इम्रान हाश्मीला सुद्धा पिक्चर बनवायचा मोह होतो असे डिटेक्टिव्ह भांडे पाटील कोण आहेत ?
स्पाय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं एक गूढ व्यक्तिमत्व. गोल टोपी, पायपर्यंत कोट आणि त्याचे नेहमी काहीतरी शोधणारे त्याचे डोळे. जर तो जेम्स बॉण्ड सारखा फॉरेनचा असेल तर त्याच्या आजूबाजूला हॉट पोरी. असा त्याचा ठरलेला बाज. त्यात जेम्स बॉण्ड,शेरलॉक होम्स अशी स्टायलिश नावं. ही नाव ज्यांना माहित नसतील त्यांनी शाहरुखचा ‘बादशहा’ पिक्चर आणि त्याची ती अतरंगी स्पाय एजेंसी तरी माहित असेल. खऱ्या आयुष्यात हेर असणाऱ्या सूर्यकांत भांडे-पाटील यांच्याकडं बघितल्यावर तुम्हाला एकवेळ असला पिक्चरमधल्या हेरांसारखा दिखावा दिसणार नाही पण त्यांचं काम पिक्चरच्या हेरांना मागं सरणारं आहे.
व्यवसायानं बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या सूर्यकांत भांडे पाटील यांचं आयुष्य सामान्य लोकांसारखंच चाललं होतं. पुण्यातल्या शिरवळ इथं त्यांचं कुटुंब सुखात नांदत होतं.
मात्र २९ नोव्हेंबर १९९९ या दिवशी घडलेल्या घटनेनं त्यांचं आयुष्यच बदललं.
सूर्यकांत यांचा लहान मुलगा संकेत याचं अपहरण करण्यात आलं होतं. आता अपहरणकर्ता भांडे पाटलांकडं खंडणीची मागणी करु लागला. भांडेपाटील यांनी मग लगेच पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी पण मग तपास सुरु केला.
पोलिसांचा तपास अगदी मंद गतीनं सुरु होता. महिन्यांवर महिने पुढे सरकत होते. मात्र पोलिसांकडून तारिख पे तारीख शिवाय सूर्यकांत यांच्या हाती काही लागत नव्हते. अखेर हतबल होउन या पित्यानं सूत्र स्वतःच्या हातात घेतली. त्यांनी दोन वेळा ट्रॅप लावून अपहरणकर्त्याला खंडणी घेण्यासाठी बोलावलं.
मात्र पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत अपहरणकर्ता पैसे घेऊन पसार झाला.
सूर्यकांत यांच्या हाती पुन्हा निराशा लागली होती. त्याच दरम्यान पुण्यामध्ये अपहरणाची अजून एक घटना घडली. आपल्या मुलाच्या अपहरणाची घटना आणि ही घटना यात बऱ्याच गोष्टी सूर्यकांत यांना सारख्या वाटल्या. मग या दोन्ही घटनांमधील साम्य पाहून पाटील यांनी त्या दिशेने तपास सुरु केला. मुलाच्या अपहरणकर्त्यापर्यंत पोहचण्यासाठी सूर्यकांत एकेक क्लू रात्रंदिवस तपास करून जमा करत होते. महिन्यांवर महिने जात होते मात्र तरीही अपहरणकर्त्याचा सुगावा लागत नव्हता.
अखेर तब्बल आठ महिन्यांच्या तपासानंतर अपहरणकर्त्यापर्यंत पोहचण्यात भांडेपाटील यशस्वी झाले.
संकेत बेपत्ता झाला त्यादिवशी बंगल्याबाहेर घरातील फर्निचरला पॉलीश करणाऱ्या कामगारानेच घात केल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र आता खूप उशिर झाला होता. अपहरणकर्त्यांनी त्यांचा लहान मुलगा संकेतची हत्या केली होती.
या घटनेने पाटील कुटुंबीय पार हादरून गेलं. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. मात्र या घटनेतून स्वतःला सावरत आपल्यासारखं दुःख इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी अशा अपहरणाच्या घटनांनामध्ये लोकांना मदत करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलगा संकेत याच्या नावानं स्पाय एजन्सी काढली.या एजंसीद्वारे सूर्यकांत भांडेपाटील अपहरणाच्या घटनांमध्ये आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलिस आणि पीडित कुटुंबियांना मदत करतात. विशेष म्हणजे या कामासाठी हा भला माणूस एक पैसाही घेत नाही.आजपर्यंत त्यांनी मुलांच्या अपहरणाच्या तब्बल १२० केस सोडवल्या आहेत.
सध्या त्यांनी गरजूंना मदत करण्यासाठी स्वतःची वेबसाईट देखील काढली आहे. सूर्यकांत यांच्या या डॅशिंग कामाची बॉलिवूड ला भुरळ पडली नसती तर नवलच. मध्यंतरी भांडे पाटील यांच्या आयुष्यावर पिक्चर काढण्याची घोषणाही इम्रान हाश्मीनं केली होती. मात्र पिक्चर येऊ दे अगर नको सूर्यकांत भांडे पाटील या एका बापाची कहाणी खरीच बाप आहे.
हे ही वाच भिडू :
- तब्बल ३५ वर्षे पाकिस्तानच्या काळ कोठडीत काढून जिवंत परतणारा सुपरस्पाय
- दुबईच्या शेखने सुद्धा आपल्या बायकोवर लक्ष ठेवायला पेगाससचा वापर केला होता
- फक्त ब्लॅक लेबल व्हिस्कीसाठी देशाची गोपनीय कागदपत्रे विकली गेली होती.