भारतीय जवानांनी सहज थांबवलेल्या रिक्षामध्ये मौलाना मसूद अझर होता.

२० फेब्रुवारी १९९४, काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील खनाबल हे छोटेसे गाव, सकाळची वेळ.

लोक आपापल्या कामधंद्याला जात येत होते.  लहान मूले शाळांना जायच्या गडबडीत होती. मुख्य चौकात तुरळक गाड्यांची येजा सुरु होती. भारतीय सीमासुरक्षा दलाचा कडक बंदोबस्त होता. तशी काही गडबड नव्हती पण काश्मीर मध्ये नेहमीच तणावाची स्थिती असल्यामुळे जागोजागी शस्त्रधारी जवान उभे असत. काश्मीरमध्ये नेहमी दिसणारे दृश्य.

त्याच वेळी एका जवानाला काय वाटले कुणास ठाऊक त्याने तिथून जाणारी एक रिक्षा तपासणीसाठी सहज थांबवली. रिक्षा थांबली पण त्यात बसलेले दोन दाढीवाले प्रवासी मात्र अचानक घाबरून धावू लागले. आर्मीचे जवान अलर्ट झाले. त्यांच्या लक्षात आले हे काही तरी गडबड आहे. या दोन्ही प्रवाशांचा पाठलाग सुरु झाला.

एक उंच काटकुळा आणि एक ठेंगणा जाड्या अशी दोन माणसे धावत आहेत आणि त्यांचा मागे हातात बंदुका घेतलेले जवान आहेत असे सिनेमाप्रमाणे थराररक दृश्य खनाबल गावाच्या रस्त्यांवर घडले. काही मिनिटातच चहूबाजूनी हल्ला करून या दोघांना जेरबंद करण्यात आले .

जेव्हा या दोघांना मोठया अधिकाऱ्यासमोर नेऊन उभे केले गेले तेव्हा त्या अधिकाऱ्याला त्यांचा चेहरा पाहून धक्का बसला. यामध्ये जो लंबू होता त्याचे नाव सज्जाद अफगाणी होते. त्याकाळी काश्मीर मध्ये अशांतता पसरवण्यात सर्वात पुढे असणारी दहशतवादी संघटना हरकत उल अन्सारचा तो चीफ कमांडर होता.

छोटीशी गडबड करणारे दंगेखोर समजून ज्यांना अटक केली त्यात त्याकाळचा सर्वात क्रूर दहशतवादी सज्जाद अफगाणी आहे हे कळल्यावर पूर्ण लष्करी छावणीमध्ये जल्लोष करण्यात आला. पण त्यांना तेव्हा ठावूक नव्हते की त्याच्यासोबत जो ठेंगणा जाड्या अतिरेकी होता तो त्या सज्जादपेक्षा महत्वाचा आणि त्याच्यापेक्षा कितीतर पटीने जास्त क्रूर होता.

त्याचे नाव होते मौलाना मसूद अझर.

पुढे जावून ज्याने जैश ए मोहम्मद या भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या सर्वात मोठया अतिरेकी संघटनेची स्थापना केली, भारताला हव्या असणाऱ्या मोस्ट वांटेड गुन्हेगारांच्या यादीतले वरचे नाव म्हणजेच मसूद अझर.

या दोघांची रवानगी पुढच्या तपासणीसाठी इंटेलिजन्स ब्युरोकडे करण्यात आली. आयपीएस अधिकारी अविनाश मोहनाने यांच्या कस्टडीमध्ये मसूद अझर आणि सज्जाद अफगाणीला आणण्यात आले. अविनाश मोहनाने एका मुलाखतीमध्ये म्हणतात,

“त्यावेळी मसूद अझर बद्दल जास्ती माहिती नव्हती. लांब दाढी आणि चेहऱ्यावरचे गंभीर भाव यामुळे तो एखादा विचारवंत वाटत होता. त्याला बोलते करायला जास्त त्रास करून घ्यावा लागला नाही. आमच्या एका जवानाने दिलेल्या एका थपडेनंतर तो पोपटासारखा बोलू लागला.”

मसूद अझरचा जन्म पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांतातल्या बहवालपूर येथे झाला. त्याचे वडील सरकारी शाळेमध्ये हेडमास्तर होते. घरात अतिशय धार्मिक वातावरण. मुफ्ती सईद नावाच्या आपल्या मित्राचं ऐकून मसूद अझरच्या वडिलानी त्याची शाळा बंद केली. मसूद तेव्हा आठवीत होता. त्याची रवानगी जामिया इस्लामिया या धर्माचे शिक्षण देणाऱ्या संस्थेत झाली. १९८९ मध्ये तो तिथून पासआउट झाला.

जामिया इस्लामियामध्ये अनेक विद्यार्थी हरकत उल मुजाहिदीन या कट्टर विचारांच्या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखाली आलेले होते. त्याकाळात अफगाणिस्तान मध्ये रशियन सैन्याने घुसखोरी केली होती. यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. रशियाचा प्रभाव मोडून काढण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधल्या दहशतवादी संघटनाना मोठे करण्याचे धोरण स्वीकारले. यातच हरकत उल मुजाहिदीन मोठी झाली.

मसूद अझरसुद्धा मौलाना फझल उल रेहमान याच्या प्रेरणेने अफगाणी जिहाद मध्ये सामील व्हायला निघाला.

अफगाणिस्तानमधल्या यावर या गावात दहशतवादी बनवण्याच्या ट्रेनिंगमध्ये मसूद अझरचा समावेश झाला. पण त्याची शरीरयष्टी पाहून त्याच्याकडून हे खडतर ट्रेनिंग पूर्ण होणार नाही हे तिथल्या अतिरेक्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याच्या हुशारीचा आणि लेखनकौशल्याचा वापर करण्याचे ठरवले. मसूदकडे सदा इ मुजाहिद या मासिकाची जबाबदारी देण्यात आली.

