आज पोखरण अणुचाचणीला २४ वर्ष झाली, ही गोष्ट आहे त्याच पराक्रमाची…!!!

भारत स्वतंत्र झाला, त्याला आता ७५ वर्ष होतील. या ७५ वर्षांत भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. अशा घटना ज्यामुळं देशाच्या भविष्याची वाट आखली गेली. या घटनांमुळे आजचा भारत घडला, समृद्ध झाला आणि मजबूतही.

यातलीच एक महत्त्वाची घटना म्हणजे, अणुचाचणी.

भारतानं अणुउर्जा निर्मितीच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरुवात केली होती. १९४५ सालीच भारताचे अणुउर्जा क्षेत्रातले जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या अध्यक्षतेखाली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची स्थापना करण्यात आली होती.

 स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘होमी भाभा’ यांच्या नेतृत्वाखाली ३ ऑगस्ट १९४८ रोजी स्थापलेलं ‘अणुउर्जा आयोग’ हे त्यादृष्टीनं टाकलेलं दुसरं महत्वाचं पाऊल होतं.

अणुउर्जेबाबतीत कायमच ‘शांततेसाठी अणुउर्जा’ ही भारताची भूमिका राहिलेली आहे. भारतानं अणुबॉम्बची निर्मिती करावी अशी नेहरूंची इच्छा नव्हती, परंतु ते सामर्थ्य आपल्या राष्ट्राकडे असावं असं त्यांचं मत होतं. त्याचदृष्टीनं या क्षेत्रातल्या संशोधनावर मोठ्या प्रमाणात जोर देण्यात आला.

homi bhabha
डॉ. होमी जहांगीर भाभा

१९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धात भारताचा पराभव झाला आणि त्यानंतर भारतात अणुबॉम्ब निर्मितीच्या समर्थनार्थ आवाज उठू लागले. २४ ऑगस्ट १९६२ रोजी भारत १८ महिन्यांमध्ये अणुबॉम्ब बनवू शकतो, अशी  घोषणा डॉ. होमी भाभा यांनी केली. परंतु १९६५ साली होमी भाभा याचं निधन झालं त्यामुळे काही काळ हे प्रयत्न थंडावले.

१९६८ मध्ये मात्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणुकार्यक्रम राबवण्यास गुप्तरीत्या परवानगी दिली. १९७२ पर्यंत भारताने यशस्वीरीत्या अणुबॉम्ब बनवला होता. १९७४ साली १८ मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी राजस्थानमधल्या पोखरण या ठिकाणी भारतानं अणुबॉम्बची पहिली चाचणी घेतली.

या ऐतिहासिक घटनेचं वर्णन ‘बुद्ध हसला’ असं करण्यात आलं.

ही घटना जगापासून मात्र लपवून ठेवण्यात आली. भारतानं फक्त अणुचाचणी केलीये, या चाचणीचा अणुबॉम्ब निर्मितीशी काहीही संबंध नाही असं जगभरातल्या राष्ट्रांना सांगण्यात आलं. यानंतर देखील अणुउर्जेच्या क्षेत्रातल्या भारताचं संशोधन सुरूच राहिलं.

त्यानंतर यासंदर्भात महत्वाच्या घडामोडी घडल्या त्या पी. व्ही. नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान असताना. नरसिंह राव अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांच्या चाचण्या करू इच्छित होते पण काही कारणास्तव त्यांना ते शक्य झालं नाही.

नरसिंह राव हे परीक्षण का करू शकले नाहीत, यासंदर्भात अभ्यासकांमध्ये मतभेद बघायला मिळतात. काही जणांच्या मते अमेरिकेच्या भारतावरील दबावामुळे नरसिंह रावांना ते शक्य झालं नाही, तर काहींच्या मते शास्त्रज्ञांची तयारी कमी पडल्यामुळे पी.व्ही. नरसिंह राव यांचा नाईलाज झाला आणि इच्छा असूनदेखील ते अणुबॉम्बची चाचणी घेऊ शकले नाहीत.

