राजा हरिश्चंद्र आणि महाराष्ट्राचं काय होतं नातं ? वाचा हरिश्चंद्र गडाची कहाणी.

हरिश्चंद्रगड..!

उत्तुंग कडे, भीषण दऱ्यांनी वेढलेला परिसर.. नव्हे नव्हे तर निसर्गाला पडलेलं एक रांगडं स्वप्नच…

किल्ला म्हणावं अस इथं काहीच शिल्लक नाही पण तरीही या ठिकाणचं नाव हरिश्चंद्रगड का पडलं हे मात्र इतिहासाला आज आठवत नाही.

पण हजारो रानवेड्यांना खुणावत राहणारा हा अजस्त्र डोंगर म्हणजे एक स्वप्ननगरीच आहे. तुम्हाला काहीतरी उत्तुंग करायची इच्छा आहे, तुमच्यातली सगळी रग जिरवायची आहे. तुम्हला कुठल्यातरी बलदंड प्रतिस्पर्ध्याशी दोनहात करायचं आहे. किंवा तुमच्या मनात पराभूत भावना आहे. आणि तुम्हाला कुठेतरी जिंकून दाखवायचं आहे.तर मग तुम्ही या हरिश्चंद्रगडावर गेलंच पाहिजे…

राजा हरिश्चंद्राची कथा, भारतात लहानाचं मोठं होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ऐकलेलीच आहे.

राजा हरिश्चंद्र हा अयोध्येचा राजा, त्याच सुर्यकुलातला किंवा रघुकुळातला ऋषी विश्वामित्राला स्वप्नात त्यानं आपलं सगळं राज्य दान देऊन टाकलं (दोघांनाही एकाच वेळी स्वप्न कसकाय पडलं कोण जाणे) ज्या रात्री राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं त्याच सकाळी अगदी भल्या सकाळी विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या दारात उभा राहिला आणि स्वप्नात दिलेलं राज्य दान मागू लागला.

सत्यवचनी राजा हरिश्चंद्राने सगळं राज्य दान करून मुलगा आणि बायकोला घेऊन वनवासात जाणं पसंत केलं… खरंतर ‘राजा हरिश्चंद्र’ ही कथा लोककथा आहे की तत्सम बहुजनांना संस्काररूपी शिस्त लावण्यासाठी रचलेलं कुभांड आहे हे माहीत नाही पण त्याच राजा हरिश्चंद्राचे काही संबंध या हरिश्चंद्रगड किल्ल्यावर सापडतात, ते म्हणजे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि तारामती कडा. दूर कुठंतरी रोहिदासाची समाधी असल्याचंही बोललं जातं..

राजा हरिश्चंद्र वनवासात असताना, या हरिश्चंद्र गडावर डोंबारी राजा राज्य करत होता.

आणि या राजाच्या दरबारी राजा हरिश्चंद्र पाणी भरण्याचं काम करी, पण हा डोंबारी राजा मोठा जुलमी, त्यानं रांजनाला खालून भोक पाडलं आणि सांगितलं की हा रांजण जर तू भरलास तर मी तुला माझं राज्य देईन. झालं राजा हरिश्चंद्र रोज दमून भागून रांजण भरीत राही पण एक कावड टाकली आणि दुसरी भरायला गेला की रांजण रिकामा होई, राजा हरिश्चंद्र असे कित्येक तरी वर्षे रांजण भरत होता. ज्यानं स्वतःच राज्य स्वप्नात दान केलं त्या राजाला एक फुटका रांजण भरून दुसऱ्याचं राज्य मिळवायची कुठे ईर्षा निर्माण झाली असेल. पण असो असेल ते असेल, अशीच कैक वर्षे लोटली आणि एक दिवस एक बेडकुली त्या रांजनाच्या छिद्रावर जाऊन बसली आणि कमाल काय त्या दिवशी रांजण भरून उलथू लागला, बस.

