सगळे स्लॉटिंग फि खिश्यात घालतात. डि मार्ट काय करतं तर स्लॉटिंग फि घेवून त्या रक्कमेचा डिस्काऊंट ग्राहकांनाच देत. त्यामुळ साबण आपोआप स्वत: होवून जातं. अस सगळ्यांचच असत. 

२) स्वत:ची मालमत्ता :

वरती सांगितलयच. डि मार्टवाले भाड्याच्या घरात रहात नाहीत. फ्रन्चायजी देत नाहीत. जिथंजिथं डि मार्ट दिसतात त्यातल्या ९० टक्के जागा डि मार्टवाल्यांनी विकत घेतल्यात. आत्ता इतका पैसा कुठून आणला. तर साहेबांनी आधीच जागा घेवून ठेवलेल्या. जसा जसा फायदा होत गेला तस जागा कामात आणत गेले. 

३) खर्च लय कमी ठेवला :

कधी अस झालय का की डि मार्टमध्ये गेलाय आणि चांगल चार तास मज्जा वाटत्या म्हणून बसून राहिलाय. असलं कधीच होणार नाही. डि मार्टमध्ये एखादी गोष्ट बघायला गेला तरी दूसऱ्या मिनटाला मे आय हेल्प यू म्हणतं  एखादी ललना देखील शेजारी येणार नाही. इतकच काय तर सगळं डि मार्ट वाल्यांनी सगळ सामान जवळ जवळ लावलेलं असतं. हिच खरी गोम आहे. जास्तीत जास्त माणसं येतील पाहीजे ते घेतील आणि जातील. लय वेळ रेंगाळणार नाहीत. स्टाफ कमी त्यामुळे पैसे वाचणार. अगदी लाईट पासून ते कलर पर्यन्त सगळीकडे डि मार्ट वाल्यांनी पैसे वाचवलेत. म्हणून बिग बझार तुम्हाला केसरी निळ्या कलरमध्ये दिसत तर डि मार्ट म्हणजे संपई पांढरा चुना मारल्यासारखी बिल्डिंग असते. 

४) डि मार्टला स्वस्तात माल कसा मिळतो कारण :

मार्केट कस असतय तर एखाद्या बझारला मी माल विकला तर ते मला महिन्यानंतर पेमेंट करतात. म्हणजे आमची डव्ह साबणाची कंपनी असते (आमची नाही, समजा फक्त) तर दूसऱ्या बजारला साबण विकले की ते महिन्यानंतर पैसे देतात. आणि डि मार्ट एका आठवड्यात पैसे देतं. आत्ता महिन्याचं व्याज तुम्हाला माहितच असतय. या लवकर पेमेंट करण्याच्या प्रोसेसमुळ काय होतं तर कंपन्या पैसै अडकून रहात नाहीत म्हणून त्यांना स्वस्तात माल विकतात. 

वॉरन बफेटच एक वाक्य आहे एक चांगला बिझनेसमॅन असायला तूम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्वेस्ट करायला पाहीजेत आणि चांगला इन्वेस्टर व्हायला तुम्ही चांगला बिझनेस उभा करायला पाहीजे राधाकृष्णन दमानी हेच करतात म्हणून ते त्यांच्या सेक्टरमधले दाऊदच ठरतात. 

हे हि वाच भिडू. 

4 Comments
 1. Vijay p Fatkare says

  D MART rules and regulations process follow is correct from stores reporting. Not compromise wrong decision & one by one labour is hard working. Successfully d mart futures planning is correct progress.

 2. Kuldeep says

  लेखक कोल्हापूरच दिसतय

 3. Deepak Sawant says

  डि मार्ट कंपनिचे खरा इतिहास समजला आणि खरोखरच आमच्या मनात डि मार्ट बद्दल जी आफवा होती त्या बद्दल खरी माहीती मीळाली

 4. baba bangali says

  Dmart konacha ahey, kay karacha ? tumhala kay pahijey tumhhi tya ghya, tumhala fokat nahi dete . Ani koni denar pan nahi. Gheun ghari za ani jhopa.

Leave A Reply

Your email address will not be published.