नथुराम गोडसेनंतर भारताच्या इतिहासात रंगा-बिल्लाला तात्काळ शिक्षा सुनावून फासी देण्यात आली. 

रंगा बिल्ला. हि दोन नावं ऐकली की कुठल्यातरी कार्टून सिरीजमध्ये ते डाकू वाटतात. भुरट्या चोरांची जोडी नाहीतर मुलं पळवणाऱ्या गॅंगचे सदस्य.

पण एकेकाळी रंगा बिल्ला नावाची दहशत इतकी होती की जेव्हा ते सापडले तेव्हा चार वर्षातच त्यांना फासावर लटकवण्यात आलं. 

जिल्हा न्यायालय, हाय कोर्ट, सुप्रिम कोर्ट आणि राष्ट्रपतींकडे गेलेला दयेचा अर्ज असे सर्व सोपस्कार चार वर्षात झाले आणि वेळ न घालवता त्यांना फासावर देण्यात आलं.

कसाबला फासी देण्यासाठी देखील याहून अधिक वेळ लागला. भारताच्या इतिहासात महात्मा गांधीच्या हत्येनंतर चाललेला खटला हा जलद समजला जातो. नथुरामला शिक्षा सुनावण्यासाठी एक वर्षाहून कमी कालावधी लागला होता. त्यानंतर हा खटला सर्वात जलद चालल्याच सांगण्यात येतं. 

रंगा बिल्ला हे दोघे असे होते की त्यांना खालच्या न्यायालयाने दिलेली फासीची शिक्षा पुढील सर्व न्यायालयाने कायम ठेवली. राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांनी देखील झटक्यात सही करून यांना फासावर लटकवण्यास सांगितलं. 

तुम्हाला प्रश्न पडला असेल अस काय केलं असेल त्या दोघांनी ? 

तारिख होती २६ ऑगस्ट  १९७८. दिल्लीत तुरळक पाऊस चालू होता. दिल्लीच्या धौआ कुआं एरियात असणाऱ्या ऑफिसर एनक्लेव मध्ये रात्रीच्या वेळी हालचाल सुरू झाले. नौसेनेचे वरिष्ठ अधिकारी व्हाईस अॅडमिरल मदन चोपडा यांच्या घरी आले होते. काही अधिकारी दिल्लीतील महत्वाचे हॉस्पीटल पिंजून काढत होते. पोलीसांना कळवण्यात आल्यानंतर पोलीसांनी देखील मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. मध्यरात्र झाली होती आणि रात्रीच्या वेळी दिल्लीतले बडे अधिकारी जागून होते. 

झालेलं अस की मदन चोपडांची दोन्ही मुले घरी आले नव्हते. आपल्या मुलांना घेण्यासाठी ते आकाशवाणी येथे पोहचले तेव्हा मुले इथे आलीच नसल्याच सांगण्यात आलं. त्यानंतर घर, कॉलेज, मित्र सर्वत्र चौकशी करण्यात आली. रात्र झाली पोलीसांना माहिती देण्यात आली. एका मोठ्या अधिकाऱ्यांची दोन्ही मुले एकाएकी गायब झाल्याने अधिकारी वर्ग जागा झाला. 

मदन मोहन चोपडा हे भारतीय नौसेनेत व्हाईस अॅडमीरल होते. त्यांच्या मुलाच नाव संजय चोपडा तर मुलीच नाव गीता चोपडा. संजय हा १४ वर्षाचा होता तर गिता १७ वर्षांची होती. दिल्लीतल्या जीजस अॅण्ड मेरी कॉलेजमध्ये बीएच्या दूसऱ्या वर्षाला होती तर संजय १० वीत होता. गिता वेस्टर्न गाणी म्हणायची. आकाशवाणीच्या युवावाणी मार्फत वेस्टर्न गाण्याचा कार्यक्रम प्रसारित होत असे. त्यासाठी गिताला बोलवण्यात आलं होतं. गिता सोबत तिचा भाऊ संजय देखील गेला होता. कार्यक्रम झाल्यानंतर वडिल मदन मोहन चोपडा त्यांना घेण्यासाठी गेले तर मुले तिथेच आलीच नसल्याची माहिती त्यांना मिळाली. 

