फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ५८९ विकेट्स घेऊनही शिवलकर कधीच भारतासाठी खेळले नाहीत…

मागच्या पंधरा वर्षात आयपीएलनं फक्त भारतीय क्रिकेटचंच नाही तर जागतिक क्रिकेटचं भविष्य बदलून टाकलं. खेळाची पद्धत तर बदललीच, पण कित्येक नव्या चेहऱ्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायची संधी मिळाली. एखाद्या आयपीएलमध्ये चार-पाच भारी इनिंग्स खेळलेला गडीही आता भारताकडून खेळतो, खोऱ्यानं पैशे ओढतो आणि रात्रीत सुपरस्टार होतो.

पण नेहमीच अशी परिस्थिती नव्हती, आयपीएलच्या आधी अनेक दशकं भारतीय संघात स्थान मिळवण्याचा एकच मार्ग होता… डोमेस्टिक क्रिकेट. रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी या स्पर्धांमध्ये खेळून खेळाडू पुढं यायचे.

भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणजे मुंबई, कारण मुंबईनं भारताला अनेक दिग्गज खेळाडू दिले. गावसकर, तेंडुलकर, सरदेसाई, वेंगसरकर अशी न संपणारी यादी. मुंबईची डोमेस्टिक टीम इतकी तगडी असायची की, लोकं म्हणायची…

एकवेळ टीम इंडियात खेळायला मिळेल, पण मुंबईच्या टीममध्ये अवघड ए…

याच मुंबईच्या मातीत एक हिरा असा घडला, जो डोमेस्टिक क्रिकेटमधला बाप माणूस होता. मुंबईच्या बॉलिंग युनिटचा आधार होता. तो अनेक वर्ष डोमेस्टिक क्रिकेट खेळला, विक्रम केले… पण त्याला कधीच भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

त्यांचं नाव पद्माकर शिवलकर.

मुंबईतच जन्मलेल्या शिवलकर यांच्याकडे जॉब नव्हता, एका मित्रानं त्यांना आग्रह केला की क्रिकेट खेळून बघ. हातात कधीच लेदर बॉल न घेतलेले शिवलकर ब्रॅडबरी मिल्सच्या नेट्समध्ये ट्रायल्ससाठी गेले. एका प्लेअरकडून क्रिकेटचे पांढरे कपडे घेतले. बॉलिंग टाकायला सुरुवात केली आणि तिसराच बॉल… टप्पा पडून स्टम्पवर.

नशीब कसं असतंय बघा, भारताच्या भारी ऑलराऊंडर्सपैकी एक असलेले विनू मंकड यांनी शिवलकर यांची बॉलिंग पाहिली आणि त्यांना खेळण्याची संधी आणि जॉब मिळाला.

शिवाजी पार्क जिमखान्यावर शिवलकर सराव करू लागले. टाटांच्या ‘मुंबई हाऊस’मध्ये काम करताना त्यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) जॉईन केला. आता सीसीआय म्हणजे दिग्गज खेळाडूंचा आणि लय मोठं नाव असलेला क्लब. शिवलकरांसोबत अनेक मोठे क्रिकेटर्स असायचे, पण त्यांच्यातही शिवलकर उठून दिसायचे त्यांच्या शिस्तीमुळं.

समजा आपले टीममेट्स उशिरा आले किंवा लवकर गेले, तरी शिवलकर स्टम्प लाऊन एकट्यानं का होईना पण प्रॅक्टिस करत रहायचेच.

सीसीआयचा ऑस्ट्रेलिया दौरा त्यांनी चांगलाच गाजवला. लोकं म्हणायला लागली, आधीच तगड्या असलेल्या मुंबईला आणखी एक एक्का मिळाला. पण मुंबईच्या टीमचं स्पिनिंग डिपार्टमेंट बापू नाडकर्णी गाजवत होते. जोवर बापू खेळत होते, तोवर शिवलकरांना मुंबईच्या मुख्य संघात स्थान मिळालंच नाही.

