एका चोरीने भारत आणि पाकिस्तानात दंगे सुरू झाले.

जम्मू आणि काश्मीर.

भारतातला सर्वात संवेदनशील प्रदेश. इथे घडणारी छोट्यात-छोटी घटना देखील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना युद्धाच्या दारात उभं करू शकते अशी एकंदरीत आजची देखील परिस्थिती.

किस्सा आहे १९६३ सालचा,

ज्यावेळी जम्मू काश्मिरात असं काही घडलं होतं की केवळ एका केसाच्या चोरीमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्हीही देशांमध्ये धार्मिक दंगे भडकले होते.

‘मू-ए-मुकद्दस’ची चोरी. 

१९६३ सालचा डिसेंबर महिना. २६ तारीख. काश्मिरातील लोकं नुकतेच सकाळी झोपेतून उठले होते आणि चहाच्या चुटक्या भरत होते. त्यावेळी उडत-उडत त्याना एक बातमी मिळाली. बातमी अशी होती की ‘मू-ए-मुकद्दस’ अर्थात हजरत मोहोम्मद पैगंबर यांच्या दाढीतील पवित्र केस चोरीस गेला होता.

इस्लाममध्ये हजरत मोहोम्मद पैगंबर यांच्या नावाला अतिशय प्रतिष्ठा आहे. पैगंबराच्या अनुयायांसाठी त्यांचा प्रत्येक अवशेष पूजनीय असतो. ‘मू-ए-मुकद्दस’ देखील या पवित्र अवशेषांपैकीच एक होता. साहजिकच तो चोरीला जाणं ही खूप मोठी घटना होती. या घटनेची अतिशय आक्रमक प्रतिक्रिया उमटणार होती. झालंही अगदी तसंच.

भारत-पाकिस्तानात दंगे भडकले.

एकदा का बातमी बाहेर आली की ती सोशल मिडिया नसतानाच्या त्या काळात सुद्धा प्रचंड वेगात पसरली. लोक विरोध प्रदर्शनामध्ये रस्त्यावर उतरले. पुढच्या दोन-तीन दिवसात तर परिस्थिती हाताबाहेर गेली. पाकिस्तानी माध्यमांनी देखील ही घटना अतिरंजित पद्धतीने रंगवली.

जम्मू काश्मीरमधील परिस्थिती चिघळत ठेवण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल अयुब खान यांनी देखील ‘जम्मू काश्मीरमधील मुस्लिमांच्या हिताच्या संवर्धनासाठी पाकिस्तान त्यांच्या पाठीशी आहे’ असं वक्तव्य करत आगीत तेल ओतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

घटनेचे पडसाद त्यावेळचा पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजच्या बांगलादेशमध्ये देखील पडले. तिथल्या अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. इकडे भारतात बंगालमध्ये उसळलेल्या दंगलीत हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही समुदायातील जवळपास २०० लोक मारले गेले. जवळपास ५० हजार लोकांवर बेघर होण्याची वेळ आली.

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी लिहलेल्या लेखानुसार या काळात निर्माण झालेल्या धार्मिक दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हिंदू पूर्व पाकिस्तानमधून भारतात आणि मुस्लीम भारतातून पूर्व पाकिस्तानमध्ये विस्थापित झाले.

तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसमोर हे प्रकरण आव्हान म्हणून उभं राहिल होतं. त्यामुळे प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. जसजसे दिवस जात होते, तसतस हे प्रकरण अधिकच गंभीर वळण घ्यायला लागलं होतं. सीबीआयचे तत्कालीन प्रमुख बी.एन. मलिक त्यावेळी श्रीनगरमध्ये तळ ठोकून होते, पण हाती काहीच लागत नव्हतं.

….आणि पवित्र अवशेष सापडला.

