पैंगबराच्या दाढीचा केस अर्थात मू-ए-मुकद्दस चोरीला गेला अन् भारत-पाकीस्तानात दंगे सुरू झाले

1960 च्या दशकात जम्मू काश्मीरचं राजकारण पेटलेलं. या वर्षी जम्मू काश्मीर भारतापासून वेगळा करण्याचा प्लॅन करण्यात आला होता या कारणावरून शेख अब्दुला यांना अटक करण्यात आलं होतं. त्यांच्या जागेवर बख्शी गुलाम मोहम्मद  यांना जम्मू काश्मीरचं मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.

याच काळात पंडित नेहरूंनी कामराज प्लॅन एक्टिवेट केला होता. कामराज प्लॅननुसार देशभरातल्या ६ मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रिय मंत्र्यांनी  कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी राजीनामा दिला होता. याच प्लॅननुसार १९६३ साली बख्शी गुलाम मोहम्मद यांना मुख्यमंत्री पदावरून हटवत ख्वाजा शम्सुद्दीन यांना काश्मीरचे मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.

या सर्व पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या २६ तारखेला बातमी आली..

पैंगबर यांचा पवित्र अवशेष चोरीला गेला आहे.. 

पैंगबर यांचा पवित्र अवशेष म्हणजेच त्यांच्या दाढीचा केसं. हा केस भारतात सर्वात पहिल्यांदा आणला होता तो पैंगबर यांचे वंशज असणाऱ्या सईद अब्दुला यांनी. त्यांनी तो केस कर्नाटकच्या विजापूरातील दर्ग्यात ठेवला होता. ते साल होतं १६३५.

त्यानंतर काश्मिरीचा एक व्यापारी नूरद्दीन यांच्याकडे तो केस आला. पुढे औरंगजेबाला या पवित्र अवशेषाबद्दल माहिती झाल्यानंतर त्यांने नूरद्दीन याला अटक केलं आणि त्याच्या ताब्यातला हा केस अजमेरच्या दर्ग्यात ठेवला. पुढे औरंगजेबानेच हा केस नूरद्दीन यांच्या कुटूंबाला परत केला व या कुटूंबाने जम्मू काश्मिरच्या हजरतबल दर्ग्यात हा केस सुरक्षित ठेवला. तेव्हापासून महम्मद पैंगबर याचा हा केस इथेच होता

मात्र २६, २७ डिसेंबर १९६३ च्या एका रात्री या दर्ग्यातून महम्मद पैंगबर यांचा हा अवशेष अर्थात मू ए मुक्कद्दस गायब झाला.

बघता बघता ही बातमी काश्मीरमध्ये वाऱ्यासारखी पसरू लागली. त्या काळात दर्ग्याच्या समोर सुमारे ५० हजार मुस्लीम लोक हातात काळे झेंडे घेवून आले. दूसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री ख्वाजा शम्शुद्दीन या ठिकाणी पोहचले आणि चोरांना पकडणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल अशी घोषणा त्यांनी केली. सोबतच जो कोणी चोरांना पकडेल त्याला आयुष्यभरासाठी ५०० रुपयांची पेन्शन देखील देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन केंद्रिय गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लागलीच काश्मीरला या चोरीच्या तपासासाठी CBI चे दोन वरिष्ठ अधिकारी पाठवले. 

दूसरीकडे या चोरीमुळे काश्मिरमध्ये वातावरण चिघळू लागलेलं. काश्मिरच्या लाल चौकात एका दिवसात १ लाख  लोक जमा झाले होते. त्यांनी रेडिओ स्टेशन जाळण्याचा प्रयत्न केला होता. संपूर्ण काश्मिरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडू लागल्या होत्या..

या सर्व घटनांचा फायदा पाकीस्तानने घेतला नसेल तर नवलच..!!!

पाकीस्तानने ही बातमी सनसनाटी पद्धतीने दाखवली. काश्मिरमधील मुस्लीमांवर अन्याय होत आहे अशा पद्धतीने बातमी लोकांपर्यन्त पोहचवण्यात येत होती. त्यामुळे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात म्हणजेच बांग्लादेशात देखील मोठ्ठा हिंसाचार सुरू झाला. भारत-पाकिस्तान-बांग्लादेश अशा तिन्ही देशात मिळून ४०० वर लोक मेले.

प्रकरण पेटू लागलं आणि थेट पंतप्रधान नेहरूंना यात हस्तक्षेप करावा लागला.

जवाहरलाल नेहरूंनी CBI चीफ BN मलिक यांना श्रीनगरला पाठवलं. रेडिओवरून शांततेचं आवाहन करण्यात येवू लागलं. १ जानेवारी रोजी नेहरूंनी आपल्या खास मंत्र्याला काश्मीरला पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी दिली.

या मंत्र्याचं नाव होतं, लाल बहादूर शास्त्री.. 

लाल बहादूर शास्त्री, CBI चे प्रमुख मलिक आणि केंद्रिय गृह सचिव वी विश्वनाथन हे तिघेही काश्मीरमध्ये तळ ठोकून होते.

याच सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून काश्मिर रेडिओवरून ४ जानेवारीला बातमी प्रसारीत करण्यात आली..

महम्मंद पैंगबर यांची पवित्र निशाणी सापडली आहे…!!!

CBI प्रमुखांनी नेहरूंना फोन करून ही गोष्ट सांगितली तेव्हा नेहरूंनी त्यांना उत्तर दिलं,

तू काश्मीरला पाकिस्तानात जाण्यापासून वाचवलस..

पण पुन्हा एका शंकेने डोकं वर काढलं. मू ए मुक्कद्दस म्हणजे हा केस खरा आहे कशावरून. पुन्हा एकदा वातावरण पेटू लागलं अशा वेळी शास्त्रींनी एक तोडगा काढला तो म्हणजे काश्मीरचे संत मीराक शाह कशानी हेच या पवित्र अवशेषांची पडताळणी करून सांगतील..

मीराक शाह कशानी यांच्याबद्दल मुस्लीम समाजाला कोणतिही शंका नव्हती. ते सांगतील तर ते खरच हे प्रमाण होतं. त्यांनी या अवशेषाची पडताळणी केली व हा केस खरा असल्याचं सांगितलं. आणि वातावरण कायमचं शांत झालं.

आजही काश्मिरमध्ये या गोष्टीबद्दल एक थेअरी प्रसिगद्ध आहे. अस म्हणतात की, काश्मिरचे मुख्यमंत्री बख्शी गुलाम मोहम्मद यांच्या घरी एक व्यक्ती आजारी होती. या व्यक्तीने मु ए मुक्कद्दस पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनीच हा अवशेष आपल्या घरी मागवला होता. पण तो परत ठेवण्यापूर्वी गायब झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि पुढे या सर्व घटना घडत गेल्या.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.