त्यानंतर हालचाल सुरू झाली. 

दूसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात व्हाईस अॅडमीरल यांची मुलं गायब झाल्याची बातमी पहिल्या पानावर होती. बघता बघता हि बातमी संपुर्ण देशभर चर्चेत आली. वडिल नौसेनेचे बडे अधिकारी असल्यामुळे देशाच्या संरक्षणासंबधित यात काही बाजू आहे का? याची चर्चा देखील सुरू झाली. 

संपुर्ण दिल्लीत शोधाशोध चालू होती. दोन दिवस गेले. २९ ऑगस्टची सकाळ झाली. काही पोलीस मदन चोपडांच्या घरी हजर झाले. मदन चोपडांना एका घटनास्थळी घेवून जाण्यात आलं. काही अंतरावर दोन शव होते. त्यांची ओळख चोपडांना करायची होती. मुलावर तलवारीने हल्ला करुन मारण्यात आलं होतं. मुलीकडे पाहिल्यानंतर बलात्कार करुन खून करण्यात आल्याचं स्पष्ट होतं होतं. गुन्हा करणाऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे त्यांना मारलं होतं. ओळख पटली आणि दिल्लीत हाहाकार उडाला. 

दोन निष्पाण मुलांची हत्या करण्यासारखं काहीच कारण नव्हतं. वडिल नौसेनेत असल्याने त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरली. बातम्या गाजू लागल्या. इतक्या की पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी यात थेट हस्तक्षेप केला. पोलीसांसमोर गुन्हेगार शोधून काढण्याची मोठ्ठी जबाबदारी होती. 

ज्या रात्री दोन्ही मुले गायब झाली त्याच रात्री पोलीस कंट्रोल रुमला भगवानदास नावाच्या इसमाने माहिती दिली होती. त्यानं सांगितलं होतं की, बंगला साहेब गुरूद्वारापासून ते नॉर्थ अॅव्ह्येनू च्या  दिशेने तो स्कुटरवरून चालला होता. संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर त्याला एक फियाट गाडी दिसली. त्या फियाटमध्ये दोन व्यक्ती समोर बसल्या होत्या तर पाठीमागे एक मुलगा आणि एक मुलगी होती.

पाठीमागे बसलेली दोन्ही मुले जोरजोरात ओरडत होती. मात्र फियाट सिग्नल तोडून तशीच पुढे गेली. 

या गाडीचा नंबर होता,  HRK 8930  

पोलीसांनी या सुचनेकडं दुर्लक्ष केलं होता. आत्ता त्याच आधारावर चौकशी करण्याच ठरवण्यात आलं. ट्रान्सपोर्ट विभागाकडून या गाडीचा मालक शोधण्यात आला तेव्हा नाव निघालं पानीपत येथे राहणाऱ्या रविद्र गुप्ता यांच. पोलीसांनी रविद्र गुप्ताच्या घरी चौकशी केली. तेव्हा या नंबरची गाडी फियाट नव्हती तर अॅम्बेसिटर होती आणि ती त्यांच्या दारातच उभा होती. गाडीची एकंदरीत अवस्था पाहता ती कित्येक दिवसांपासून ती बंद असल्याची माहिती मिळाली. 

या दरम्यान देशभरातून दबाव वाढू लागला होता. एका फियाटमध्ये दोघांनी या मुलांना पळवून नेल्याची बातमी होती. ते दोघं कोण याची काहीच माहिती नव्हती.

३१ ऑगस्टच्या रात्री पोलीसांना संशयास्पद फियाट दिसली. त्यावर HRK 8930 हाच नंबर होता. गाडीच्या चेसीस नंबरवरून गाडीच्या मालकांच नाव शोधण्यास मदत मिळाली. गाडी चोरीची होती आणि अशोक हॉटेलसमोरपासून ती गाडी चोरी करण्यात आली होती. 