१९९३ मध्ये पाकिस्तानमध्ये अंतराष्ट्रीय दबावामुळे दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात येऊ लागली. अनेक जणांना अटक झाली, त्यावेळी मसूद अझरतिथून पळाला. झाम्बिया, अबुधाबी, सौदी अरेबिया या देशांमध्ये आपल्या संघटनेसाठी तो फंड उभा करू लागला. या देशातल्या तरुणांना जिहादच्या नावाखाली पेटवू लागला. हरकत उल मुजाहिदीनमध्ये त्याचे स्थान बरेच मोठे झाले.

जानेवारी १९९४ मध्ये त्याला काश्मीरची जबाबदारी सोपवण्यात आली. काश्मीरमध्ये तेव्हा मोठया कारवाया करणारी  हरकत उल अन्सार या संघटनेबरोबर कॉओर्डीनेशन बनवण्याचे काम त्याला देण्यात आले. यासाठी सज्जाद अफगाणी सोबत तो भारतात काश्मीरला निघाला. तेव्हा काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे भारत पाकिस्तान सीमा बंद होती.

सज्जादने त्याला बांगलादेशमार्गे भारतात येण्याचा सल्ला दिला. 

२९ जानेवारी १९९४ रोजी बांगलादेशच्या विमानातून मौलाना मसूद अझर दिल्ली विमानतळावर उतरला. त्याच्याजवळ पोर्तुगालचा ड्युप्लिकेट पासपोर्ट होता. एका ड्युटी अधिकाऱ्याने पोर्तुगीज न दिसत नाही पण तिथलं पासपोर्ट असणाऱ्या या माणसाला अडवले. तेव्हा मसूद म्हणाला,

“मै जनम से गुजराती हुं. मेरी परवरीश पोर्तुगाल मै हुई है.”

त्या बिचाऱ्या अधिकाऱ्याला हे खरे वाटले. त्यांनी त्याला जावू दिले. दिल्लीवरून मसूद अझर युपीच्या सहारनपुरला गेला आणि तिथून तडक तो काश्मीरला आला. तिथे सज्जाद अफगाणी आणि तो हे दोघे मिळून भारताविरुद्ध काश्मिरी युवकांना पेटवण्याचे काम करू लागले. आणि अशातच फेब्रुवारी १९९४ मध्ये त्यांची अटक झाली.

माजी आयपीएस अधिकारी अविनाश मोहनाने बऱ्याचदा त्याची चौकशी करण्यासाठी कोट बलवाल या जेल मध्ये जायचे. तो सुरक्षा अधिकाऱ्यांशी बऱ्याचदा अगदी व्यवस्थित बोलायचा. अफगाणिस्तान मध्ये घडणाऱ्या बऱ्याच दहशतवादी कारवायांची माहिती त्याने त्यावेळी दिली. पण तो नेहमी म्हणायचा की

” तुम्हांला माझ्या लोकप्रियतेची कल्पना नाही. मला तुम्ही जास्त दिवस जेल मध्ये ठेवूच शकणार नाही. पाकिस्तान आणि आयएसआयसाठी मी खूप महत्वाचा माणूस आहे. ते काहीही करून मला सोडवतील.”

त्याच्या या बोलण्याला कोणी सिरीयस घ्यायचे नाहीत. पण काहीच महिन्यात त्याच्या बोलण्याचा प्रत्यय आला. जुलै १९९५ मध्ये पाच परदेशी नागरिकांचे काश्मीरमध्ये अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडण्याच्या बदल्यात मसूद अझरच्या सुटकेची मागणी केली. ती भारत सरकारने धुडकावली. यावेळी यापैकी एका परदेशी नागरिकाचे शीर कापून धड पाठवण्यात आले. उरलेल्याचा कधी पत्ताच लागला नाही. त्यांचा ही खून झाला असण्याची शक्यता होती.

२४ डिसेंबर १९९९ मध्ये काठमांडू नेपाळ हून दिल्लीला येणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान हरकत उल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांनी कंदाहार येथे हायजॅक केले. या विमानातल्या प्रवाशांच्या प्राणाच्या बदल्यात मसूद अझरसह आणखी तीन दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली. 

3eceae5e042f24f68b962a402dbb8d79

या दहशतवाद्यांशी चर्चा करण्यासाठी वाजपेयी सरकारने अजित डोबल या गुप्तहेर अधिकार्याची नेमणूक केली पण या वाटाघाटीना यश आले नाही. एकमेकांवर दोष थोपवण्यात आले पण अखेर नाईलाज झाल्याने मसूद अझर आणि तीन अतिरेक्यांची सुटका केली.

याच अझर मसूदने पुढे भारताविरुद्ध मोठमोठे दहशतवादी हल्ले केले. २००८ सालचा मुंबई हल्ला, २०१६ सालचा पठाणकोट हल्ला आणि परवा झालेला पुलवामा हल्ला या आणि अशा अनेक कारवायामागचे मास्टरमाइंड मौलाना मसूद अझर हाच आहे.

मुंबई हल्ल्यानंतर त्याला भारत सरकारच्या दबावामुळे काही वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र गेली काही वर्ष तो पाकिस्तानमध्ये राजरोस पणे खुलेआम फिरताना दिसतो. अनेकदा युनो मध्ये त्याच्यावर पूर्णपणे बंदी घातली जावी यासाठी प्रयत्न होतात. मात्र चीनच्या नकाराधीकारामुळे मसूद अझरला युनोने अजूनही जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेले नाही आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.