अपघातानं क्रिकेटमध्ये आलेला बापू, आता राडा करायला लागलाय

काडी पैलवान वाटावं असं शरीर, आत गेलेले गाल, पण मस्त उंची. रनअप पण फार मोठा नाय, फक्त पाच-सहा पावलं. पण विकेट काढायच्या म्हणलं, की नाद नाहीच. गेल्या काही सिरीजमध्ये तर भारताच्या पिचेसवर जितके अश्विन आणि जडेजा चालत नाहीत, तितका दंगा याचा असतो. आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना भाऊनी इतकी भारी बॉलिंग केली, की स्वतः कॅप्टन विराट कोहली म्हणला, ‘ए बापू, थारी बॉलिंग कमाल छे.’

इंग्लंड, न्यूझीलंड आणि आयपीएलच्या भल्या भल्या महारथींना हानिकारक ठरलेला बापू म्हणजे अक्षर पटेल.

अक्षर पटेल सध्या चर्चेत येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, त्यानं कानपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टाकलेली बॉलिंग. कारण किस्सा असा झाला होता, की कानपूर टेस्टमध्ये न्यूझीलंडचे बॅटर्स जम बसवत होते. आता रॉस टेलर, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स सध्या बेकार फॉर्ममध्ये आहेत. त्यात त्यांनी नांगर टाकला असता, तर भारताच्या हातातून पहिली टेस्ट गेल्यात जमा होतीच.

त्यात कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या तोंडावर १२ वाजले होते, कारण पटपट विकेट्स मिळत नव्हत्या. जसा बॉल फिरायला लागला, तसा त्यानं बॉल दिला अक्षर पटेलच्या हातात. त्यानं आधी अनुभवी रॉस टेलरला तंबूत पाठवलं, मग नंबर लावला हेन्री निकोल्सचा. टॉम लॅथम सेंच्युरी करणार असं वाटत होतं, कारण गडी खेळत होता ९५ रन्सवर. बापूनं आपलं जाळं विणलं आणि लॅथमही आऊट. तीन विकेटमुळं न्यूझीलंडच्या बत्त्या डीम झाल्या आणि टॉम ब्लंडेल आणि टीम साऊदीची विकेट काढत त्यानं एकूण पाच विकेट्स घेतल्या.

क्रिकेटच्या भाषेत डावात पाच विकेट्स घेण्याला, पंजा खोलणं असं म्हणतात. अक्षर आपल्या टेस्ट करिअरमधली फक्त पाचवीच टेस्ट खेळतोय. त्यात भावानं पाचव्यांदा पंजा खोललाय, म्हणजे गडी किती बेक्कार फॉर्ममध्ये आहे बघा. त्यात सध्याच्या टेस्टमधला न्यूझीलंडचा दुसरा डाव अजून बाकी आहे. त्यामुळं, बापू फिक्स म्हणत असणार- ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.’

तर हा झाला प्रेझेंट, आता तुम्हाला सांगतो इतिहास-

आता बरेच क्रिकेटर्स कसं लहानपणापासूनच आपल्याला क्रिकेट खेळायचंच आहे, हे डोक्यात फिक्स करून चालतात. क्रिकेट क्लब वगैरे लावतात. पण बापूच्या डोक्यात क्रिकेट खेळणं-बिळणं नव्हतंच. तो आपला अभ्यासाच्या मागं लागला होता. वय होतं १५ वर्ष. त्याच्या डोक्यात नक्की होतं, की आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअर बनायचंय. पण त्याचा एक मित्र धीरेन कंसारा याला शाळेच्या एका टूर्नामेंटसाठी एक प्लेअर कमी पडत होता. त्यानं बापूला विचारलं, की खेळणार का? आता मित्राला कसं नाय म्हणणार, त्यामुळं बापूपण मैदानात उतरला. तेव्हापासून अक्षरनं ठरवलं, आता सुट्टी नाही.

बरं घरून परमिशन मिळायचा पण काही विषय नव्हता, कारण बापूची सुकडी तब्येत बघून त्याच्या वडिलांना वाटत होतंच, की यानं जरा खेळ खेळावेत आणि शरीर कमवावं. त्यामुळं तेही हसत हसत तयार झाले.  

तेव्हापासून त्यानं डोमेस्टिक क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याला तुलनेनं लवकर संधी मिळाली, पण त्याचा म्हणावा तसा बोलबाला होत नव्हता. त्यामुळं जरा टेन्शनचं वातावरण होतंच. पण इंग्लंडविरुद्ध झालेल्या होम सिरीजमध्ये त्याला संधी मिळाली आणि अहमदाबादमधल्या आपल्या होम ग्राऊंडवर त्यानं इंग्लिश बॅटर्सना लेझीम खेळायला लावली. आता तीच गत त्यानं न्यूझीलंडचीही करायला घेतलीये.

आतापर्यंतचं अक्षरचं यश हा काय चमत्कार नव्हता, त्यानं लयवेळा सेटबॅक बसूनही मेहनत करणं सोडलं नाही. कधी संघात बसूनही खेळायची संधी मिळाली नाही, कधी पूर्ण सिरीजमध्ये फक्त पाणी वाटावं लागलं. पण प्रयत्नांती परमेश्वर म्हणून बापू ट्राय करत राहिला… आणि आता लय मोठ्या प्लेअर्ससाठी हानिकारकही ठरतोय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.