कितीही नवी कॅलेंडरं येऊ द्या, जत्रेची तारीख बघायला महालक्ष्मीच लागतंय

”जगू औंदा पावसाचं कसं मग” उन्हाळा संपायला आला की आमच्या आबाचा जगू तात्याला ठरलेला प्रश्न. ”रोहिण्या निघाल्यात येइल लवकरच” स्वतः इंद्रदेव असल्याच्या कॉन्फिडन्स मध्येच मग जगू तात्या रिप्लाय देणार. पुढं जाऊन आता मेंढ्याचं वाहन निघालय म्ह्टल्यावर पाऊसाची काय खरं न्हाय, म्हैस हाय म्हटल्यावर कामापुरता पडंल असं काहीतरी तात्या हवामान खात्याला लाजवेल एवढ्या डीप मध्ये जाऊन सांगायचे.

आम्हाला ह्यातला काय कळायचं नाही, पण जगूतात्या पंचांगावरनं सांगतंय एवढं लोकं म्हणायची. आता जगू तात्याची आमच्यासारखीच शेती मग याला पंचांग कसं कळतंय बघावा म्हटलं म्हणून जगू तात्याचा घरी गेलो. तर जगू तात्या नेमकंच कॅलेंडर उघडून बसलेला.

थोडी चौकशी केल्यावर तात्या लग्नाच्या तारखा, पोरांची नावं, नवी वस्तू घ्यायला तारीख नुसत्या कॅलेंडरवरनं काढतोय असं कळलं.

आणि जगू तात्याचं अशी सगळी माहिती देणारं ऑलराऊंडर कॅलेंडर होतं आपलं महालक्ष्मी.

महाराष्ट्रातील आज अशी कुठली मोठी जत्रा नसेल ज्याची तारीख महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये सापडणार नाही. अगदी ‘सटरफटर’ महाराजांची पुण्यतिथी सुद्धा या कॅलेंडरात बघायला मिळतेय. त्यामुळं जवळपास सगळ्याच घरात हेच कॅलेंडर भिंतीवर टांगलेलं दिसतंय.

 ‘महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे’ अशी साधी सरळ जाहिरात करून सुद्धा वर्षानुवर्ष हेच कॅलेंडर नवीन वर्षात घरी येतं.

तर महालक्ष्मी कॅलेंडरची सुरवात दत्तात्रय नामदेव शिर्के उर्फ ​​डी.एन. शिर्के यांनी केली म्हणता येइल. शिर्केकाका हे पट्टीचे पेंटर, फोटोग्राफर आणि ज्योतिषशास्त्रज्ञ होते. म्हणजे आपल्या कॅलेंडरसारखेच ऑलराऊंडर व्यक्तिमत्व. त्यांनी सुरवातीला कोल्हापुरात रबर स्टॅम्प बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.

हा व्यवसाय चालू असताना सामान्य माणसाला सहज समजेल अशा पद्धतीचं पंचांग काढायची आयडिया त्यांना सुचली.

त्यांनी मग अशा प्रकारचं एक पंचांग १९४४ मध्ये त्यांनी ‘डी. एन. शिर्के अँड सन्स’ या  नावानं बाजारात आणलं.

आपल्याला येत असलेल्या पेंटर, फोटोग्राफी यांचा वापर अत्यंत खुबीनं करून शिर्केकाकांनी डिझायन केलेलं हे पंचांग अल्पावधीतच कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव या भागात प्रचंड लोकप्रिय झालं. त्यांची तीन मुलं श्रीपाद, जयवंत आणि सदाशिव ही सुद्धा त्यांच्यासोबत या पंचांग व्यवसायात काम करत असत.

पुढे १९७७ मध्ये सदाशिव शिर्के यांनी त्यांच्या दोन भावांसह वडिलांकडून पंचांग व्यवसायाची जबाबदारी घेतली. त्यांनी पहिल्यांदा १९७७ मध्ये त्यांच्या वडिलांनी १९४४ मध्ये प्रकाशित केलेल्या पंचांगाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली. म्हणजे रीब्रॅंडिंगच केली म्हणा ना .त्यांनी या पंचांगाचे नाव ‘श्री महालक्ष्मी पंचांग दिनदर्शिका’ असे ठेवले. पंचांगासारखीच हि दिग्दर्शिका महाराष्ट्रात तुफान चालली.आज श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्रातील सर्व शहरे आणि गावांमध्ये आयोजित सर्व सण आणि जत्रे, यात्रा, जत्रा, उरूस इत्यादी कार्यक्रमांची विस्तृत माहिती मिळते. 

सदाशिव शिर्के हे द्रष्टे पुरुष होते. त्यांनी पंचांग व्यवसायाचा ५ राज्यांमध्ये विस्तार केला आणि मराठी व्यतिरिक्त इतर भाषांमध्येही पंचांग प्रकाशित केले. पंचांग छापण्याच्या उद्देशाने त्यांनी छापखानाही काढला. आज हे मुद्रणालय प्रीमियर प्रिंटर म्हणून लोकप्रिय आहे.

सदाशिव शिर्के यांच्याच कार्यकाळात त्यांनी वार्षिक पन्नास लाख प्रतींच्या विक्रीचा आकडा ओलांडला होता. 

आज मोबाइलवर पण महालक्ष्मी येतंय पण भिंतीवरच्या कॅलेंडरसारखा फील त्यात नाही. बाकी आमच्या जगूतात्यासारखं तुम्ही पण या कॅलेंडरचा फुल्ल पैसा वसूल उपयोग करत असाल तर आम्हाला जरूर सांगा. आणि हा नवीन वर्षाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा आणि येणारं वर्ष तुम्हाला महालक्ष्मी कॅलेंडर सारखं कलरफुल आणि अर्थपूर्ण जावो हीच प्रार्थना.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.