अशा पद्धतीने अनिल अंबानी यांनी घर जाळून कोळशाचा व्यापार केला

अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी. सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेली श्रीमंत बापाची लेकरं. वडिलांनी पाचशे रुपये घेवून धंदा सुरू केला होता. पण या पोरांच्या पदरात जन्मताच सुख आलं. आत्ता कोण कुणाच्या घरात जन्माला यावं हे काही ठरवून होतं नसतं. या नशिबाच्याच गोष्टी असतात.

असो, तर मिळवलेलं टिकवून ठेवणं यात देखील स्कील लागतं. आमच्या पणज्याची १५ एकर आम्ही फुकून घालवली म्हणण्यात शहाणपणा नसतो. तरिही यातच मोठ्ठेपणा समजणारी समजात काही मान्यवर मंडळी आहेत.

अशा कॅटेगरीतला सर्वांचा बेताज बादशहां म्हणजे अनिल अंबानी.

वाटणीत मिळालेली ४२ बिलियन डॉलरची संपत्ती या पठ्याने गेल्या दहा पंधरा वर्षात अशा प्रकारे फुकली की आज त्यांच्याकडे फक्त १.७ बिलियन इतकी संपत्ती राहिलेली आहे. बर यात कर्ज फेडण्यास सक्षम नसल्याची कारणे देवून झालेल्या कर्जाची रक्कम तर मोजण्यात पण आलेली नाही.

आजवर “बोलभिडू” च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला यशस्वी माणसांच्या गोष्टी सांगितल्या. पण कसय भिडू अयशस्वी माणसांच्या पण गोष्टी अधनंमधनं वाचल्या पाहीजेत म्हणजे कस काय करायचं नाही हे पण लक्षात येतं.

तर धिरूभाई अंबानी याचं निधन झाल्यानंतर त्यांच्या गादीचे दोन वारस होते. एक मुकेश अंबानी आणि दुसरे अनिल अंबानी.

धिरूभाई अंबानी यांना वाटत होतं की आपली गुणी लेकरं संपत्तीवरुन कधीही भांडणार नाहीत. म्हणून इतकी संपत्ती असून देखील त्यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं नव्हतं. पण त्यांचा अंदाज चुकला. धिरूभाई गेल्यानंतर हे दोन भिडू एकमेकांच्या अंगावर आले. दिवार पिक्चरच्या निरुपा रॉयसारखी या दोन भावांच्यामध्ये मध्यस्थी केली ती कोकीलाबेन अंबानी यांनी.

कोकिलाबेन यांचा कल धाकट्या पोराकडे अधिक होता, पण वाटणीत पाप करून पण चालणार नव्हतं. अशा वेळी कोकिलाबेन यांनी आपल्या कंपनीतल्या दोन विश्वास माणसांना मध्यस्ती केलं आणि बांध आखल्यासारखी वाटणी करण्यास सुरवात केली.

त्यांनी CA एस गुरूमुर्ती आणि बॅंकिंग प्रमुख केवी कामथ यांना सोबतीला घेतलं. एकत्र मिळून त्यांना वाटणीची दिशा ठरवली.

मुकेश अंबानी यांच्या वाट्याला, 

 रिलायन्स इंडस्ट्रिज, रिलायन्स पेट्रोलियम, भारतीय पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IPCL), रिलायंन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (RIIL) अशा प्रमुख कंपन्या आल्या तर

 

अनिल अंबानी यांच्या वाट्याला,

रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM), रिलायन्स कॅपिटल (RCL), रिलायन्स एनर्जी (REL), रिलायन्स नॅचरल रिसोर्स लिमिटेड आणि रिलायन्स ब्रॉडकास्ट लिमिटेड अशा प्रमुख कंपन्या आल्या.