गाडीमध्ये पुरावे म्हणून रक्ताचे डाग, केस, दारूच्या बाटल्या सापडल्या. पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. ते डाग मृत झालेल्या संजय आणि गिताचे असल्याचं स्पष्ट झालं. बोटांचे ठसे मिळवण्यात पोलीसांना यश आलं.  पोलीस रिकार्डमध्ये चौकशी करण्यात आली. 

फक्त दिल्लीतील गुन्हेगारच नाहीत तर बोटांच्या ठस्यावरुन मुंबईतल्या गुन्हेगारांच्या फाईल देखील शोधण्यात आल्या आणि इथेच ते दोन गुन्हेगार सापडले. 

कुलजीत सिंह अर्थात रंगा आणि जसबिर सिंह बिल्ला अशी त्या दोघांची नावे.

रंगा बिल्ला नावाने ते फेमस होते. दोघांनी मोठ्ठे गुन्हे केले होते. यापुर्वी मुलांच्या अपहरणाच्या बाबतीत, चोरीच्या गुन्ह्यात देखील त्यांचा सहभाग होता. दिल्ली पोलीसांबरोबरीनेच मुंबई पोलीसांवर देखील रंगा बिल्लाला पकडण्याची जबाबदारी आली. 

८ सप्टेंबर १९७८ रोजी पोलीसांना एक माहिती मिळाली. दोन व्यक्ती आग्रा शहरात रेल्वेमध्ये चढले होते. तिथे ते सैनिकांसाठी आरक्षित असणाऱ्या डब्यात बसले. त्यावरून सैनिकांनी त्यांना मारहाण केली आणि दिल्लीत उतरल्यानंतर दिल्ली रेल्वे स्थानकावरील पोलीसांच्या ताब्यात दिलं. वर्णनावरून हेच रंगा बिल्ला असल्याचा संशय होता. दिल्ली पोलीसांना खात्री करण्यासाठी रेल्वे पोलीसांनी बोलवलं.

त्यांच्या हाताचे ठसे घेतल्यानंतर तेच रंगा बिल्ला असल्याच स्पष्ट झालं. मुंबई पोलीसांकडे असणारे फोटो आणि वर्णन पाहून रंगा बिल्लाला अटक करण्यात आल्याची बातमी जाहीर करण्यात आली. 

पण गोष्ट इथेच संपत नाही. 

हि केस क्राईम ब्रॅन्चकडून CBI कडे वर्ग करण्यात आली. CBI ने पुरावे गोळा करुन दोघांवर चार्जशिट दाखल केलं.  जनतेचा आक्रोश मोठ्या प्रमाणावर होता. दोघांनी गितावर केलेला बलात्कार आणि संजयचा केलेला निर्दयी खूनामुळे पोलीसांसह सर्वांचीच भूमिका त्यांना लवकरात लवकर फासावर देण्याची झाली होती. पटियाला हाऊस कोर्टने त्यांना फासीची शिक्षा सुनावली. त्या विरोधात ते दिल्ली हायकोर्टात गेले. दिल्ली हायकोर्टने ७ एप्रिल १९७९ रोजी त्यांची अपील नामंजूर केली. त्याविरोधात ते सुप्रीम कोर्टात गेले.

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधिश चंद्रचुड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने त्यांची शिक्षा कायम ठेवली. पुढे त्यांनी राष्ट्रपतीकडे दया अर्ज दाखल केला तो अर्ज देखील राष्ट्रपतींनी फेटाळला.  

३१ जानेवारी १९८२ रोजी म्हणजे चार वर्षांच्या आतच रंगा बिल्लाला तिहार जेलमध्ये फासावर देण्यात आलं. या घटनेत संजय या अवघ्या दहा वर्षांच्या मुलाने त्यांना प्रतिकार केला होता. संजय आणि गिता यांच्या नावाने लहान मुलांसाठी विरता पुरस्कार देण्याची घोषणा केंद्र शासनाने केली. जो पुरस्कार १९७८ पासून आजतागायत दिला जातो.   

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.