आयपीएलमध्ये दंगा करणाऱ्या ‘बेबी एबी’ची स्टोरी, सेम मोठ्या डिव्हीलिअर्स सारखी आहे

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत ट्रॉफीज जिंकल्यात पाच आणि यंदाच्या सिझनमध्ये सलग मॅचेस हरल्यात पाच. गेल्या काही वर्षात मुंबई इंडियन्सच्या टीमनं जे काही साम्राज्य बनवलं होतं, त्याला गेल्या दोन वर्षात खुंखार हादरे बसले. कारण गेल्यावर्षी मुंबईला प्लेऑफ्समध्ये जाता आलं नाही आणि इथं सध्या मुंबईचे जिंकायचे वांदे झालेत. साहजिकच आहे मुंबईचे फॅन्स सध्या तोंड बारीक करुन बसलेत…

पण कसंय कितीही वाईटातून चांगलं शोधता आलं पाहिजे, हे भारत वर्ल्डकपमध्ये हरल्यावर जसं आठवतं, तसंच इकडं पण आठवायला हवंच. सध्या मुंबई इंडियन्सच्या गोटात एकच गोष्ट भारी ठरतीये… 

बारक्या डेवाल्ड ब्रेविसचा फॉर्म.

डेवाल्ड ब्रेविस या नावावरुन तुमच्या पटकन लक्षात आलं नसेल (आमच्याही नव्हतं आलं), पण ही स्टोरी आहे ‘बेबी एबी’ ची.

अब्राहम बेंजामिन डिव्हिलिअर्स म्हणजेच एबीडी. हा गडी साऊथ आफ्रिकेचा पण याचं निम्म्यापेक्षा जास्त मार्केट भारतात होतं. याचं कारण म्हणजे एबीडी माणूस म्हणून लय सिम्पल होता आणि बॅटिंगमध्ये बादशहा. एबीडी रिटायर झाला आणि असं वाटलं आता आयपीएल सुनंसुनं होणार.

पण तेवढ्यात कानावर एक बातमी आली, की मुंबई इंडियन्सनं साऊथ आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला संघात घेतलं. या डेवाल्ड ब्रेविसचं टोपणनाव आहे… बेबी एबी.

आता याला डायरेक्ट एबीडीचं पुढचं व्हर्जन कसं काय म्हणलं गेलं? गडी नुसताच नावाची हवा आहे, की त्याच्या बॅटिंगमध्येही दम आहे? सध्याच्या आयपीएलमध्ये काय केलंय? असे लय प्रश्न फॅन्स लोकांना पडले. मग म्हणलं माहिती द्यावी…

कारण कसंय, कुठल्या कट्ट्यावर आयपीएलचा विषय निघाला की, ज्ञान द्यायला तुमच्याकडे मटरेल असलं पाहिजे…

तर हा बेबी एबी मुळचा साऊथ आफ्रिकेचा. याचं आणि एबीडीचं कनेक्शन जुळलं ते अगदी शाळेपासून. ब्रेविस तिकडच्या ‘Affies’ शाळेत शिकला. त्या शाळेचे दोन माजी विद्यार्थी म्हणजे, एबीडी आणि फाफ डू प्लेसिस. भारतात कसं मुंबईकडून खेळला म्हणजे लई भारी प्लेअर, तसंच सेम त्यांच्या शाळेचं गणित आहे.

इकडून भाऊ पुढं खेळला, साऊथ आफ्रिकेच्या डोमेस्टिक लीग्समध्ये. तिथंही भावानं बारक्या वयातच हवा केली. पण मेन विषय झाला तो अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये. ब्रेविस वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द टूर्नामेंट ठरला. त्याच्या बॅटिंगमुळं फक्त साऊथ आफ्रिकाच नाही, तर सगळं जग खुश झालं.

कारण पोरगं किरकोळीत मैदानाच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये बॉल मारत होतं, कितीही प्रेशर सिच्युएशन असली, तरी टिकून राहत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या टीमला जिंकून देत होतं. ब्रेविस वर्ल्डकपमध्ये फक्त एक मॅच फेल गेला, बाकी त्यानं दोन शंभर मारल्या, एक फिफ्टी केली आणि दोनदा शंभरला तीन-चार रन्स कमी असताना आऊट झाला.

