मराठवाड्याची पोरगी आज अमेरिकेच्या एअरफोर्समध्ये कमांडर झाली…

सातासमुद्रापार डंका वाजणं म्हणजे काय असतं हे आज परत एकदा रेवा जोगदंड हिच्या कामगिरीने लक्षात आलंय. रेवा जोगदंड ही खरंतर आपल्या मराठवाड्यातलीच. मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात कोंढा म्हणून एक लहान गाव आहे. त्या गावची ही सुकन्या.

या रेवानं असं काय केलंय म्हणाल तर, या रेवाची थेट अमेरिकेतल्या नेव्ह एअरफोर्समध्ये फ्लाईट कमांडर पदावर निवड झालीये.

हे वाचून रेवानं खरंच सातासमुद्रापार डंका वाजवलाय यावर विश्वास बसलाच असेल. ही आपली मराठवाड्याची मुलगी इतक्या दूर अमेरिकेच्या एअरफोर्समध्ये कशी गेली? असा प्रश्न पडला असेल तर, आधी त्याचं उत्तर जाणून घेऊया

तर रेवाचे वडील हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. ते नोकरीच्या निमित्तानं अगदी आधीपासूनच परदेशात असतात. खरं सांगायचं तर, रेवाचा जन्मही लंडन मधलाच आहे. त्यामुळं, रेवा ही लहानपणापासून तशी भारतापासून दूरच राहिली.

इतकं वेगळं करीअर निवडण्याचा विचार कसा आला? हा प्रश्न पडला असेल तर,

रेवाचे वडील हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. ते एक संशोधन वृत्ती असलेले व्यक्ती आहेत. संशोधक वृत्तीचे कसे? तर, रेवा लहान असताना त्यांनी स्ट्रींग कंट्रोल्ड दोरीवर विमान उडवून दाखवणं या विषयावर संशोधन करून यशस्वी प्रयोगसुद्धा केला होता. हा प्रयोग पाहिल्यापासूनच रेवाला पायलट होण्याची इच्छा होती. हळू हळू ती इच्छा स्वप्नात बदलत गेली. ते स्वप्न साकार करण्यासाठी तिने मेहनत घेतली आणि आज ते स्वप्न सत्यात उतरलंय.

निवड कशी झाली ते बघुया.

दोन वर्षांपुर्वी या पदासाठी अमेरिकेत ५०० जणांनी अर्ज भरला होता. या अर्जांपैकी मग सगळ्या परिक्षा आणि चाचण्या पूर्ण झाल्यावर फक्त २६ जणांची निवड करण्यात आली आहे. या २६ जणांपैकी एक नांदेड जिल्ह्यातली ही रेवा दोगदंड सुद्धा होती.

आता तिच्या या निवडीमागे फक्त दोन वर्षांचा प्रवास दिसत असला तरी, लहानपणी वडिलांना स्ट्रींग कंट्रोल्ड दोरीवर विमान उडवतानाचा प्रयोग करताना पाहिल्यापासून उराशी बाळगलेलं स्वप्न हे सत्यात उतरावं म्हणून तिने आजवर घेतलेले अथक परिश्रमही विचारात घ्यावे लागतील.

रेवाचे काका बालाजी जोगदंडे यांच्याशी बोलभिडूने संवाद साधला.

बालाजी जोगदंडे हे स्वत: एक शिक्षक आहेत. बालाजी जोगदंडे यांनी बोल भिडूशी बोलताना म्हटलंय,

“रेवा ही लहानपाणापासून परदेशात आहे. परदेशात तिने शिक्षण घेतलं. तिकडे लहानाची मोठी झाली. तिच्या वडिलांकडून तिला प्रोत्साहन मिळालंय त्यामुळेच ती आज या पदावर पोहोचू शकली आहे. बरं ही रेवा लहानपणीपासून परदेशी राहत असली तरी, वर्षा दोन वर्षातून एकदा गावाकडे येत असते. गावी आली की, तिच्यातलं भारत देशावरचं प्रेम दिसून येतंच. म्हणजे परदेशात राहिली म्हणून भारताला विसरलीये असं नाहीये.”

तिच्या या कामगिरीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे असंही ते म्हणाले. शिवाय, बालाजी जोगदंड यांची मुलगी काजल जोगदंड ही सुद्धा मागच्या महिन्यातच कंप्युटर इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करून लंडनमध्ये नोकरीसाठी गेली असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय, आता गावातली अनेक मुलं ही उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पदांवर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आता, तिच्या या कामगिरीमुळे भारतीयांना फक्त अभिमानच वाटणार नाहीये तर, प्रत्येक भारतीय विद्यार्थी, विद्यार्थिनीसमोर एक आदर्श म्हणूनही रेवा समोर येणार आहे. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.