एका सीनमुळे तिचं घर जाळलं, तिला शहर सोडावं लागलं… आज गूगलला तिची आठवण आली

गुगलचं कसंय… अधून मधून गूगल एखाद्या भारी माणसाचा चेहरा आपल्या फ्रंटपेजला लावतो. त्याला गुगल डूडल असं म्हणतात. आता बऱ्याचदा हे चेहरे इतक्या भारी माणसांचे असतात की, गूगल वापरणाऱ्या जवळपास सगळ्यांनाच हे चेहरे माहिती असतात. आजसुद्धा गूगलने असाच एक चेहरा फ्रंटपेजला लावलाय. पण हा चेहरा कुणाचा आहे असं प्रश्न चिन्ह बहुतांशी लोकांच्या चेहऱ्यावर दिसतंय. फक्त ती एक स्त्री आहे इतकंच लक्षात येतं.

तर, त्या डूडल मधल्या स्त्रीचं नाव आहे पी. के. रोझी.

आता या पी के रोझी कोण आहेत? त्यांचं असं काय कार्य आहे की, ज्यामुळे थेट गुगलने त्यांची दखल घेतलीये? असे अनेक प्रश्न आज सकाळपासून तुम्ही जेव्हा जेव्हा गूगल ओपन केलं असेल तेव्हा तेव्हा तुम्हालाही पडलेच असतील.

तर ही पी. के रोझी नावाची स्त्री म्हणजे पहिली मल्याळम हीरॉइन होती. आज तिचा जन्मदिवस

आता तिच्याबद्दल सांगायचं झालं तर, १९०३ साली तिचा जन्म झाला होता. केरळमधल्या थिरूवअनंतपूरम मध्ये जन्म झालेल्या रोझीचं खरं नाव हे राजम्मा होतं असं म्हटलं जातं. तिच्या लहानपणाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, पण ती अगदी कमी वयाची असताना तिचे वडील वारले. त्यामुळे, घरात गरिबी आली आणि सामान्य आयुष्य जगणं कठीण होऊन बसलं.

अगदी दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होत असल्यानं मग रोझीने गवत कापण्याचं काम सुरू केलं. स्वत:चं आणि कुटूंबातल्या बाकी सदस्यांचं पोट भरण्यासाठी रोझी कमी वयातच काम करू लागली होती.

पण तिच्या नशीबात नक्कीच हे काम करणं नव्हतं. काही काळात तिच्या नातेवाईकांपैकी काका का मामा कुणाला तरी तिला परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये प्रचंड रस असल्याचं लक्षात आलं आणि त्याने रोझी साठी एका गुरू चा शोध घेतला. या गुरूकडून संगीत आणि अभिनयाचे धडे तिला देण्यात आले. याशिवाय, तिने शास्त्रीय नृत्य आणि तामिळ लोकनाट्याचाही अभ्यास केला.

तिने तिच्या आवडीप्रमाणे परफॉर्मिंग आर्ट्स शिकलं खरं, पण ते खरं कामाला आलं ते १९२८ मध्ये, ज्यावेळी जे सी डॅनियेल यांना आपल्या सिनेमामध्ये एका महिलेची अभिनेत्री म्हणून गरज होती.

आता ही अशी परिस्थिती आजच्या घडीला असली असती तर, कितीतरी अभिनेत्री ऑडिशनसाठी गेल्या असत्या. मात्र त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा एखादी स्त्री सिनेमात काम करू शकते ही कल्पनाच कुणी केली नव्हती आणि एखाद्या स्त्रिने तशी हिंमत केली तरी ती गोष्ट समाजाला मान्य होणारी नव्हती.

अशा परिस्थितीत पी के रोझी यांनी या सिनेमात काम करायचं ठरवलं. बाहेरून कुठून विरोध होण्याआधी तिला घरातूनच विरोध व्हायला सुरूवात झाली. रोझीच्या आजोबांनी तिला घरातून बाहेर हाकलून दिलं. तरीही त्यांनी सिनेमात काम केलंतय

या सिनेमात त्यांनी सरोजिनी ही भुमिका साकारली.  आता सरोजिनी  ही स्त्री नायर या समाजातली रेखाटण्यात आली होती. रोझी मात्र खालच्या जातीतली होती. त्यामुळे, नायर समाजाने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

याशिवाय या सिनेमामध्ये एक सीन आहे ज्याबद्दल दोन मतं  आहेत. काही लोक असं म्हणतात की, या चित्रपटात नायक नायिकेच्या म्हणजे रोझीच्या केसात फूल माळतो. तर काही लोक म्हणतात की, नायक रोझीच्या केसात माळलेल्या फूलाचं चूंबन घेतो.

खरंतर आताचे सिनेमे बघितले किंवा त्यांचा विचार केला तर या दोनपैकी कोणताही सीन अजिबात आक्षेपार्ह वाटत नाही, पण तेव्हाच्या समाजाला ती गोष्ट पटणारी नव्हती. झालंही तसंच. हा सीन पाहून संतप्त प्रेक्षकांनी थिएटरच्या बाहेर उभ्या असलेल्या रोझीवर हल्ला केला.

आता ही रोझी थिएटरच्या बाहेर का उभी होती त्याची स्टोरीही इंटरेस्टींग आहे. रोझी ही खालच्या जातीतली असल्यामुळे लोकांनी तिच्यासोबत सिनेमा बघायला नकार दिला होता. म्हणून मग ती पहिल्या शोच्यावेळी थइएटरच्या बाहेरच थांबली होती.

तर, या संतप्त जमावाने रोझीवर हल्ला केला… ती पळून गेली, लपून बसली कशी बशी वाचली. असं म्हणतात की, संतप्त जमावाने तिच्या घराला आग सुद्धा लावली होती. 

अखेर तिने शहर सोडून जायचं ठरवलं. एका ट्रकमध्ये बसून मग तिने शहरच काय थेट राज्यत सोडलं. ज्या ट्रक ड्रायव्हरने तिला त्यावेळी मदत केली त्याच्यासोबतच तिने लग्न केलं आणि मग तामिळनाडूतच राहिली.

पुढे १९८७ मध्ये तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तिच्या मुलांना तिच्या अभिनय क्षेत्रातल्या करीअरबद्दल काहीही ठाऊक नव्हतं, असं सांगितलं जातं. १९६० साली चेंगलट्ट गोपालकृष्णन यांनी  रोझीच्या आयुष्यावर एक आर्टिकल लिहीलं होतं ज्यामुळे तिच्या आयुष्याबद्दल लोकांना माहिती झालं.

गूगलने आज फ्रंटपेजवर स्थान देताना म्हटलंय,

“तुमच्या धैर्याबद्दल आणि तुम्ही निर्माण केलेल्या वारशासाठी धन्यवाद.”

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.