त्या दिवशी त्या डोंबारी राजाने आपलं राज्य राजा हरिश्चंद्राला दान केलं आणि निघून गेला.

आजही त्याच डोंबारी राजाचे वंशज गावोगाव फिरून डोंबाऱ्याचे खेळ दाखवून जगत आहेत. तिथून पुढे राजा हरिश्चंद्राने या भागात किती दिवस राज्य केले माहीत नाही मात्र इथे हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि तारामती कडा आजही त्याची साक्ष देत उभे आहेत. आणि या भागात आपली कौलारु घरे उभारून हजारो वर्षांपासून कातळ कड्याच्या साक्षीने आयुष्य जगणारा महादेव कोळी हा आदिवासी समाज राजा हरिश्चंद्राची कहाणी सांगत असतो…

मी जेंव्हा गडाच्या खाली असलेल्या पाचनई गावातल्या मारोती मंदिरातला काळ्याकुट्ट रात्रीचा मुक्काम आवरून गडाची वाट चढू लागलो तेंव्हा सोबतीला असलेला अंतराम भारमल मला ही सगळी कहाणी सांगत होता. सकाळचे सहा वाजून गेले होते. तिकडे आभाळाच्या पोटात शिरलेल्या डोंगराच्या कड्यातून सूर्य आणखी डोकवायचा बाकी होता. अगदी त्याच वेळी पनाफुलांचं मंद धुंद श्वास नाकात भरत आम्ही हरिश्चंद्र गडाची अवघड चढण चढायला सुरुवात केली.

ऑक्टोबर महिना, नाही म्हणायला अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. किमान उंचीचा मातीने माखलेला आम्ही एक डोंगर पार केला आणि समोर एक अदभूत दृष्य पाहायला मिळालं. ते म्हणजे अजस्त्र कड्याचं, किमान एक हजार फूट उंची असलेला एक सवंग दगड समोर उभा होता. त्याची लांबी एक किलोमीटरपेक्षाही अधिक असावी आणि किमान सात एक किलोमीटर अंतरावर तो जमिनीच्या पोटात घुसलेला अजस्त्र दगडी कडा होता.

हाच कडा खालच्या बाजूने इतका कोरला गेला होता, की त्याच्याखालून चालायला उरात धडकी भरत होती. हा दगड जिथे उभा आहे त्याच्या अगदी खाली पायथ्याला रेड स्टोन लागला आहे. जो दगड अत्यंत मऊ असतो, आणि शस्त्राला धार लावण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणून तो दगड लोक आणखी आणखी कोरून घेऊन जात आहे परिणामी त्या दगडाखलची कपार वाढत आहे. आणि काळजाला धडकी भरवणारी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

डोक्यावर उभा असलेला अजस्त्र कडा मागे टाकत आम्ही पुढे निघालो वाटेत इटूकल्या पिटुकल्या पिवळ्या जर्द फुलांचे असंख्य ताटवे डोळ्यांचे पारणे फेडत होते. आणि डोंगर कड्यावर हळवार ओघळणारे पाण्याचे थेंब अवचित शरीराचा ठाव घेत होते उन्हाची पडलेली सुंदर तिरीप उत्साह आणखी द्विगुणित करत होती. आम्ही झपाझप पावलं उचलून शिखराच्या दिशेने निघालो वाटेत असंख्य धबधबे मनाचा ठाव घेत उंच टोकावरून आवेगाने कोसळणारे शुभ्र पाण्याचे ओघळ नजर हटवू देत नव्हते त्यांच्या पाण्याने खाली कुठेतरी छोटासा डोह तयार केलाय आणि त्यातलं पाणी फेसळत पुढे पुढे रेंगाळत आहे. फेसळणारा डोह असंख्य हातांनी आपल्याला खुणावतो आहे की असा भास होत राहतो.

