आजही पुण्या-मुंबईला एकमेकांशी जोडणारी गोष्ट म्हणजे ‘मगनलाल चिक्की’

१८५७ च्या उठावानंतरचा काळ. भारतावर इंग्रजांची पकड मजबूत झाली होती. आता इंग्लंडची राणीच आपली मायबाप आहे असं वाटून घेऊन त्यांच्या विरुद्धचे सगळे बंड थंडावले होते. ब्रिटिशांनी व्यापार वाढवण्यासाठी भारतात दळणवळणाची साधने निर्माण करण्यावर भर दिला होता. एकंदरीत विकासाच्या माध्यमातून लुट असा तो प्रकार होता.

यामध्ये त्यांचा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता मुंबई-पुणे लोहमार्ग.

मुंबईला दक्षिण भारताशी जोडण्यासाठीचं पाहिलं पाऊल होत. या लोहमार्ग निर्मितीमधला सर्वात मोठा अडथळा होता खंडाळ्याच्या घाटाचा.जगावर राज्य करणारे इंग्रज निसर्गापुढे हार मानणारे नव्हते. आधुनिक ब्रिटीश तंत्रज्ञान आणि हजारो भारतीय कष्टकरी हातांनी खंडाळ्याच्या घाट फोडला. तब्बल २५ बोगदे बनवून मुंबईला पुण्याशी जोडलं. त्याकाळातला हा चमत्कारच होता.

हा चमत्कार साध्य करण्यासाठी भारतीय मजूर राबत होते. प्रचंड थंडी, पाऊस याच्याशी सामना देत होते. अशावेळी त्यांचा आहार त्यांच्या श्रमाला पुरेसा नव्हता. काम करणारे कामगार चक्कर येऊन पडणे हा तर रोजचा परिपाठ झाला होता. ब्रिटीश अधिकारी सुद्धा या प्रकाराने हवालदिल झाले होते.

लोणावळ्यामध्ये भेवरजी अगरवाल नावाचे सदगृहस्थ होते. राजस्थान मधून आलेल्या अगरवाल यांच लोणावळ्यामध्ये मिठाईचं दुकान होत. दुकानाचे नाव मगनलाल मिठाई. आपल्या लाडक्या मुलाच्या नावान त्यांनी हे मिठाईच दुकान सुरु केलं होत.

अगरवाल शेठना रोज चालले कामगारांचे हाल दिसत होते. बनिये का दिमागाला तिथे धंद्यासाठी वाव दिसत होता. त्यांना आठवल राजस्थानला त्यांच्या गावाकडे गुळभाकरी म्हणून प्रकार असतो. याच धरतीवर शेंगदाणे आणि गुळ एकत्र करून त्यांनी गुडदानी बनवण्याचा प्रयोग केला.

हे दोन्ही पदार्थ लोणावळ्यामध्ये सहज उपलब्ध होते त्यामुळे किंमतसुद्धा जास्त नव्हती. थंडीत आणी पावसात भरपूर दिवस टिकणारी तत्काळ उर्जा देणारी आणि विशेष म्हणजे खिशाला परवडणारी पौष्टिक गुडदानी रेल्वे मजुरांच्यात लगेच हिट झाली.

भेवरजी यांच्या पाठोपाठ मगनलाल आणि त्यांचे दोन सुपुत्र अंबालाल, मोहनलाल यांनी गुडदानी च्या धंद्याला बरकत आणली.

फक्त रेल्वे कामगारच नाही तर लोणावळा स्टेशनला थांबणाऱ्या रेल्वेप्रवाशांमध्ये ही गोड गुडदानी खूप फेमस झाली.  गुडदानी खरेदी करताना उडालेल्या झुंबडीमुळे अनेकांची रेल्वे मिस होऊ लागली.

अखेर रेल्वे प्रशासनाला गुडदानीकडे लक्ष देणे भाग होते.

मुंबई पुणे रेल्वेचा लोणावळ्याच्या हॉल्टचा वेळ वाढवण्यात आला. याशिवाय अगरवाल शेठना अधिकाऱ्यांनी रेल्वे मध्ये पॅकेजमधून गुडदानी विकण्याची विनंती केली. अंबालाल अगरवाल यांनी डोके लढवून आज आहे ते पॅकेजिंगला सोपे असे रूप गुडदानीला दिले. आता प्रश्न आला नावाचा. ब्रँड म्हणून सगळ्यांच्या तोंडात हे नाव बसले पाहिजे. खूप विचार केल्यावर त्यांना नाव सुचले,

“चिक्की”.

 गुडदानीला अख्ख्या देशभर चिक्की म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

निसर्गसौंदर्याने नटलेले लोणावळा शहरात पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पण या निसर्गसौंदर्यापेक्षाही लोणावळ्याची चिक्की काकणभर जास्तच फेमस आहे. आज तिथे मगनलाल चिक्की नावाची शेकडो दुकाने झाली आहेत. विविध फ्लेव्हर मध्ये मिळणारी मगनलाल चिक्की परदेशातही एक्स्पोर्ट होते. रेल्वेच्या कामगारांसाठी बनलेली चिक्कीने लोणावळ्याला जगभरात पोहचवल.

आजही लोणावळ्यामध्ये जाऊन चिक्की न घेता आले तर फाउल पकडण्यात येते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.