राजकारणातील निवृत्तीच्या ८ वर्षानंतर हा नेता देशाचा राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून आला…!!!

 

देशाच्या राष्ट्रपतीपदी सामान्यतः सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचीच निवड होते कारण राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी आवश्यक असणारं समर्थन जमा करणं सत्ताधारी पक्षाला सहज शक्य होतं. असं असलं तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सर्वसंमतीने झाल्याची फारशी उदाहरणे आपल्या राजकीय इतिहासाची पाने चाळताना आढळत नाहीत. आतापर्यंतच्या इतिहासात फक्त एकंच वेळा असं झालंय की राष्ट्रपतीपदाची निवड बिनविरोध पद्धतीने झालीये. १९७७ साली नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध पद्धतीने राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले देशाचे पहिले आणि एकमेव राष्ट्रपती ठरले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचण्याचा रंजक प्रवास ‘बोल भिडू’च्या वाचकांसाठी.

नीलम संजीव रेड्डी. काँग्रेस पक्षाकडून १९६९  सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढलेले आणि त्यात पराभूत झालेले पहिलेच काँग्रेस नेते. ही तीच निवडणूक होती ज्यात देशाच्या राजकीय इतिहासात प्रथमच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला होता. वराह व्यंकट गिरी यांच्या रुपात प्रथमच एक अपक्ष म्हणून लढलेला माणूस देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाला होता. याच निवडणुकीनंतर प्रथमच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या व्यक्तीची स्वतःच्याच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ही तीच निवडणूक होती ज्यातील पराभव जिव्हारी लागल्याने नीलम संजीव रेड्डींनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. शिवाय त्यामुळेच  १९७७ साली ज्यावेळी त्यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रपतीपदासाठी ठेवण्यात आला त्यावेळी जर आपल्या नावावर सर्वपक्षीय सहमती होत असेल तरच आपली राष्ट्रपती बनण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

१९१३ साली आंध्र प्रदेशमधील अनंतपुर जिल्ह्यातील इल्लूर गावात  जन्मलेल्या नीलम संजीव रेड्डी यांनी १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेतला होता आणि ते पहिल्यापासूनच काँग्रेसमध्ये सक्रीय होते. संविधान सभेत मद्रास प्रांतातील प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. १९५३ साली ज्यावेळी आंध्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आणि १९५६ साली झालेल्या भाषावार प्रांत रचनेनुसार ज्यावेळी आंध्र प्रदेशची स्थापना करण्यात आली त्यावेळी ते  आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री झाले. पुढे ते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील झाले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी २ वेळाजबाबदारी सांभाळली होती.

एकूण काय तर रेड्डी यांचा राजकीय कारकीर्दीचा ग्राफ कायमच चढता राहिला होता. १९६९ सालच्या राष्ट्रपतीपदाची  निवडणूक मात्र अतिशय नाटकीय ठरली. या निवडणुकीत काँग्रेसने पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून नीलम संजीव रेड्डी यांना आपली उमेदवारी दिली होती. परंतु त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या नेत्या आणि देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विरोध होता. इंदिरा गांधींनी व्ही.व्ही. गिरी यांना रेड्डी यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभं केलं होतं आणि काँग्रेस नेत्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्या विवेकानुसार मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे निवडणुकीत रेड्डी यांचा पराभव झाला. हा पराभव रेड्डी यांच्या इतका जिव्हारी लागला की लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी म्हणून त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण त्यानंतर त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या मूळ गावी जाऊन शेती करायला सुरुवात केली.

nsr
नीलम संजीव रेड्डी

१९६९ साली सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या रेड्डी यांचा परत राजकीय आखाड्यात प्रवेश झाला तो १९७५ सालच्या संपूर्ण क्रांती आंदोलनादरम्यान. या राजकीय प्रवेशाचा किस्सा देखील रंजक आहे. आपल्या Without Fear Or Favour या आत्मचरित्रात रेड्डी यांनीच त्याविषयी लिहिलंय. ते लिहितात की, “संपूर्ण  क्रांती आंदोलनादरम्यान एक सभा घेण्यासाठी जयप्रकाश नारायण हैद्राबादला आले होते. योगायोगाने मी देखील त्या दिवशी शहरातच असल्याने जयप्रकाश नारायण यांचं भाषण ऐकण्यासाठी म्हणून सभेच्या ठिकाणी गेलो आणि लोकांमध्ये जाऊन बसलो. पण जे.पी. सोबतच्या काही कार्यकर्त्यांनी मला ओळखलं आणि त्याविषयी जे.पी.ना सांगितलं. त्यानंतर जे.पी.च्या बोलावण्यावरून मला इच्छा नसतानाही स्टेजवर जाऊन भाषण द्यावं लागलं”

जयप्रकाश नारायण यांनी रेड्डी यांचं मन वळवलं आणि ते परत राजकारणात सक्रीय झाले. १९७७ सालची लोकसभा निवडणूक त्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावर लढवली आणि निवडून देखील आले. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश मधून त्यावेळी लोकसभेवर निवडून गेलेले ते काँग्रेसव्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचे एकमेव उमेदवार होते. १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. इंदिरा गांधी स्वतः निवडणूक हरल्या  आणि मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचं सरकार देशात स्थापन झालं. नीलम संजीव रेड्डी यांची दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण या पदावर ते फक्त ३ महिने १७ दिवसच राहिले कारण नंतर राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. लोकसभेच्या अध्यक्षपदी सर्वात कमी काळ राहण्याचा विक्रम देखील यावेळी त्यांच्या नावावर जमा झाला, जो अजूनपर्यंत त्यांच्याच नावावर आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इतर अनेक जणांनी अर्ज भरले परंतु सर्वच अर्ज पुरेसं समर्थन नसल्याच्या कारणावरून निवडणूक अधिकाऱ्याने नाकारले आणि देशाच्या इतिहासात प्रथमच नीलम संजीव रेड्डी यांची राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली. १९८२ पर्यंत त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते परत आपल्या मूळ गावी स्थायिक झाले. १ जून १९९६ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.