आत्ता इथच खरी गोम होती. वास्तविक मुकेश अंबानी यांच्या वाट्याला ४३ बिलियन डॉलरची संपत्ती आलेली तर अनिल अंबानी यांच्या वाट्याला ४२ मिलियन डॉलरची संपत्ती आलेली. पण गोम अशी होती की अनिल अंबानी यांच्या वाट्याला आलेल्या सगळ्या कंपन्या या नव्याने झेप घेणाऱ्या होत्या.

जस की रिलायन्स कम्युनिकेशन्स. मोबाईलचं जग आल्याने ही कंपनी येणाऱ्या काळात खूप मोठी झेप घेईल असा विश्वास होता. अशा सर्व कंपन्या अनिल अंबानीच्या ताब्यात गेल्यानं आत्ता मुकेश उरला फक्त कवितेपुरता टाईप चर्चा अंबानींच्या भावकीत सुरू झाल्या होत्या. 

अनिल अंबानी तेव्हा जगात सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर मुकेश अंबानी पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. काही काळात अनिल अंबानी कुठल्याकुठे जातील असा अंदाज लोक लावत होते.

आत्ता अनिल अंबानी एक एक उद्योग कसा उभारत गेले ते पाहूया म्हणजे घोड्यानं कुठं पेंड खाल्ली ते कळेल.

अनिल अंबानी यांनी टिना मुनीम सोबत लग्न केलं. त्यांना पेज थ्रीचा भारी नाद होता. मिडीयात सतत चर्चेत राहणं आणि त्या क्षेत्राशी निगडीत पैसा गुंतवण्यात कल होता. त्यातूनच त्यांनी २००५ साली ॲडलॅब्स फिल्म ही कंपनी विकत घेतली आणि बिग सिनेमा नावाने मल्टिफ्लेक्सची चेन सुरू केली. तीन वर्षात म्हणजे २००८ च्या दरम्यान बिग सिनेमाच्या भारतासोबत देशविदेशात ७०० स्क्रिनची मालकी होती. त्याचसोबत त्यांनी स्टिवन स्पीलबर्ग यांच्या ड्रिमवर्क्स सोबत साडेसात हजार कोटींचा करार केला होता.

पुढे २००८ मध्ये त्यांच्या नावाने मार्केटमध्ये एक विक्रम झाला. त्यांनी काय केलं तर रिलायंस पॉवरची IPO सुची काढली ही सुची ६० सेकंदात खपली. आजही हा विक्रम अबाधित आहे. आपल्या पेज थ्री लाईफमुळे ते सिनेजगतातल्या हिरोहिरोईचे खास झाले. साहजिक अमरसिंह यांच्यासोबत मैत्री व्हायला वेळ लागला नाही.

इथे एक माशी शिंकली. कस पैशेवाल्यांनी किंगमेकर व्हायचं असत किंग नाही.

पण अनिल यांना राजकारणाचा नाद लागला. या नादातून ते राज्यसभेचे सदस्य झाले. दूसरीकडे धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी नावाने ड्रिम प्रोजेक्ट सुरू केला. पुढे मुकेश अंबानीने आशियातलं सर्वात मोठ्ठ घर अंटालिया बांधायला काढलं. हे बघून अनिल अंबानी यांनी देखील तितक्याचं किंमतीच अबोड हाऊस बांधायला घेतलं. त्यांचा हा प्रकार म्हणजे टिपीकल भावकीतला होता. भाऊ बांधतोय म्हणून आपण पण बांधायचं. सगळं व्यवस्थित होणार हे पक्क झालेलं.

पण काळ सारखा राहत नाही.

रिलायन्सची वाटणी करताना RCOM कंपनी अनिल अंबानीच्या वाट्याला आली होती. त्याने आपले CDMA कार्ड चालू ठेवली. पण आयड्या, एअरटेल सारख्या सर्वच कंपन्यांनी GSM तंत्रज्ञान आणलं. त्यामुळे झालं अस की जेव्हा 3G, 4G तंत्रज्ञान मार्केटमध्ये आलं तेव्हा रिलायन्स बाजारातून उठलं.

