हे मंदिर ब्रिटीश अधिकाऱ्यानं बांधलय. ते पण बायकोचा नवस पुर्ण करण्यासाठी.

मध्य प्रदेशातील आगर मालवा या ठिकाणी महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरासंदर्भातील एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. असं सांगतात की हे  हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असणारं भारतातील एकमेव मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केला होता.

१८७९ साली ब्रिटिश सैन्य अफगाणिस्तानमध्ये तेथील पठाणांशी लढत होतं. ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व लेफ्टनंट कर्नल मार्टिन हे करत होते. मार्टिन यांची पत्नी मध्य प्रदेशातील आगर मालवा या ठिकाणी वास्तव्यास होती.

लेफ्टनंट कर्नल मार्टिन हे दररोज आपल्या पत्नीला पत्र लिहीत असत आणि आपली ख्यालीखुशाली कळवत असतं. युद्धभूमीवरचा इतिवृत्तांत देखील या पत्रांमध्ये असे, पण

एका दिवसापासून अचानकच मार्टिन यांचे पत्र येणं बंद झालं.

Screen Shot 2018 07 06 at 9.55.39 AM
कर्नल मार्टिन

युद्धभूमीवर लढत असलेल्या आपल्या नवऱ्याची खुशाली कळत नसल्याने लेडी मार्टिन काळजीत पडल्या. चिंताग्रस्त राहू लागल्या. आशावेळी गावातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेवाच्या मंदिराबद्दल कुणीतरी त्यांना सांगितलं. लेडी मार्टिन यांनी मंदिरात जायचं ठरवलं.

लेडी मार्टिन ज्यावेळी मंदिरात पोहोचल्या त्यावेळी देखील त्या पतीच्या सुरक्षेच्या विचाराने काळजीत होत्या. मंदिरातील पुजाऱ्याने लेडी मार्टिन यांना काळजीचं कारण विचारलं, त्यावेळी त्यांनी पुजाऱ्याला युद्धाबद्दल सांगितलं. आपले पती सुरक्षित असतील की नाही याबद्दल आपण चिंतीत असल्याची माहिती दिली.

मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिराची आणि महादेवाची महती लेडी मार्टिन यांना सांगितली आणि महादेव कुठल्याही परिस्थितीत आपल्या भक्तांचं रक्षण करतो असं सांगितलं. आपणही महादेवाची भक्ती करावी असा सल्ला पुजाऱ्याने लेडी मार्टिन यांना दिला.

पुजाऱ्याच्या सांगण्यावरून लेडी मार्टिन यांनी ११ दिवसांचं ‘लघुरुद्र अनुष्ठान’ करण्याचा निर्णय घेतला. ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचं पठण त्यांनी सुरू केलं.

आपला पती जर युद्धभूमीवरून सुखरूप परतला तर आपण मंदिराचा जीर्णोद्धार करू असा नवस त्यांनी महादेवाजवळ बोलला.

लेडी मार्टिन यांनी सुरू केलेल्या अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी लेडी मार्टिन यांना एक पत्र मिळालं. पती लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांचं ते पत्र होतं. या पत्रात आपण सुखरूप असल्याचं मार्टिन यांनी पत्नीला कळवलं होतं.

लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांनी पत्रात लिहिलं होतं की, ” युद्धादरम्यान मी कायम तुला पत्र लिहीत असे पण एके दिवशी अचानक आमच्या सैन्याला पठांणांनी चहूबाजूंनी घेरलं. पठाणांनी मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला. अनेक ब्रिटिश सैनिक मारले गेले. आम्ही युद्ध हरणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण अचानक एक योगी युद्धभूमीवर अवतरला. त्याच्या डोक्यावर लांबच लांब जटा होत्या आणि हातात त्रिशूळ होता. या योगी माणसाचं तेजस्वी रूप आणि युद्धभूमीवरील कौशल्य बघून पठाण युद्धभूमीवरून पळून गेले आणि हारत चाललेलं युद्ध आम्ही जिंकलो. आमचे प्राण देखील वाचले”

काही दिवसांनी लेफ्टनंट कर्नल मार्टिन आगर मालवा येथील ब्रिटिश छावणीत परतले त्यावेळी पत्नीने त्यांना आपण महादेवाजवळ बोललेल्या नवसाविषयी सांगितलं. त्यामुळे मार्टिन पत्नीसह महादेवाच्या दर्शनाला गेले. मंदिरातील महादेवाची मूर्ती आणि युद्धभूमीवरील योगी यांमध्ये कर्नल मार्टिन यांना विलक्षण साधर्म्य आढळलं. ती मूर्ती बघताच मार्टिन महादेवाच्या चरणी लीन झाले आणि ते देखील महादेवाचे भक्त झाले.

पत्नीचा नवस पूर्ण करण्यासाठी मार्टिन यांनी १५००० रुपये दान दिलं आणि त्यातूनच आगार मालवा येथील बैजनाथ महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरातील शिलालेखवर आज देखील या गोष्टीचा उल्लेख बघायला मिळतो.

Leave A Reply

Your email address will not be published.