ही असली दृष्य तर आणखी खूप नजरेला पडायची बाकी होती आम्ही नजर वाळवून पावले उचलायला लागलो, त्या अजस्त्र कड्याला वळसा घेऊन जेंव्हा डोंगर माथ्याकडे जाणारी वाटचालू लागलो तेंव्हा आम्हाला वाटेत एक सुंदर नदी लागली, वाटेतल्या गोलगोल आणि न्हयाळचुट स्वच्छ दगडगोट्यातून आपला निर्मळ प्रवाह वाहवत नेणारी, आणि तिच्या प्रवाहात निर्माण झालेले असंख्य रांजणखळगे, तुडूंब भरून वाहवत होते…

अविचल वाहत राहणारे हे रांजण खळगे पाहून सहज वाटलं की कशाला तो डोंबारी राजा, हरिश्चंद्राला पाणी भरायचं काम देईल..?

तो नदीचा प्रवाह माघे टाकून जंगलात बारीक चणीच्या झाडातून मातीवरली निसरडी पाय वाट चालू लागलो, ही पायवाट म्हणजे दोघांसाठी असते एकतर तुफान पाऊस आला की स्वतः पाऊसच हिचा कब्जा घेतो एरवी ती माणसासाठी खुली असते, पावसाच्या वेगाने ती मुख्य जमिनीपासून खोल गेलीय आणि वाटेतल्या झाडांच्या मुळं चांगली गुडगाभर उघडी पडलीत त्या मुळांवर झोकात पाय देऊन चालण्याची मजाच वेगळी, हीच पायवाट किमान अर्धा तास चालल्यानंतर आपण डोंगर पठारावर पोचतो हाच तो हरिश्चंद्रगडाचा पठार…

पुढे आणखी थोडं अंतर चालून गेलं की हरिसचंदरेश्वराचे मंदिर लागत, कातीव दगडात बांधलेलं हे मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुनाच आहे.

हे मंदिर किमान दहाव्या शतकातलं असावं असं त्याच्या रचनेवरून जाणवतं, बाजूने भक्कम दगडाची तटबंदी आत जायला एकाच बाजूनव दरवाजा, तोही पूर्ण दगडात उभारलेला, मुख्य मंदिर हे जमिनीपासून पुरुषभर खोलीवर आहे. मंदिराच्या बुडापासून शिखरापर्यंत सगळी दगडं, दगडाच्या खांबावर अत्यंत माजबुतीचे जोड देत मंदिर उभारत नेलं आहे. मंदिराची उंची साधारण साठ फूट असावी, मंदिरावर सगळीकडे नक्षीकाम करण्यात आलं आहे, तर मंदिराच्या चारही बाजूला दगडांवर गुरांच्या खुरांच्या अकराच्या असंख्य खोबणी तयार करण्यात आल्या आहेत, त्या खोबणी खालपासून वरपर्यंत सर्वत्र आहेत, सांगितलं जातं की या खोबणीत सगळीकडे हिरे कोंबण्यात आले होतो, आणि दुरून कुठूनही हे मंदिर हिऱ्यांमुळे चमकत राहायचं, रात्री अंधारात किंवा चंद्रप्रकाशात याची मिजास काही औरच असायची, इतकी सुंदरता या हिऱ्यांमुळे या मंदिराला अली होती, पण या सगळ्या ऐकीव गोष्टी आणि दंतकथाच…