त्यानंतर निवडणुका झाल्या आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेत आलं. पी.व्ही. नरसिंह राव यांनी ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे पदभार सोपवला त्यावेळीच त्यांनी अणुबॉम्ब चाचणी करण्याविषयी वाजपेयी यांना सुचवलं होतं.

वाजपेयी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री राहिलेल्या जसवंत सिंग यांनी यासंदर्भात ‘एबीपी न्यूज’च्या प्रधानमंत्री या कार्यक्रमात याविषयी सांगितलंय. 

जसवंत सिंग सांगतात की, पी.व्ही. नरसिंह राव सांकेतिक भाषेत अटल बिहारी वाजपेयींना म्हणाले होते की, “मै नही कर पाया, तुम कर देना” पी.व्ही. नरसिंह राव यांचा हा इशारा अणुबॉम्ब संदर्भातच होता. 

अणुबॉम्ब चाचणीची तयारी पी.व्ही. नरसिंह राव सरकारच्या शेवटच्या काही दिवसातच पूर्ण झाली होती. त्यामुळेच सत्तेवर आल्यावर दुसऱ्या दिवसानंतरच अणुबॉम्ब चाचणीची घोषणा करताना वाजपेयींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. परंतु, वाजपेयींचं सरकार अवघ्या १३ दिवसात कोसळल्याने त्यावेळी ही चाचणी होऊ शकली नाही. 

त्यानंतरच्या २ वर्षांच्या काळात  देशात अस्थिर सरकार राहिल्याने या चाचणीमध्ये परत अडथळा निर्माण झाला.

scientist

मार्च १९९८ साली वाजपेयी पुन्हा सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर शास्त्रज्ञांशी झालेल्या बैठकीत अणुचाचणीसाठी तयार राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. 

९ एप्रिल १९९८ रोजी झालेल्या बैठकीत पंतप्रधानाच्या आदेशानंतर ३० दिवसांनी अणुचाचणी घेण्यास शास्त्रज्ञ तयार असतील, अशी माहिती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पंतप्रधान वाजपेयी यांना दिली. वाजपेयींनी तयारी करण्याचे आदेश देताच अत्यंत गुप्तपणे चाचणीची तयारी सुरु झाली.

अमेरिकी सॅटलाईटपासून वाचण्यासाठी बहुतेक काम रात्रीच्या वेळीच करण्यात येत असे. ऑपरेशनच्या तयारीच्या वेळी सर्व शास्त्रज्ञ सैन्याच्या पोशाखात असायचे. सर्वांनाच वेगवेगळी टोपणनावं देण्यात आली होती.

अब्दुल कलामांचं नांव होतं, मेजर जनरल पृथ्वीराज तर अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष आर. चिदंबरम ओळखले जायचे ‘नटराज’ या नावानं.

११ मे १९९८. बुद्धपौर्णिमेचा दिवस. ‘ऑपरेशन शक्ती’.

स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्वाच्या घटनेचा हा दिवस साक्षीदार झाला. शास्त्रज्ञांच्या टीमनं राजस्थानातल्या पोखरण येथे ३ अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती देशवासियांना आणि जगाला दिली.

तेव्हा वर्णन करण्यात आलं, “…आणि बुद्ध पुन्हा हसला.”

२ दिवसांनी म्हणजेच १३ मे रोजी भारतानं आणखी २ अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. या अणुचाचणीनंतर हादरलेल्या अमेरिकेनं भारतावर अनेक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. अमेरिका आणि चीननं संयुक्त राष्ट्रात तसा ठराव देखील संमत करून घेतला.

या निर्बंधांना भारत कसा सामोरा गेला, याबद्दल बोल भिडूनं लेख लिहून ठेवलाय. खाली क्लिक करुन वाचा.

निर्बंध तर आपल्यावर पण लागले होते पण वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भारत झुकला नाही

दरवर्षी ११ मे तारीख येते आणि पोखरण मधल्या घडामोडी, तिथलं वातावरण, भारताच्या शास्त्रज्ञांनी जीव पणाला लाऊन केलेलं काम आजही आपली छाती काही इंचांनी फुगवतंच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.