व्हीलचेअर ते इंडियन हॉकी टीमचा कॅप्टन आणि मग क्रीडा मंत्रीपद… पण ते ही गेलं..

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. हॉकीकडे प्रेक्षकांचं दुर्लक्ष जरी होत असलं तरी, भारताने जगाला हॉकीचे काही महान खेळाडू दिलेत. असे खेळाडू, की ज्यांनी हॉकीमुळे फक्त भारतातच नाही तर, जगभरात आपली ओळख बनवली. ध्यानचंद, धनराज पिल्ले, मुहम्मद शाहीद ही आणि अशी आणखी बरीच हॉकी प्लेयर्सची नावं हाकी न बघणाऱ्यांनी सुद्धा ऐकलीच असतील.

असंच आणखी एक नाव आहे, ते म्हणजे ‘संदीप सिंग’

संदीप सिंग हे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत.

संदीप सिंग यांनी हॉकीमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते राजकारणाकडे वळलेत. अगदी परवापर्यंत ते हरियाणा राज्याचे क्रीडा मंत्री होते. भाजप पक्षाकडून राजकारणात उतरलेले असताना क्रीडा क्षेत्रातल्या तरुणांसाठी काही काम करता यावं यासाठी त्यांनी क्रीडामंत्रीपद स्विकारलं होतं. डिसेंबर २०२० मध्ये त्यांच्यावर एका ज्युनियर महिला कोचने लैंगिक छळ आणि गुन्हेगारी धमकीचे आरोप केले.

आणि काल १ जानेवारी रोजी संदीप सिंग यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

सध्या ते या कारणामुळे चर्चेत आलेत पण, त्यांचं हॉकीमधलं करीअरही अतिशय प्रेरणादायी होतं. त्यांचं हॉकीवर असलेलं प्रेम आणि हॉकी खेळण्यासाठीची त्यांची प्रबळ इच्छाशक्तीसुद्धा कौतुकास्पद होती. या बाबतीत जर बोलायचं झालं तर, संदीप सिंग यांच्या करीअरचा जो पिक टाईम होता त्या २००६ सालात जावं लागेल.

संदीप यांच्या करीअरची सुरूवीत कशी झाली ते बघुया.

हरियाणातल्या कुरुक्षेत्रमधील शाहाबादमध्ये संदीप यांचा जन्म झाला. मोठा भाऊसुद्धा हॉकीचा खेळाडू होता. त्यामुळे, हॉकीचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. २००४ मध्ये त्यांना पहिल्यांदा भारतीय हॉकी टीमसाठी खेळण्याची संधी मिळाली. सुलतान अझला शाह कप मध्ये खेळताना त्यांचा उत्तम खेळ सगळ्यांच्या लक्षात आला.

ऑलिम्पिकमध्ये खेळणारा सर्वात तरुण भारतीय हॉकी प्लेयर.

२००४ मध्येच मग संदीप सिंग यांना अथेन्स ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघात सामील करण्यात आलं, तेव्हा वयाच्या १७व्या वर्षी ते आलिम्पिकमध्ये हॉकी खेळणारे पहिले भारतीय होते. आणि आजही हा रेकॉर्ड त्यांच्याच नावावर आहे.

२००५ मध्ये ज्युनियर वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक १० गोल केल्यामुळे मग त्यांचं नाव हे हॉकीच्या खेळाडूंच्या आणि चाहत्यांच्या तोंडावर राहिलं.

इतका भारी खेळ दाखवल्यामुळे मग संदीप यांची निवड २००६च्या वर्ल्ड कपसाठी सीनियर टीममध्ये झाली. आता ही वेळ होती ती स्वत:ला सिद्ध करण्याची. आपला खेळ दाखवून हॉकीमध्ये नाव कमवण्याची आणि देशाचं वर्ल्ड कपचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी खेळण्याची संधी त्यांना मिळाली होती.

पण २००६ च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांना खेळताच आलं नाही.

वर्ल्डकपला जाण्याच्या काही दिवस आधी २२ ऑगस्टला दिल्लीला टीममधल्या बाकी खेळाडूंना जॉईन करण्यासाठी चंदीगढवरून दिल्लीला कलकी शताब्दी एक्सप्रेसने जात होते. त्यावेळी रेल्वे पोलिस फोर्समधल्या एका जवानाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी चुकून संदीप यांना लागली.

