मुख्यमंत्र्यांची सुपारी घेणारा डॉन पोरगीच्या नादात मेला !

२३ सप्टेंबर १९९८.

भारतातल्या सर्वात महागड्या एन्काऊंटर पैकी एक असणाऱ्या एन्काऊंटरमध्ये याच दिवशी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘स्पेशल टास्क फोर्स’ने (एसटीएफ) कुख्यात सुपारी किलर श्रीप्रकाश शुक्ला याचा खातमा केला होता. एसटीएफच्या या कारवाईमुळे उत्तर प्रदेश मधील श्रीप्रकाश शुक्लाची दहशत संपवण्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या या तुकडीला यश आलं होतं.

श्रीप्रकाश शुक्लाचं हे एन्काऊंटर उत्तर प्रदेशातल सर्वात मोठं एन्काऊंटर समजलं जातं,

कोण होता श्रीप्रकाश शुक्ला..?

नव्वदच्या दशकात श्रीप्रकाश शुक्ला हे उत्तर प्रदेशातील दहशतीचं दहशतीचं दुसरं नाव बनलं होतं. सामान्य माणूस तर सोडाच वर्दीतील पोलिसांमध्ये देखील त्याची दहशत होती. त्याच्या केवळ नावानेच माणसं थरथर कापायची.

उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात जन्मलेला श्रीप्रकाश तसा चांगल्या घरचा. वडील शिक्षक होते त्याचे. पैलवानकी करायचा. पण एका दिवशी राकेश तिवारी नावाच्या एका टपोरी पोरानं श्रीप्रकाशच्या बहिणीची छेड काढली. त्यानंतर गरम डोक्याच्या श्रीप्रकाशने थेट राकेश तिवारीला देवाघरी पाठवलं. गुन्हेगारी जगताशी त्याचा संबंध आला तो इथूनच.

आता थेट एका माणसाचा खूनच केला होता. साहजिकच पोलीस मागे पडले. तर पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी त्यानं  बँकॉक गाठलं. काही दिवस तिथे काढल्यावर पैशाची तंगी जाणवायला लागली अन तो भारतात परत आला आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने बिहारमधील सुरजभान गँग जॉईन केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या हत्येची सुपारी.

तिथून पुढे त्यांची गुन्हेगारी जगतातली दहशत वाढत गेली ती वाढतच गेली. खून, दरोडे, खंडणी यांसारख्या अनेक कारनाम्यांना त्याने अंजाम दिला.

१९९७ साली त्याने उत्तरप्रदेशातील बाहुबली नेता आणि गुन्हेगारी जगतातल मोठं नाव असलेल्या वीरेंद्र शाही याची लखनऊमध्ये हत्या केली.

शाहीच्या हत्येने उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी जगतात एकच खळबळ माजली, शिवाय श्रीप्रकाशचा दरारा देखील वाढला. कारण त्यावेळी तो होता अवघ्या २५ वर्षांचा. या वयातच त्याने आपल्या नावाची दहशत तयार केली होती. या हत्येनंतरच वर्षभराने त्याने,

जून १९९८ साली बिहार सरकार मधील मंत्री ब्रिज बिहारी प्रसाद यांची देखील हत्या केली होती.

तोपर्यंत श्रीप्रकाश सुपारी किलर म्हणून कुख्यात झाला होता आणि साधासुधा नाही तर अतिशय महागडा ‘सुपारी किलर’ म्हणून त्याने स्वतःला प्रस्थापित केलं होतं. त्याला उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी जगतावर आपलं एकछत्री वर्चस्व निर्माण करायचं होतं. याच शृंखलेत त्याने उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या हत्येची देखील सुपारी घेतली होती.

कल्याण सिंग यांच्या जीवाची किंमत लावण्यात आली होती ५ कोट रुपये !

थेट मुख्यमंत्र्यांचीच सुपारी घेतल्यानंतर श्रीप्रकाशने अजून एक काम केलं ते म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसातील आर.के. सिंह यांची भर दिवसा हत्या केली. आता थेट पोलिसांशीच पंगा आणि मुख्यमंत्र्यांची सुपारी म्हंटल्यावर तो पोलिसांच्या हिटलिस्टवर आला नसता तर नवलच.

श्रीप्रकाश आता उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘इज्जतीचा सवाल’ बनला होता.

अक्सीर इलाज – एन्काऊंटर स्पेशालिस्ट आयपीएस अजय राज शर्मा.

मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक कन्हैया लाल गुप्ता यांच्याबरोबरच्या बैठकीत श्रीप्रकाशचा अक्सीर इलाज विचारला आणि कन्हैया लाल यांनी या जबाबदारीसाठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट आयपीएस अजय राज शर्मा यांचं नाव सुचवलं. या केसची जबाबदारी आपल्याकडे कशी आली हे सांगताना शर्मा यांनीच हा किस्सा माध्यमांना सांगितला होता.

कल्याण सिंग यांनी अजय राज शर्मा यांना बोलावलं. शर्मा यांनी श्रीप्रकाशला पकडण्यासाठीचा आपला मास्टर प्लॅन सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांना धक्काच बसला कारण त्याचा खर्च कोट्यावधी रुपयांमध्ये जाणार होता. पण श्रीप्रकाश हे एवढं मोठं आव्हान बनलं होतं आणि शिवाय स्वतःच्या जीवाला धोका होता त्यामुळे कल्याण सिंग यांनी शेवटी अजय राज शर्मा यांना परवानगी दिली.