याचे थेट पुरावे त्या खोबणींशीवाय दुसरे काहीच नाहीत…

मंदिर पाहून आपण मंदिराच्या पाठीमागे असलेली थोडी चढण चढून तीव्र उतरला लागतो, थोड्याशा झाडीतून जाणार धीरगंभीर रस्ता आपल्याला थेट कोकणकड्यावर घेऊन जातो, कोकणकडा म्हणजे पृथ्वीलाच पडलेलं एक मोहक स्वप्न आहे, सह्याद्रीत असंख्य कोकणाकडे आहेत, पण हरिसचंद्रगडावर असलेल्या कोकणकड्याची सर कुठल्याच कड्याला येणार नाही असाच आहे तो. आपण जवळ जाईपर्यंत इथे कडा आहे हे आपल्या लक्षातच येत नाही, पुढे अचानक डोंगर कडे दिसणं बंद होत आणि अचानक हवा जोराने वाहू लागते बस समजून जायचं कोकण कडा आला, पावसाळ्यात तर इथे भरपूर धुकं असतं त्यामुळे हा कडा नक्की कुठे आहे हेच लक्षात येत नाही, ऑक्टोबरात कडा खूप चांगला दिसतो, साधारण अर्धा किलोमीटर लांबीचा चंद्रकोर रचनेचा हा कडा अगदी तीक्ष्ण आणि भीषण उताराने जमिनीत घुसला आहे. तो तेवढाच आतल्या बाजूलाही खचला असल्यामुळे त्याची भीषणता आणखीनच वाढली आहे.

समोर कोकणातले असंख्य डोंगर बुडापासून शेंड्यापर्यंत कातीव कातळातले चक्क नागडे बंब दिसत असतात, आणि नजर जाईल तिथपर्यंत सगळं कोकण नजरेत भरत राजतो… हा कडा इतका लयदार आणि सुंदर आहे की इथल्या टोकावरून पायच निघायला तयार होत नाही…

हे ही वाचा – 

या कड्याच्या प्रेमाची आणि त्यासाठी दिलेल्या आहुतीची एक खरीखुरी कहाणी सुद्धा आहे. जी कड्यावर आलं की आपल्याला पाहायला मिळतेच मिळते. मुंबईतल्या कुण्या एका वस्तीतला एक जिंदादील ट्रेकर या कोकणकड्यावर आला, त्याला हा कडा इतका आवडला की तो इथे पुन्हा पुन्हा येऊ लागला, नंतर नंतर तर दर रविवारी हमखास या कड्यावर यायचा आणि कड्याच्या भीषण दरीत आपले पाय मोकळे सोडून बसायचा, हळूहळू त्याचं वेडेपणा खूप वाढलं आणि एकदिवस तो कड्याच्या प्रेमात पडला तो कड्यावरून उठेनासा झाला, तो इथला सूर्योदय या कड्याच्या खांद्यावर बसून पाहायचा तर सुर्यास्तालाही तो इथेच बसून बाय बाय करायचा, सोसाट्याचा वारा ऊन धुकं त्याने इथेच बसून सारं सारं अनुभवलं…

आणि एकदिवस त्याला या कड्याला आपल्या प्राणप्रिय सख्याला, तो त्याच्यासाठी सखा होता की सखी होती माहीत नाही पण एक दिवस त्याने या कड्याला कडाडून मिठी मारायचं ठरवलं त्याच्यात सामावून जायचं ठरवलं त्या अजस्त्र खोल कातीव कातळ दरीत मिसळून जायचं ठरवलं आणि दोन्ही हात उंचावून तो दरीत झेपावला सुद्धा…

खोल कातळात कुठे गडप झाला माहीत नाही पण तो त्या दिवशी दरीचा झाला कड्याचा झाला… कोकणकड्याच्या प्रियकर त्याच्याभेटीसाठी कड्यावरूनच रवाना झाला…

त्याच्या या प्रेमाची माहिती देणारी एक पाटी इथे जमिनीत लावण्यात सुद्धा अली आहे. त्याचं आणि कड्याचं प्रेम हे कालातीत शाश्वत आणि चिरंतन होतं. त्याच्या या आठवणी अंगावर काटा उभा करतात आणि डोळे किंचित ओले करून जातात, त्याची ही आठवण मनात साठवून पुन्हा एकदा कड्याकडे पहायलं की हा कडा आणखीनच गूढ वाटू लागतो.

त्या दोघांनाही मुजरा करत आपण पाठ वळवतो आणि आभाळाच्या पोटात घुसलेल्या अजस्त्र तारामती शिखराकडे आपण चालू लागतो.