अशा परिस्थितीत ४ जानेवारी १९६४ रोजी जी बातमी आली तिने पैगंबरांच्या सर्व अनुयायांच्या आणि नेहरूंच्याही जीवात जीव आला. जम्मू काश्मीर रेडीओच्या विशेष प्रसारणामध्ये जम्मू काश्मीरचे तत्कालीन प्रमुख शमसुद्दीन यांनी काश्मीरवासियांना पैगंबरांचे पवित्र अवशेष सापडले असल्याची बातमी दिली. चोरी करणाऱ्याने स्वतःच हा केस तिथे आणून ठेवला असल्याचं सांगण्यात आलं होतं.

पैगंबरांच्या अनुयायांसाठी ही बातमी ईदच्या सनाएवढीच आनंद देणारी होती. इकडे प्रशासनासाठी देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती, कारण या बातमीमुळे पुढचा फार मोठा अनर्थ टळणार होता.

या बातमीने वातावरणात तात्पुरती शांतता निर्माण झाली होती. परंतु प्रकरण अजून संपूर्णपणे संपलेलं नव्हतं. कारण सापडलेला केस ‘मू-ए-मुकद्दस’ म्हणजेच पवित्र अवशेष आहे, याची खातरजमा करण्याची मागणी अनेक संघटनांकडून करण्यात येत होती. तसं न केल्यास विरोध प्रदर्शने पूर्ववत सुरु ठेवण्याची धमकी या संघटना करत होत्या.

तो एक मिनिटाचा सस्पेन्स.

शेवटी केंद्र सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आणि ६ फेब्रुवारी १९६३ रोजी सर्व पक्षीयांच्या सहमतीने जम्मू काश्मीरचे जेष्ठ अध्यात्मिक नेते मिराक शाह कशानी यांची केसाची सत्यता पटविण्यासाठी निवड करण्यात आली. त्यावेळी दर्ग्यासमोर हजारो अनुयायी उपस्थित होते.

मिराक शाह कशानी यांनी जवळपास मिनिटभर केसाचं व्यवस्थित निरीक्षण केलं. या १ मिनिटाच्या काळात जम्मू काश्मीर सरकार आणि भारत सरकारचे देखील श्वास रोखले होते. या एक मिनिटाच्या सस्पेन्सविषयी जेष्ठ पत्रकार इंदर मल्होत्रा यांनी लिहिलंय की,

“या एक सेकंदाचा सस्पेन्स ‘सस्पेन्स थ्रिलरपट’ बनविण्यासाठी प्रख्यात असणाऱ्या आल्फ्रेड हिचकॉकसारख्या हॉलीवूड दिग्दर्शकाला बुचकळ्यात टाकू शकला असता. शेवटी मिराक शाह कशानी यांनी आपली मान हलवली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की हा ‘मू-ए-मुकद्दस’च आहे.”

‘मू-ए-मुकद्दस’ नेमका कुणी चोरला होता..?

तत्कालीन गृहमंत्री गुलझारी लाल नंदा यांनी फेब्रुवारी १९६४ मध्ये जी माहिती दिली त्यानुसार दर्ग्याच्याच देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीने आपल्या नातेवाइकांच्या मदतीने हा पवित्र अवशेष चोरला होता. तो ज्यावेळी पुन्हा तो अवशेष त्याच ठिकाणी ठेवायला आला त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आलं.

इंदर मल्होत्रा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’साठी लिहिलेल्या लेखात मात्र हे नाकारलंय. त्यांच्या मते, “अनेक जणांचं असंच म्हणणं होतं आणि नंतर जे सिद्ध देखील झालं की या प्रकरणात कुठलंही षडयंत्र नव्हतं तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते बख्शी गुलाम मोहोम्मद यांच्या परिवारातील एका मरणासन्न व्यक्तीच्या शेवटच्या इच्छेखातर हे पवित्र अवशेष त्या ठिकाणाहून हलवून तिच्या दर्शनासाठी नेण्यात आले होते.”

काही जणांचं असंही म्हणणं आहे की पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निकटवर्तीय असल्याने बख्शी गुलाम मोहोम्मद यांना या प्रकरणातून वाचविण्यात आलं होतं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.