३० सप्टेंबरची ‘डेड’ लाईन.

अजय राज शर्मा यांनी देखील मुख्यमंत्र्यांना शब्द दिला ३० सप्टेंबर १९९८ पर्यंत श्रीप्रकाश संपलेला असेल. श्रीप्रकाश इतका अट्टल होता की त्याच्या एन्काऊंटरशिवाय शर्मा यांना कदाचित दुसरा पर्याय सुद्धा दिसत नसावा. त्यामुळेच जेव्हा श्रीप्रकाशशी समोरा-समोर मुकाबला होईल त्यावेळी तो पोलिसांवर एके-४७ मधून गोळ्यांचा वर्षाव करणार आणि अशा परिस्थितीत त्याला जिवंत पकडणं हे केवळ अशक्य होणार, याची पूर्वकल्पना शर्मा यांना होतीच.

शर्मा यांनी योजना बनवली. १० कोऱ्या करकरीत टाटा सुमो मागविण्यात आल्या. आपल्या पसंतीचे ऑफिसर्स घेऊन ५० पोलीस अधिकाऱ्यांची एक तुकडी बनविण्यात आली. तिला ‘स्पेशल टास्क फोर्स’ असं नाव देण्यात  आलं. या सगळ्यांना अत्याधुनिक शस्त्रसाठ्याने सज्ज करण्यात आलं. शर्मा यांनी स्वतः या एसटीएफचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. पोलिसांनी एखाद्या खास मोहिमेसाठी अशा प्रकारे ‘एसटीएफ’ बनविण्याची सुरुवात झाली ती इथूनच.

अजय राज शर्मा यांनी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना श्रीप्रकाश शुक्लाची ‘डेड’लाईन सांगितली तेव्हा त्यांनीच बनवलेली ‘एसटीएफ’ची टीम सुद्धा गुपचुपपणे त्यांच्यावर हसत होती. कारण किमान त्यावेळी तरी श्रीप्रकाशचा कुठलाच आतापता या टीमकडे नव्हता आणि असं असतानाही अजय राज शर्मा यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता की ३० सप्टेंबर पर्यंत तो संपलेला असेल म्हणून.

श्रीप्रकाश, त्याची गर्लफ्रेंड आणि फोन…

श्रीप्रकाश ऐशोआरामिच्या जीवनासाठी प्रसिद्ध होता. त्याची एक गर्लफ्रेंड होती. जिच्याशी तो फोनवर तासंतास बोलत असायचा. हीच गर्लफ्रेंड आणि हेच फोनवरच तासंतासच बोलणं, पुढे चालून त्याचा काळ बनणार होतं, याची कदाचित श्रीप्रकाशला कल्पना नसावी.

त्यानंतर श्रीप्रकाश याचा फोन टॅप करण्यात आला. त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येऊ लागली. श्रीप्रकाशवर पाळत ठेवलेली असल्याने त्याचा पाठलाग करत-करत ‘एसटीएफ’ची टीम २१-२२ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातून दिल्लीत येऊन धडकली. त्यानंतर या तुकडीला बातमी समजली की श्रीप्रकाश आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला दिल्लीहून गोरखपूरला जाणार आहे.

२३ सप्टेंबरचा तो दिवस श्रीप्रकाशसाठी ‘काळरात्र’ ठरला.

‘एसटीएफ’ने दिल्लीच्या विमानतळावर आपलं जाळ पसरवलं, पण कित्येक तास उलटल्यानंतरही तो आलाच नाही. तो आपल्या घरात आराम करत पडून राहिला आणि पोलीस विमानतळावर त्याची वाट बघत राहिले.

त्यानंतर २३ सप्टेंबरचा दिवस उजाडला. त्या दिवशी श्रीप्रकाश आपल्या निळ्या कारमधून बाहेर पडल्यापासूनच त्याचा पाठलाग सुरु करण्यात आला. दुपारच्या वेळी गाजियाबादच्या वसुंधरा-इंदिरापुरम परिसरात ‘एसटीएफ’ने श्रीप्रकाश शुक्लाच्या गाडीला घेराव घातला. गाडीत त्याच्यासोबत अनुज प्रताप सिंह आणि सुधीर त्रिपाठी नावाचे त्याचे २ पंटर देखील होती.

श्रीप्रकाशने बचावाचा खूप प्रयत्न केला पण तो सगळ्या बाजूंनी घेरला गेला होता. शेवटी त्याने आपली रिव्हॉल्वर काढली आणि ‘एसटीएफ’वर गोळीबार करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरात ‘एसटीएफ’ने देखील त्याच्या गाडीवर गोळीबार केला.

दोन्ही बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव झाला आणि शेवटी या झटापटीत श्रीप्रकाश शुक्ला आपल्या दोन्ही पंटरसह मारला गेला आणि ‘एसटीएफ’च्या टीमने श्रीप्रकाश शुक्ला नावाच्या उत्तर प्रदेशातील दहशतपर्वाचा खातमा केला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.