तारामती ही हरिश्चंद्राची बायको, जिने हरिश्चंद्रपेक्षा जास्त वनवास भोगला, तिच्या शेवटच्या काही काळात ती याच गडावर होती असं सांगितलं जातं, जो कडा आज तिच्या नावाने ओळखला जातो त्या कड्यावर तिची समाधीही असल्याचं सांगितलं जातं, आम्ही डोक्यापर्यंत वाढलेल्या गवतातून मार्ग काढत एक अत्यंत कठीण चढण चढत जाऊन तारामती कड्याच्या पायथ्याला पोचलो तिथली उंची ही भीषण आणि दगड हा अत्यंत तीव्र आणि कातीव त्याला भेदणं निव्वळ अशक्य, तिथे लावलेल्या लोखंडी रेलिंग चढून आम्ही कड्यावर दाखल झालो आणि उभा देश आमच्या नजरेच्या टप्प्यात आहे की काय असा भास होऊ लागला कारण एका बाजूला पिंपळगावजोगा धरण, दुसऱ्या बाजूला माळशेज घाट, पाठीमागे विस्तीर्ण कोकण, पुन्हा पश्चिमेला कळसुबाई अलंग मलंग कुलंद हे किल्ले आणि समोर रतनगड दिसू लागला किती मोहक आणि परिपूर्ण चित्र होतं धरत्रीच, हा नजारा नजर ढळू देत नव्हता आम्ही तो डोळ्यात साठवत काही अंतर चालून पुढे आलो आणि तिथे उंच टोकावर एक महादेवाची पिंड आणि काही कोरीव दगड दिसली साथीदारांनी सांगितलं हीच ती,

तारामतीची समाधी यामुळेच या कड्याला तारामती कडा नाव पडलंय…

पुढे समोरच्याच बाजूने आम्ही तो तारामती कडा उतरायला सुरुवात केली एका बाजूने पाच हजार फूट खोल दरी तर दुसऱ्या बाजूने हजार भर फूट खोलीची कड्याची तीव्र घसरण या दोन्हीच्या मध्ये असलेल्या दोन एक फूट रुंदीच्या रस्त्यावरून सोसाट्याच्या वाऱ्यात आम्ही तो कडा उतरला तो अनुभव म्हणजे जीवन मृत्यूच्या दारातला प्रवास होता.

कडा उतरून खाली आलो. हरिसचंद्रेश्वराचा मंदिरामागे असलेल्या कोरीव लेण्यांखालच्या टाक्यात साठलेलं शुद्ध आणि सात्विक पाणी घशाखाली उतरून हरिसचंद्राला पुन्हा एकदा नमस्कार करून आम्ही परतीची वाट चालू लागलो.

एव्हना सूर्य डोक्यावरून कलला होता, अंगातून घामाच्या धारा निघत होत्या आणि गरमी जाणवत होती, जी मळगंगा नदी तारामती कड्यावरून उगम पाऊण त्याच उतारावर खाली खडकात आपल्या प्रवाहाचे रांजण करून वाहते त्यातल्याच एका अजस्त्र रांजनात आम्हला डुबकी मारल्याशिवाय गत्यंतर नव्हतं, सगळी भीती धोका दडपून ठेवत आम्ही त्या अजस्त्र डोहात तुडुंब डुंबलो.

आणि पुन्हा तो काळजात धडकी भरवणारा हजार भर फूट उंचीचा अजस्त्र कातळ कडा उतरून खाली आलो.

येऊन आता काही दिवस उलटलेत पण अजूनही हरिश्चंद्रगड मनातून उतरायला तयार नाही, त्या अजस्त्र किल्ल्यानेच आता माझ्या मनात एक सुंदर घर केलंय ज्या घराचं मला आता दार बंदच करावं वाटत नाहीय..!

दत्ता कानवटे. (9975306001)

हे ही वाचा –