अखेर १९६५ मध्ये त्यांच्यासाठी मुंबईच्या संघाची दारं उघडली. इतकी वर्ष शिवलकरांचे हात संधीसाठी शिवशिवत होतेच, त्यामुळं त्यांनी भारी कामगिरी करायला वेळ लावला नाही. त्यांच्या नावापुढं विकेट्सचे आकडे वाढत होते. 

या आकड्यांसोबत आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे शिवलकरांची बॉलिंग ॲक्शन.

शिवलकर लेफ्ट आर्म स्पिनर होते. त्यांचा रनअप होता फक्त तीन पावलांचा, हातही अगदी निवांत फिरायचा. बॅट्समनला वाटायचं कसला किरकोळ बॉलर आहे… पण हातातून सुटलेला बॉल असला गपकन वळायचा, मधनंच बाऊन्स व्हायचा आणि बॅट्समन गायब. याच दिसायला साध्या पण खेळायला जहरी असणाऱ्या बॉलिंगमुळं शिवलकरांना नाव पडलं…

…’स्लो डेथ पॉयझन.’

पण हे स्लो डेथ पॉयझन विदेशी खेळाडूंना चाखायला मिळालं नाही, कारण भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सत्ता गाजवूनही शिवलकरांच्या डोक्यावर ‘इंडिया कॅप’ कधी आलीच नाही.

या मागचं कारण काय होतं..?

तर ज्या काळात शिवलकर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चमकत होते, त्या काळात भारतीय संघात इरापल्ली प्रसन्ना, बिशनसिंग बेदी, श्रीनिवासन वेंकटराघवन, भागवत चंद्रशेखर ही स्पिनर्सची चौकडी अधिराज्य गाजवत होती. या चौघांमध्ये बिशनसिंग बेदी हे लेफ्ट आर्म स्पिनर होते, त्यांची जादूच अशी होती की त्यांना संघाबाहेर ठेवणं जवळपास अशक्य होतं.

आता इथं नशीब कसं असतंय बघा, 

मुंबईच्या संघात पदार्पण करताना बापू नाडकर्णी यांच्या अस्तित्वामुळं शिवलकरांचं पदार्पण लांबलं. तर भारतीय संघात असलेल्या बेदींच्या करिष्म्यामुळं शिवलकरांना तिथंही वाट पहावी लागली. पण दुर्दैवानं हे वाट पाहणं कधी संपलंच नाही. कारण जेव्हा बेदी रिटायर झाले, तेव्हा दिलीप दोशींची संघात वर्णी लागली… अनुभवी आणि टॅलेंटेड शिवलकरांचा मात्र विचार झाला नाही.

शिवलकरांबद्दल लिहिताना एक गोष्ट लिहिली नाही, तर विषय अपूर्ण राहील…

१९८१ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. वयाचा आकडाही ४१ होता. मग ७ वर्षांनी एक किस्सा झाला, मुंबईच्या संघाला अनुभवी खेळाडूची गरज होती. त्यांनी शिवलकरांना कमबॅकसाठी विचारलं आणि ४८ वर्षांचे शिवलकर पुन्हा एकदा हातात बॉल घेऊन मैदानात उतरले. १९८८ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी कर्नाटक विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये रॉजर बिन्नी आणि गुंडाप्पा विश्वनाथच्या विकेट्सही घेतल्या.

४८ व्या वर्षानंतर आपल्याला कुणी भारतीय संघात घेणार नाही हे त्यांना माहीत होतं. पण तरीही शिवलकर मैदानात उतरले… कारण त्यांचं क्रिकेटवर प्रेम होतं…

जे इंडिया कॅप मिळाली नाही म्हणूनही कमी झालं नाही आणि फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये १२४ मॅचेसमध्ये ५८९ विकेट्स घेतल्यानंतरही, आपल्यावर अन्याय झाला म्हणूनही कमी झालं नाही…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.