सिव्हिल वॉर झालं तिकडे अमेरिकेत पण त्यामुळंच मुंबईत पावभाजी जन्माला आली..

चिकन मटण खाणारे आणि पनीर खाणारे यांच्यातल्या भांडणात एकच पदार्थ त्यांची युती घडवून आणू शकतो तो म्हणजे पावभाजी. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना पावभाजी आवडते. पावभाजी कुठं स्पेशल मिळते यावरून व्हिडिओ बनवणारे आणि विडिओसाठी पावभाजीमध्ये बटरच्या टिक्कीच्या टिक्क्या ओतनारे दुकानदार हे सगळं आपण कुठं ना कुठं तरी पाहिलचं असेल.

एका मित्राला विचारलं की, पावभाजीचं वर्णन एका ओळीत कसं करशील ? तर तो म्हणाला

“पावभाजी ही अशी भाजी आहे जी पाव संपले तरी चपाती सोबत खाता येते” म्हणलं बस बस कळलं.

एवढं पावभाजी बद्दल लोकांना प्रेम आहे, जिव्हाळा आहे पण पावभाजी आपल्याकडे कशी आली त्याची गोष्टसुद्धा एकदम वाढीव आहे. आता कस झालंय की जिथं पावभाजीचा शोध लागला तिथं जितक्या व्हरायटी नसेल तितक्या व्हरायटी आपल्याकडे पाहायला मिळतात.

बर ते सोडा पावभाजी भारतात फेमस व्हायला काय कारण होतं ते सगळं आपण जाणून घेऊया.

1861 ते 1865 चा काळ. युनायटेड स्टेट्समध्ये (अमेरिकेत ओ) साऊदर्न स्टेट्स आणि नॉर्थ स्टेट्सच युद्ध झालं. या युद्धाचं मुळ कारण काय होतं तर गुलामी. नॉर्थवाल्यांना गुलामगिरी बंद करायची होती तर साऊथवाल्यांचा याला विरोध होता. साऊदर्न स्टेट्सवाले असं गृहीत धरून चालले होते की इंग्लंड आणि फ्रांस त्यांना पाठिंबा देतील.

या दोन देशांचं पाठिंबा मिळण्याचं कारण होतं, इंग्लंडमध्ये साऊदर्न स्टेट्समधूनच मोठ्या प्रमाणात कापूस जायचा त्यामुळे साहजिकच ते पाठिंबा देतील यावर साऊदर्न स्टेट्सला भयंकर कॉन्फिडन्स होता.

पण एक घोळ झाला होता की, इंग्लंडमधून गुलामगिरी नाहीशी होत चालली होती त्यामुळं इंग्लंडने साऊथला पाठिंबाच दिला नाही. वर मागणी केली की कापूस येत राहिला पाहिजे नाहीतर त्याचे डेंजर परिणाम भोगावे लागतील.

यावर तोडगा म्हणून अब्राहम लिंकन यांच्या नौदलाने न्यू ऑर्लीन्स आणि मिसिसिपी मधून माल पाठवणंच बंद करून टाकलं. त्यामुळे मार्केटमध्ये कापसाचा तुटवडा निर्माण झाला आणि जितका कापूस मार्केटमध्ये होता त्याचे भाव भयानक वाढले.

इंग्लंडने मग तो नाद सोडला आणि त्यांनी भारताकडे मोर्चा वळवला.

गुजराती व्यापारी लोकं काय करायचे तर, कामगार लोकं काम करत असताना एक्सट्रा माल हवा असेल तर अमेरिकन आणि युरोपियन वेळेप्रमाणे रात्री उशिरा त्याची ऑर्डर घ्यायचे. याच पद्धतीमुळे जास्तीत जास्त पैसे व्यापारी वर्गाला मिळू लागले, मार्केटमध्ये उभारी आली पण इथ एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे कामगार लोकांना रात्री जेवायला काही मिळत नसायचं आणि घरून इतकं अन्न मागवणं परवडत नसायचं. त्यामुळे पैसा मिळूनही व्यापारी लोकांना ही एक डोकेदुखीच झाली होती. 

यातूनच जन्म झाला मुंबईतल्या स्ट्रीट फुडची शान असलेल्या पावभाजीचा. रस्त्यावरील स्टॉल मध्ये या कामगार लोकांच्या पोटाच्या सोयीसाठी पावभाजी तयार होऊ लागली.

दिवसभरात विक्री होऊन शिल्लक राहिलेल्या भाज्यांना उकडून टोमॅटो ग्रेव्हीमधे शिजवलं जाऊ लागलं जोडीला कांदा लिंबू दिलं जाऊ लागलं. लोकांमध्ये ही भाजी लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. इम्पोर्टमध्ये हा पदार्थ व्हायरल होत गेला.

सिव्हिल वॉरच्या काळात पोर्तुगीज लोकांनी बनवलेला पाव जोडीला आला. भारताला पाव इंट्रोड्युस केला तो पोर्तुगीजांनीच. पावाच्या मधोमध बटर लावून त्यात सगळ्या भाज्यांचं मिश्रण असलेली ती भाजी भरली जाउ लागली. कामगार लोकांना पहिल्यांदाच असा लेट नाईट आहार मिळत होता आणि शिवाय तो पोषकही होता.

कामगारांपासुन ते व्यापाऱ्यापर्यंत सगळेच जण रात्री पावभाजी खायला मिळते म्हणून येऊ लागले. सिव्हिल वॉरच्या काळात हजारो लोकांना याचं पदार्थाने तारलं. पण ही इंडियन डिश म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झाली. दर राज्यानुसार पावभाजीचे फ्लेवर बदलत गेले आणि त्या त्या राज्याच्या चवीचा टच त्यात येऊ लागला. 

पुढे जाऊन यात व्हरायटी आली आणि पावभाजीतून अजून एक भारी पदार्थ आला तो म्हणजे मसाला पाव. नंतरचं तर विचारूच नका पाव भाजी पिझ्झा वैगरे पर्यंत लोकांची मजल गेली आणि आता पावभाजीमध्ये काय काय प्रयोग होतायत, ते आपण फूड ब्लॉगिंगमधून बघतोयच.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.