आत्ता वाटणीत ठरलेलं की पुढील १० वर्षात कुणीही एकमेकांच्या क्षेत्रात स्पर्धा ठरेल अशी कंपनी काढायची नाही. तो काळ संपला आणि २०१५ ला मुकेश अंबानी यांनी जिओची स्थापना केली. जस्स जियो लॉन्च झालं तस RCOM अजून जोरात ढासळू लागलं. १.६५ लाख करोड मुल्य असणारी ही कंपनी टोटल दिवाळखोरीत निघाली. ९८ टक्के घसरण अशी विक्रमी नोंद करण्यात आल.

याच्या काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१० ला अनिल अंबानींचा किडा वळवळला होता. तेव्हा त्यांनी मुकेश अंबानींना थेट कोर्टात खेचलं होतं.

प्रकरण होतं रिलायन्सच्या कृष्णा गोदावरी खोऱ्यातील गॅसच्या पुरवठ्यातील दराबद्दल. मुकेश अंबानी यांच्या ताब्यात रिलायन्स इंडस्ट्रि लिमिटेड (RIL) होती तर अनिल यांच्या ताब्यात रिलायन्स नॅचरल रिसोर्स लिमिटेड (RNRL) होती. RIL ने RNRL ला २.३४ डॉलर प्रती मिलीयन बटूने गॅस देण्याचं मान्य केलं होतं. ही अट कोकीलाबेन यांनी मुकेशकडून मान्य करुन घेतली होती. पण काळ सरला आणि गॅस महाग झाला. मुकेश जुन्या किंमतीत व्यवहार करण्यास तयार नव्हते तेव्हा बसून मिटवायचं सोडून अनिल थेट कोर्टात गेले.

इथं काशी झाली. अनिल यांच्या विरोधात निर्णय झाला आणि ४.२० डॉलरचा दर लावला आणि अनिल तोंडावर आपटला.

एक कंपनी आपटली की दूसरी कंपनी आपटण्यास वेळ लागत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी बिग सिनेमा ७५० कोटींना कार्निव्हल सिनेमाला विकून टाकला. बिग टिव्ही आणि बिग FM चा मोठ्ठा हिस्सा झी वाल्यांना विकण्यात आला.

हे सगळं करत असताना संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या नादात पीपीवाव मरीन ऑफशोर इंजनिरिंग ही कंपनी विकत घेतली व रिलायन्स नेवलं कंपनी सुरू केली. या माणसाच्या हातात ही कंपनी आली आणि २०१९ मध्ये कंपनीची किंमत ९० टक्यांनी घसरली.

७००० कोटींवरून ७०० कोटींच्या कंपनी करण्याचा पराक्रम या माणसाने करून दाखवला. पुढे रिलायन्स एनर्जी अदानी कंपनीला विकून टाकली.

आत्ता अशा वेगवेगळ्या कंपन्याच्या पाण्यात जाण्यानं ४३,००० हजार कोटींच कर्ज डोक्यावर झालं. हे कर्ज फेडण्यास या माणसाने असमर्थता दाखवली. दोघांची वाटणी समसमानच झाली होती. मुकेश यांच्या वाट्याला ४३ बिलीयन डॉलर आले होते. आजही त्यांची संपत्ती याच आसपास आहे. शिवाय कंपन्याच्या नावे असल्याची गणती काही औरच. तर अनिल अंबानी यांच्या वाट्याला ४२ बिलियन डॉलर आले होते. त्यांच्याकडे आज ६ बिलियनच कर्ज आणि १.७ बिलियनची संपत्ती आहे.

तर अशा प्रकारे अनिल अंबानी यांनी घर जाळून कोळश्याचा व्यापार केला. त्यामुळं वडिलोपार्जित मिळालं म्हणून राडा करून चालत नाही भिडू. क्षेत्र कुठलं का असेना स्वत:च्या अंगातली रग ही दाखवावीच लागते.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.