त्याचं नशीब पण एबीडीसारखंच गंडत होतं.

अंडर-१९ वर्ल्डकपमधून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एंट्री करायची असेल, तर महत्त्वाचा टप्पा असतोय आयपीएल.

ब्रेविसचंही आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न होतं, पहिल्याच फटक्यात त्याला मुंबई इंडियन्सनं संधी दिली आणि लिलावात किंमत मिळाली… ३ कोटी. लय पैसे मिळाले म्हणून ब्रेविसचं नाव बातम्यांमध्ये आलं आणि सोबतच त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या.

मुंबई इंडियन्सनं त्याला कोलकात्याच्या मॅचमध्ये पदार्पणाची आणि तीन नंबरवर खेळायची संधी दिली. टी२० क्रिकेटमधला सगळ्यात अवघड आणि महत्त्वाचा स्पॉट, म्हणजे तीन नंबर. ब्रेविस तुलनेनं चांगला खेळला त्यानं १९ बॉलमध्ये २९ रन्स केले. दोन फोर आणि दोन सिक्सही हाणले.

बँगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये मात्र तो बॅटिंगमध्ये जरासा अडखळला. पण बॉलिंगमध्ये मात्र त्यानं एक लई महत्त्वाची विकेट मिळवली. ती म्हणजे विराट कोहलीची. त्या विकेटवरुन नंतर राडा झाला असला, तरी कोहलीला आऊट केलं ही १८ वर्षांच्या पोरासाठी आयुष्यभर सांगता येण्यासारखी गोष्ट आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स आणि बेबी एबी

पंजाबच्या बॅटर्सनं मुंबईला चोपत, १९८ रन्स मारलेले. त्यात मुंबईचे ओपनर्स ईशान किशन आणि रोहित शर्मा पाचव्या ओव्हरच्या सुरुवातीपर्यंत डगआऊटमध्ये पोहोचलेले. विषय गंभीर होता, पण ब्रेविस खंबीर ठरला.

सुरुवातीच्या आठ बॉलमध्ये त्याला एकही रन करता आला नाही. कार्यक्रम गंडला असं वाटत होतं, पण भावानं मोसम पकडला आणि पंजाबच्या बॉलिंगवर तुटून पडला. पुण्याचं पिच तसं बॅटिंग फ्रेंडली असतं, पण बॉल फिरायला लागला की अवघड होतं. ब्रेविस असाही स्पिनर्सला भारी खेळतोच, त्यामुळं त्यानं राहुल चहरला टार्गेट केलं. चहरच्या ओव्हरला एक फोर आणि मग सलग चार सिक्स बसले.

यातला शेवटचा सिक्स तर ११२ मीटर होता. अठरा वर्षांचं पोरगं इंटरनॅशनल बॉलरला इतक्या किरकोळीत पण इतकं बेकार हाणत होतं… की बघायला मजा येत होती.

ब्रेविसनं या आयपीएलमधला सगळ्यात लांब सिक्स मारला, त्याची फिफ्टी फक्त एका रननं हुकली, तो एका रात्रीत पुन्हा स्टार झाला…

पण याही पेक्षा भारी गोष्ट म्हणजे तो बॅटिंग करत असताना, टाईमआऊटमध्ये त्याचं कौतुक करायला रोहित शर्मा आणि तेंडुलकर स्वतः मैदानात आले. लिलावात मिळालेल्या ३ कोटीपेक्षा मोठी कमाई ब्रेविसनं केली..!

टीम संकटात असताना ब्रेविसनं जबाबदारी घेतली, भारी बॅटिंग करुनही त्याची टीम हरली, त्याला दुसऱ्या एन्डकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही आणि भारताचा नसूनही भारतीय चाहत्यांना मात्र त्याची बॅटिंग मनापासून आवडली… म्हणूनच म्हणलं बेबी एबीची स्टोरी सेम एबीडीसारखी आहे.

फक्त ती लक्षात डेवाल्ड ब्रेविसच्या नावानं राहावी इतकंच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.