महाराष्ट्रात साखर उद्योगाची पहिली मुहूर्तमेढ या सासवडच्या भूमिपुत्राने घातली…

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि प्रगतीत साखर कारख्यांनांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सर्वाधिक १९५ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांपासून सामान्य कष्टकरी नागरिकांपर्यंत अनेकांच्या आयुष्याला उभारी दिली आहे. पहिले मराठी साखर कारखानदार कोण हा प्रश्न अनेकदा पडत असतो. या दिग्गज साखर कारखानदारांनं फक्त कारखानदारीमध्येच नाही, तर सामाजिक क्षेत्रातही आपला अमीट ठसा उमटवला होता.

पहिले मराठी साखर कारखानदार म्हणजे रावबहादूर नारायणराव बोरावके. सासवडचे भूमीपुत्र असणारे नारायणराव सासवड माळीनगर सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत अग्रभागी होते. त्यांच्या कामाचा परीघ मात्र कारखान्यापुरताच मर्यादित नव्हता.

आपलं स्वतःचं शिक्षण कमी असल्याची नारायणरावांना खंत होती. पण अशी खंत इतर कुणालाही वाटू नये याची त्यांनी पुरेपूर दक्षता घेतली.

त्यांनी काही काळ रयत शिक्षण संस्थेचं उपाध्यक्षपद भूषवलं. रयतच्या माध्यमातून शिक्षण प्रसारावर भर देत ग्रामीण भागात अनेक शाळा व महाविद्यालयं स्थापन केली. नारायणरावांनी सासवडमध्ये लक्ष्मीबाई वसतिगृहाची स्थापना केली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं माहेरघर असणाऱ्या महाराष्ट्र मंडळ या पुण्यातल्या संस्थेचेही ते आश्रयदाते होते. आजही नारायणरावांच्या नावानं अभियांत्रिकी महाविद्यालयं सुरू आहेत.

त्यांचा वारसा जपणारे आणि पुढे चालवणारे विद्यार्थी महाराष्ट्रात घडत आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी १९३० च्या दशकात सहकार कायदा अस्तित्वात नव्हता. तेव्हा नारायणरावांनी आपले सोबती शेतकरी गणपतराव गिरमे, शंकरराव कुडाळे, शंकरराव राऊत, गणपतराव रासकर यांच्या सहकार्यानं भागीदारी फर्म काढली. या सर्वांच्या प्रयत्नातून सासवड माळीनगर सहकारी साखर कारखाना उभा राहिला. या भागीदारी फर्मच्या माध्यमातून त्यांनी १९३४-३५ चा पहिला गळीत हंगाम अत्यंत बखुबीनं पार पाडला. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश, तेलंगणामधील तत्कालीन साखर उद्योगाची पाहणी करत आपल्या व्यवसायाला योग्य आकार दिला.

कारखान्यासाठी त्यांनी इंग्लंडवरून २५० टीसीडी साखर यंत्रं आयात केली आणि १९३४ च्या ऑक्टोबरपासून यंत्रं कार्यान्वित केली. त्यानंतर, ऊस लागवडीत आणि कालवा सिंचन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं १९५२ पर्यंत साखर कारखान्याची क्षमता टप्प्याटप्प्यानं १०१६ टीसीडी पर्यंत वाढवण्यात यश आलं. सध्या कारखान्याची क्षमता ३५०० टीसीडीपर्यंत पोहोचली आहे ही निश्चितच गौरवास्पद बाब म्हणली पाहिजे. कोळपेवाडी सहकारी कारखाना उभारण्यातही नारायणरावांनी मोलाचा वाटा उचलला.

मूळ पिंड शेतकऱ्याचा असल्यानं नारायणरावांनी आपली शेतीशी जुळलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. परंपरागत शेती पद्धतीत अडकून न राहता त्यांनी आधुनिकतेचा आग्रह धरला.

संशोधित फळांचं उत्पादन करायला त्यांनी प्रोत्साहन दिलं. पारंपरिक शेती अवजारं वापरण्यापेक्षा आधुनिक अवजारं वापरण्यात शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल हे त्यांनी पटवून दिलं. शेती अवजारं बनवणाऱ्या किर्लोस्करवाडीच्या किर्लोस्कर कारखान्याचेही ते संचालक होते. शेतीला मोटेऐवजी स्वयंचलित पंपानं पाणी कसं देता येईल, याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.

नारायणराव १९२९ ते १९३५ अशा सहा वर्षांच्या कालावधीत अहमदनगर जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. त्यांनी १९५३ च्या दुष्काळ समितीवरही सदस्य म्हणून काम पाहिलं. पुण्यातल्या महात्मा फुले संग्रहालयाचे (पूर्वीचं नाव लॉर्ड रे म्यूझियम) ते विश्‍वस्तही होते. राहता येथे जनावरांचा दवाखाना काढून त्यांनी ग्रामपंचायतीला सुपूर्त केला. बँक ऑफ कराडचे संचालक म्हणून काम करताना नारायणरावांनी अनेकांना आर्थिक आधार व पाठबळ दिलं.

ब्रिटिश राज्यकर्ते कर्तृत्ववान लोकांना पदव्या देत असत. नारायणरावांना १९३३ मध्ये ‘रावसाहेब’ हि पदवी मिळाली, तर १९४६ मध्ये ‘रावबहादूर’ अशी पदवी देत ब्रिटिशांनी त्यांच्या कामाचा उचित गौरव केला.

त्यांच्या निधनाला पन्नासहुन अधिक वर्षं लोटून गेली असली, तरी त्यांचं सामाजिक कार्य आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला बळ देण्याच्या वृत्तीचा महाराष्ट्राच्या पावनभूमीला कायमच अभिमान वाटत राहील!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.