ही गोळी संदीप यांच्या ओटीपोटात लागली.

आता उपचार घ्यायचे म्हणून ते अंबाला कडून चंदीगढला जायला निघाले. पण, अँब्युलन्सने चंदीगढला जाताना ट्राफिकमुळे खूप वेळ लागला. या प्रवासात रक्तस्त्राव सुरूच होता. प्रचंड वेदना होत होत्या, पण संदीप यांची जिद्द कमालीची होती. ते चंदीगढला पोहोचले आणि डॉकटरांनी त्यांच्यावर उपचार केले.

ती गोळी बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना संदीप यांच्या छातीपासून ते ओटीपोटापर्यंत एक मोठी चिरफाड करावी लागली होती.

येवढंंच नाही तर, या सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स इतके होते की संपुर्णपणे शुद्धीत यायला त्यांना जवळपास एक महिना निघून गेला.

डॉक्टरांनी पॅरेलिसीस होण्याची शक्यता वर्तवली होती.

या कॉम्प्लिकेटेड सर्जरीनंतर डॉक्टरांनी तर संदीप यांना आयुष्यभर थेट व्हीलचेअरवर राहावं लागु शकतं असं म्हटलं होतं. त्यांच्या शरीराचा धडाखालचा भागाला पॅरेलिसीस होऊ शकतो असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं.

पण २० वर्षांच्या संदीप यांची हॉकी खेळण्याची इच्छाशक्ती इतकी तीव्र होती. डॉक्टरांनी लवकरात लवकर बरं होण्यासाठी पेनकिलर्स खाऊ नका असं सांगितल्यामुळे अनेक दिवस असह्य वेदना सहन करत राहिले पण, पेनकिलर्स खाल्ल्या नाहीत.

अनेकदा तर, आपलं करीअर पुन्हा सुरू होईल की नाही याचा विचार करताना ते फक्त तासभर झोपू शकत होते.

त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीच्या आणि चिकाटीच्या बळावर ते पुन्हा पायावर उभे राहिले, चालू-फिरू लागले, इतकंच नाही तर, पुन्हा भारतीय हॉकी टीममध्ये सुद्धा खेळू लागले. २००९ आणि २०१० च्या काळात मग त्यांनी भारतीय टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारीही त्यांनी स्विकारली. संदीप यांना आजवरच्या सर्वोत्कृष्ट कॅप्टन्सच्या यादीत स्थानही मिळवलं

२०१२ च्या ऑलिम्पिकसाठी भारतीय टीम क्वालिफाय झाली त्यामध्ये संदीप यांची मोठी भुमिका होती.

नवी दिल्ली येथे झालेल्या लंडन २०१२ ऑलिम्पिकसाठीच्या पात्रता फेरीदरम्यान, संदीप यांनी एका गेममध्ये पाच गोल केले, १४५ किमी प्रतितास स्ट्रोक केला आणि धनराज पिल्ले यांचा एका टूर्नामेंटमध्ये एका भारतीयाने केलेल्या सर्वाधिक गोलचा सर्वोच्च विक्रमही मोडला.

२०१६मध्ये मग त्यांनी हॉकीमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत ते हरियाणाच्या पेहोवा विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आणि क्रीडामंत्री म्हणून शपथ घेतली.

आता त्यांच्यावर झालेले लैंगिक छळाचे आरोप त्यांनी फेटाळून लावले असले तरी मंत्रीपदाचा राजीनामाही दिलाय. पण, त्यांचं राजकीय क्षेत्रातील करीअर आताच सुरू झालंय त्यामुळे ही घटना त्यांच्या राजकीय क्षेत्रातील अंताची सुरूवात आहे की राजकारणात ते आणखी मोठ्या पदांपर्यंत पोहोचतायत हे येणाऱ्या काळात कळेलच. एक हॉकी प्लेयर म्हणून मात्र ते सर्वोत्तम खेळाडूंच्या .यादीत आजही बसतात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.