एक भाड्याने डिव्हीडी घेतली, त्याचा दंड भरावा लागला म्हणून नेटफ्लिक्सचं साम्राज्य उभा केलं

नेटफ्लिक्स म्हणजे काय? आत्ता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का?

तर भिडूंनो प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीतलं माहितीच असतं अस नसतं. आपलं काम असतं ते म्हणजे लोकांना विस्कटून सांगायचं. आत्ता नेटफ्लिक्स म्हणजे काय तर महिन्याला पैसे देवून पहायचं. जस यु ट्यूब असतं तसच नेटफ्लिक्स असतं. यू ट्यूबवर मात्र कचरा असतो.

काहीही शूट करून कोणीही तिथे वाटेल ते टाकू शकतो. नेटफ्लिक्सवर मात्र तस नसतं. नेटफ्लिक्स इतर प्रोडक्शन हाऊसकडून पिक्चर, सिरीज, डोक्युमेंटरी विकत घेतं. स्वत: पैसे लावून आपलं ओरीजनल मटेरियल तयार करतं आणि घरबसल्या थिएटरचा फिल देतं.

यासाठी ठराविक पैसे असतात. एका मेंबरशिपवर पाच लोकं वेगवेगळ्या ठिकाणावरुन नेटफ्लिक्सवरचे शो पाहू शकतात. इतकं साधं असतं ते.

असो नेटफ्लिक्सची जाहिरात बास करून आत्ता नेटफ्लिक्सचा इतिहास सांगू… 

नेटफ्लिक्सची सुरवात एक डीव्हीडी भाड्याने देणारी कंपनी म्हणून झाली. 

नेटफ्लिक्सची स्थापना एक डिव्हीडी भाड्याने देणारी कंपनी म्हणून झाली होती. गल्लीच्या कोपऱ्यावर असते तसे डीव्हीडीचे दुकान म्हणून नव्हे तर प्रॉपर एक मोठ्ठी कंपनी म्हणून. मार्क रंडोल्फ आणि रीड हेस्टिंग या जोडगोळीने २.५ मिलियन डॉलर्स गुंतवून ही कंपनी स्थापन केली.

ही कल्पना मार्कला सुचली यामागे एक गंमत आहे. एकदा त्याने अपोलो १३ हा चित्रपट भाड्याने आणला होता. पण त्याला तो वेळेत परत करणे जमले नाही. मग त्याने त्याचा ४०$ दंड भरला. पण बायकोला आपला गाढवपणा सांगितला नाही.

(बघा अमेरिकेतले करोडपती उद्योगपती सुद्धा आपल्या बायकोला घाबरतात.) तर त्यावेळी मार्कच्या डोक्यात ॲमेझॉन या ऑनलाईन रिटेल स्टोअरच्या धरतीवर कुरियरने पिक्चरचे कॅसेट भाड्याने द्यायची आयडिया आली होती.

याच काळात अमेरिकेत डीव्हीडीचां शोध लागला.

याच काळामध्ये डिव्हीडीच्या शोधाने अमेरिकेत एक नवी क्रांन्ती येवू पाहत होती. अतिशय छोट्याशा या डिस्कमध्ये साधारण २ ते ३ चित्रपट मावू शकणारी ही “डीव्हीडी” म्हणजे त्या काळाच्या मानाने चमत्कारच होती.

पुढे तो आणि त्याचा पार्टनर हेस्टिंग हे त्यांच्या एका कंपनीच्या विक्रीचा व्यवहार करत होते. ७०० मिलियन डॉलर या रेकॉर्ड ब्रेक किंमतीत त्यांनी त्यांची कंपनी विकली होती. त्यावेळी विमानतळावर रंडोल्फला सीडी दिसली. त्याने ती सिडी हेस्टिंगला कुरियरने पाठवली आणि या कल्पनेतूनच “नेटफ्लिक्स” चा जन्म झाला.

१९९८ रोजी या ऑनलाईन डीव्हीडी रेंटल स्टोअरची सुरवात झाली.

२००० सालापर्यंत त्यांचे तीन लाख सबस्क्रायबर झाले होते. २००७ साल येता येता ३६ लाख सबस्क्रायबर बनले. रोज साधारण १ लाख डीव्हीडी भाड्याने दिले जात होते. डॉटकॉम बुमचा देखील त्यांना फायदा झाला.

मात्र युट्युबच्या उदया नंतर त्यांनी त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी ऑनलाईन स्ट्रीमिंग मध्ये पिक्चर दाखवायला सुरवात केली. डीव्हीडी रेंटल मागे पडले. ही कन्सेप्ट अमेरिकेत तुफान गाजली. नेटफ्लिक्सने स्वतः च्या मालिका, स्वतः निर्मिती केलेले चित्रपट आपल्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन बनवले.

हाउस ऑफ कार्ड्स या पहिल्याच मालिकेपासून ते नार्कोस या मालिके पर्यंत अनेक हिट्स नेटफ्लिक्स ने दिले आहेत. आज १९० देशात वेगवेगळ्या भाषेत लहान मुलांच्या शो पासून ते रियालिटी शो पर्यंत मालिका ते दाखवत आहेत.

१००० अब्ज एवढे उत्पन्न असणार्या या कंपनीने गेल्या ५० वर्षाच्या टीव्हीच्या साम्राज्याला जोरदार धक्का दिला आहे यात शंका नाही.

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.