राहुल द्रविडला ‘द वॉल’ हे नाव बॅटिंगमुळं नाही तर, जाहिरातीमुळं पडलं होतं…

राहुल द्रविड. भारतीय संघातलं सगळ्यात गुणी नाव. आजही कित्येक जणांना आवडता प्लेअर कोण? हे विचारलं, तर सचिन, विराट, धोनी यांच्या आधी नाव येतं राहुल द्रविडचंच. शांत स्वभाव, आकृतीबद्ध वाटावी अशी सुंदर बॅटिंग आणि त्याचं मैदानाबाहेरचं वागणं. या सगळ्याच गोष्टी जगात भारी होत्या…

द्रविड आणि डिफेन्सचं जितकं अतूट नातं होतं, तितकंच द्रविड आणि जाहिरातींचंही. म्हणजे द्रविडनं काय लय जाहिराती केल्या नाहीत, पण जितक्या केल्या… लय बाप केल्या. फक्त वडिल या कंपनीमध्ये होते, म्हणून त्यानं किसान जॅमची जाहिरात केली. सगळ्या जगाला द्रविड चिडलाय हे दुर्मिळ दृश्य क्रेडच्या जाहिरातीमुळं पाहायला मिळालं. ‘इंदिरानगर का गुंडा’ म्हणणाऱ्या द्रविडची जाहिरात बेक्कार सुपरहिट झाली. आज द्रविडच्या आणखी एका जाहिरातीचा किस्सा सांगतो…

द्रविडचं टोपणनाव काय? असा प्रश्न जरा क्रिकेट आवडणाऱ्या कोणालाही विचारा… तो शून्य मिनिटात सांगतो ‘द वॉल.’ दुसरा प्रश्न विचारा हे नाव कसं काय पडलं असेल? आपल्या आठ पिढ्या क्रिकेट खेळत असल्यासारखं तो सांगेल, ‘भाऊ द्रविड कसला भारी खेळतो. त्याचा डिफेन्स कसला बाप ए. कितीही जोरात बॉलिंग टाकली, तरी गडी हलत नाय. असा निवांत बॉल प्लेड करतो. कितीही वेळ खेळू शकतो म्हणून तो आपली भिंत आहे. म्हणून द वॉल म्हणतात, नाद नाही भाऊचा.’

त्याचं उत्तर ऐकून घ्या आणि मग शांतपणे त्याला सांगा, की गड्या तू सपशेल चुकलाय. तुम्हालाही असंच वाटत असेल, तर भिडूंना तुम्हीही चुकलाय… आता तुम्हाला या निकनेम मागची खरी स्टोरी सांगतो.

तर द्रविडला हे नाव पडलं, एका जाहिरातीमुळं. रिबॉक नावाचा एक लय फेमस ब्रँड आहे, सध्या जरा त्याची क्रेझ कमी झालेली असली, तरी कधीकाळी रिबॉकचा पॅटर्न लय वाढीव होता. हा ब्रँड चर्चेत आणण्यामागं भारतीय क्रिकेट टीमचाही लय मोठा रोल होता. आपला धोनी आरबीके लिहिलेली बॅट वापरायचा, पण त्याही आधीपासून रिबॉक आणि क्रिकेटर्सचं नातं होतं. एकदा भारतीय टीममधले तीन खेळाडू रिबॉकची जाहिरात करणार होते.

हे तिघं होते, मोहम्मद अझरुद्दीन, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड.

या जाहिरातीसाठी तिघांना टोपणनावं देण्यात आली. नुसत्या मनगटाच्या जोरावर समोरच्या टीमचा बाजार उठवणारा अझरुद्दीनला टोपणनाव देण्यात आलं, द असॅसिन. ज्याची बॉलिंग समोरच्या टीमभोवती वेटोळं घालायची तो कुंबळे ठरला, द वायपर. पण राहुल द्रविडला असलं खुंखार नाव शोभून दिसलंच नसतं.

जाहिरात बनवणाऱ्या टीमनं लय विचार केला, द्रविडच्या बॅटिंगचा लय अभ्यास केला, त्यांनी बघितलं की द्रविड काय लांब लांब छकडे मारणारा प्लेअर नाय. पण गडी कितीही प्रेशर आलं, तरी पॅनिक होऊन आऊट होत नाही. त्यामुळंच त्यांना नाव सुचलं… द वॉल. थोड्याश्या ॲटिट्यूडमधला द्रविडचा फोटो चांगलाच हिट झाला आणि सोबतच त्याचं टोपणनाव पण. ‘द वॉल.’

आता अझरुद्दीनचं नाव घेतल्यावर त्याला कुणी द असॅसिन म्हणत नाय, कुंबळेला फार फार तर जम्बो म्हणतात पण द वायपर नाही. एक मात्र आहे, द्रविडचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर त्याचा शांत चेहरा येतो, त्याचा आकृतीबद्ध डिफेन्स येतो आणि एक नाव येतं, द वॉल!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.