त्यावेळी मी १० वी नापास झाले होते आत्ता पुन्हा शाळेची पायरी चढलेय..

उद्योजक होण्याची स्वप्न पाहत असलेल्या महिलांना शहरात राहूनही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात ग्रामीण महिलांचा कुठे निभाव लागणार. म्हणजे ग्रामीण महिलांनी चूल, मुल, शेती आणि ढोर सांभाळत बसायचं हे गणित ठरलेलं. पण,

या उक्तीला बगल देणारी मी सविता डकले.

औरंगाबाद शहरातील एका छोट्या खेड्यात राहणारी आणि शेती करणारी. पण, मी ही एक स्वप्न पाहिलेलं ते आज पूर्ण झालं.

या स्वप्नामागची माझी ही गोष्ट.

माझ्या माहेरची परिस्थिती तशी बेताचीच होती. आम्ही पाच भावंड होतो. तर वडील दुसऱ्याकडे रोजगारी करत तर आई भाजी विकायची. कमी मिळणाऱ्या मोबदल्यात खाणारी तोंड जास्त. यामूळ म्हणावे तसे जगता आले नाही. याचा परिणाम माझ्या शिक्षणावरही झाला. भावंडांच्या शिक्षणासाठी मी एका कंपनीत कामालाही जात होते. यामुळे माझ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे दहावीत मी नापास झाले.

हे नापास होणे तेव्हा जिव्हारी लागले. पण, परिस्थिती पुढे मी हतबल होते.

२००४ हे वर्ष माझ्या आयुष्यालाल कलाटणी देणारे ठरले. याच वर्षी पेडगावमधील शेतकरी कुटुंबात माझ लग्न झालं. माझ्या पतीची सव्वा एकर जमीन होती. हाच उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग होता. त्यामुळे कधीच शेतात न गेलेली मी शेतात जाऊ लागले आणि शेतीची कामे शिकू लागले. औरंगाबादकडे कपाशीची शेतीच जास्त पिकते. कारण इथे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. सुरुवातील जेव्हा मी कपाशी वेचण्यासाठी जायचे तेव्हा मला शेतीतील काही जमत नाही म्हणून शेजारच्या आया-बाया माझ्यावर हसायच्या आणि त्याच खूप वाईट वाटायचं.पण, मी हार न मानता सगळ काही शिकले. जिथे सुरुवातील दिवसाला १० किलो कपाशी वेचायचे तिथे आता ८० किलो कपाशी वेचते.

78571184 847699002334172 4277329974144270336 o

लग्नानंतर माझ पुस्तकी शिक्षण संपल. पण, जीवनातील शाळेत नुकताच मी दाखला घेतला होता. त्यामुळे ते शिक्षण सुरूच राहील. अगदी लवकर उठून घरातील काम आवरण शेतात जाणं. पुन्हा येऊन इतर काम करनं हे सर्व मी अगदी हौसेने शिकून घेतलं. कारण शिकणं हा एकमेव उद्देश होता.

याच दरम्यान आमच्या गावात महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी एक संस्था आली. माझ्यासाठी ही एक संधी होती. मी ती घेतली आणि त्या संस्थेत काम करायला सुरु केले. या संस्थेमार्फत आम्हाला स्वयंरोजगार आणि इतर कामाचे नियोजन कसे असावे हे शिकवले जात होते. आमच्या गावात जास्तकरून महिला शेतीच करत असल्याने त्यांना सेंद्रिय खत कसे बनवावे याचेही प्रशिक्षण दिले जायचे. याचाच अभ्यास करत मी सेंद्रिय खत कसे बनवायचे आणि सेंद्रिय शेती कशी करायची यावर काम सुरु केले. मी स्वत: सेंद्रिय शेती करायला सुरु केली आणि इतरांनाही याबद्दल माहिती दिली आणि सेंद्रिय शेती करायला प्रोत्साहन दिले.

लोकांना सेंद्रिय शेतीबद्दल समजवताना त्यांनी मला वेड्यात काढले. काहीजण माझ्यावर हसले. पण, मी माझे प्रयत्न सुरूच ठेवले. मी अनेक कृषी प्रदर्शन आणि कार्य शाळेत सहभाग घेऊन लोकांना याबद्दल समजावले.

माझ्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्यावर मी पारंपरिक कपाशीला बगल देत डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतले.

केवळ स्वत:च्याच शेतीचा विचार करण मला चुकीचं वाटल. म्हणून मी इतर महिलांच्या साथीने बचतगट सुरु केला. आणि आज मी २०० महिलांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करते

69716152 770151723422234 6129262444171755520 o.

मला २ मुले आहेत कन्याश्री ११ वर्षाची तर आदित्य ५ वर्षाचा आहे. मुलीला इंग्लिश मिडीयम शाळेत घातल्याने खर्चाची थोडी ओढाताण होते. यामुळेच मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते. रात्री घरी येऊन कपडेही शिवते. माझ्या मुलीमुळे मी आज पुन्हा एकदा १० ची परीक्षा देण्याचे धाडस करू शकले आहे. मुलीकडून इंग्रजी शिकून मी २ जानेवारी २०२० रोजी दहावीची परीक्षा दिली. निकाल चांगला आल्यावर मला ११ वी साठी प्रवेश घ्यायचा आहे.

आता पुन्हा एकदा शाळेची पायरी चढल्याने लोक मला ऐकवतात, आता काय गरज आहे शिकायची. फी जास्त आहे. पण, मी त्यांना उत्तर देते की, मला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण मी शिकणार..

मी सोशल मिडीया वापरते. तिथे मी माझ्या कामाचे, शेतीचे फोटो टाकत असते. लोक मला प्रोत्साहन देतात. माझी वेगळी ओळख या जगापर्यंत पोहोचवण्यात सोशल मिडीयाने मोठी मदत केलीय मला.

या संपूर्ण प्रवासात मला पतीची आणि कुटुंबाची साथ खूप लाभली. मला फक्त आता माझे राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पुस्तकी शिक्षणाची सुटलेली साथ पुन्हा एकदा धरायची आहे. आणि उच्चशिक्षित व्हायचं आहे.

शब्दांकन : पूजा कदम 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.