आमच्या काळात खोकल्यावर रामबाण उपाय असायचा तो खो-गो गोळी

सध्या सगळ्यात जास्त दहशत आहे ती खोकल्याची. चारचौघात एखादा खोकला तर टरकन फाटते. कशी टरकन. कोरोनाच्या दहशतीमुळे हल्ली साध्या खोकल्यावर देखील निर्बंध आले आहेत.

सध्या खोकल्यावर एकसे-एक उपाय आहेत. नवनवीन गोळ्यांची यादी द्यायला आम्ही काही ़डॉक्टर नाही आणि त्यातही कुठल्या गोळीचा काय साईडइफेक्ट होईल हे सांगता येत नाही.

पण पूर्वीच्या काळी अस नव्हतं. खोकला म्हणलं की फक्त एकच गोळी रामबाण उपाय म्हणून ओळखली जायची,

ती म्हणजे खो-गो.

खोकला म्हणलं की खो-गो हेच जुन्या काळाचं समीकरण. बऱ्याच जणांना खो-गो चं नाव काढलं की, व्यंगचित्रातून येणाऱ्या त्यांच्या आकर्षक जाहिराती आठवतात. व्यंगचित्रातून जाहिरात करण्याची कल्पना अमुल वाल्यांची मात्र त्यापुर्वीपासून ही गोळी लोकांपर्यन्त अशा कल्पक पद्धतीने पोहचवण्याचं क्रेडिट खो-गो ब्रॅण्डलाच जातं.

खो-गो हा अहिल्या आयुर्वेदिक औषधालय या कंपनीचा ब्रॅण्ड आहे. मुरलीधर महादेव रेडकर यांनी या कंपनीची स्थापना केली. आज तिसरी पिढी हा ब्रॅण्ड यशस्वीपणे लोकापर्यन्त घेवून जात आहे.

मुळचे मालवणचे असणारे रेडकर गिरगावात रहायला होते. इथेच त्यांनी खोकल्यासाठी गुणकारी औधष तयार करण्याचा शोध घेतला. एकतर लोकांना परवडेल अशी गोळी असावी व ती तितकीच गुणकारी असावी या दोन निकषावर खो-गो गोळीचं उत्पादन करण्यात आलं.

गोळी तयार केल्यानंतर त्याच नाव काय असाव याचा विचार करण्यात आला. खोकल्यातला खो आणि इंग्लिशमधला गो घेवून खो-गो घेण्यात आलं. आज ज्या प्रकारे कोरोना-गो चालू आहे तशाचं प्रकारची ही संकल्पना होती.
खो-गो गोळी करताना मुरलीधर रेडकर यांच्या डोक्यात एकच विचार होता तो म्हणजे लोकांना ती पाकिटात घेवून जाता येईल, आणि पैशाच्या दृष्टिकोनातून ती सर्वांना परवडेल.

या दोन्ही गोष्टी खो-गो ने साध्य केल्या होत्या.

खो-गो बाजारात उतरवण्यात आली ते साल होतं १९६१ चं. सुरवातीला गिरगाव भागातल्या एका छोट्या मेडिकलमध्ये ही गोळी मिळायची. त्यानंतर ती मुंबईच्या दुकानात मिळू लागली. परवडेबल असल्याने त्या काळात सुमारे १९० विक्रेत्यांची चेन या गोळीच्या माध्यमातून उभा राहिली.

मुरलीधर रेडकर यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव हेमंत रेडकर यांनी हा ब्रॅण्ड महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवण्यासाठी मदत केली. त्यासाठी व्यंगचित्रांच माध्यम वापरण्यात आले.

जेष्ठ कार्टूनिस्ट अशोक पत्की यांनी हे व्यंगचित्र काढले होते.

व्यंगचित्रांच्या माध्यमातून घराघरात खो-गो ची गोळी पोहचली आणि खोकला दूर करण्यास मदत झाली. मुरलीधर रेडकर त्यांचे चिरंजीव हेमंत रेडकर व आज हेमंत रेडकर यांचे चिरंजीव मुरलीधर रेडकर हे आज कंपनीचा कारभार यशस्वीपणे हाकत आहेत.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.