उद्योगाच्या शोधात औरंगाबादला आलेला माणूस अब्जाधीश झालाय…!!!

 

व्हेरॉक इंजिनिअरिंगने २०१२ साली ‘व्हिस्टन्स ग्लोबल लायटिंग बिझनेस’ ही अमेरिकन कंपनी विकत घेण्यासाठीचा  व्यवहार सुरु केला होता तो पूर्णत्वास गेलाय. २००० साली फोर्ड मोटर कंपनीतून बाहेर पडलेली व्हिस्टन कॉर्प. विकत घेणं हे व्हेरॉकच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मानलं जातंय. ऑटोपार्टस निर्मितीतील जगातील एक महत्वाची कंपनी ताब्यात आल्याने जगभरात आपल्या उद्योग विस्ताराच्या दृष्टीने व्हेरॉकने अतिशय दमदार पाऊल टाकलंय. या व्यवहाराने व्हेरॉकच्या तरंग जैन यांना जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत नेऊन बसवलंय. फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या २०१८ च्या जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत तरंग जैन यांचा समावेश झालाय. त्यापूर्वी फोर्ब्सनं तरंग जैन यांना ‘नेक्स्ट जनरेशन आंत्रप्रेन्युअर’पुरस्काराने देखील गौरवलंय. यानिमित्ताने जाणून घेऊयात तरंग जैन आणि व्हेरॉक इंजिनिअरिंगविषयी….

मुळचे दिल्लीचे असणाऱ्या तरंग जैन आणि अनुराग जैन या जैन बंधूंचा प्रवास सुरु होतो तो ऐंशीच्या दशकात. मुंबईतील सीडनहॅम कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरंग जैन यांनी सुरुवातीचे काही दिवस आपल्या भावासोबत, अनुराग यांच्यासोबत स्थानिक कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं आणि त्यानंतर आपला स्वतःचा बिझनेस सुरु केल्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.  उद्योजकतेचं बाळकडू तर घरातूनच मिळालं होतं. वडील बजाज कंपनीला इलेक्ट्रिक स्वीच सप्लाय करण्याचं काम करत होते. प्रख्यात उद्योजक राहुल बजाज हे जैन बंधूंचे मामा. त्यामुळे या दोघांनीही मामा राहुल बजाज यांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. इथे काम करत असताना त्यांच्या यशाने प्रेरणा घेऊन आपण देखील स्वतंत्र उद्योग सुरु करावा असं वाटायला लागलं आणि त्यांनी मुंबईहून थेट मराठवाड्यातील औरंगाबाद गाठलं. इथंच व्हेरॉक इंजिनिअरिंगच्या स्थापनेची पायाभरणी व्हायला सुरुवात झाली.

varrock Tarang Jain
Twitter

खरं तर व्हेरॉक इंजिनिअरिंग औरंगाबादमध्ये येण्याचं कारण देखील इंटरेस्टिंग आहे. जैन स्वतः नवीन कंपनीची सुरुवात पुण्यात करू इच्छित होते, पण त्यांना परवाना मिळाला औरंगाबादचा. आता हा औरंगाबादचा परवाना एका अर्थाने त्यांच्यासाठी पूरकच ठरला कारण त्याचवेळी त्यांचे मामा बजाज ऑटोच्या नवीन प्लांटची सुरुवात औरंगाबादमध्ये करणार होते. नव्याने उद्योग सुरु करणाऱ्या जैन बंधुंसाठी ही संधीच होती. बजाज ऑटोसाठी सप्लायर म्हणून त्यांना संधी मिळाली आणि १९८५ मध्ये अनुराग इंजिनीअरिंग प्रा. ली. चा जन्म झाला. जी पुढे इंड्यूरन्स नावाने ओळखली जाऊ लागली. सुरुवातीचे काही दिवस खडतर राहिले पण नंतर या कंपनीने जम बसवला. कंपनीचं काम जोरात सुरु झालं.

तोपर्यंत तरंग जैन यांनी स्वित्झर्लंड येथील ‘इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ मधून एमबीए पूर्ण केलं होतं. आता अनुराग इंजिनीअरिंग पासून वेगळं होत स्वतःचा नवीन सेट-अप उभारणीची कल्पना त्यांच्या डोक्यात घोळत होती.  त्यामुळे १९९० मध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या व्हेरॉक ग्रुपची स्थापना केली. प्लॅस्टिक आणि पॉलीमरचे मोटरसायकल पार्टस बनवण्याचं काम व्हेरॉक करायला लागली.  व्हेरॉकसाठीही सर्वात मोठा आधार होता बजाजचाच. बजाजचा आधार घेऊन सुरुवात केलेल्या  व्हेरॉकने आपले नवीन ग्राहक शोधले आणि जम बसवायला सुरुवात केली. व्हिडीओकॉन ही कंपनी त्यांच्या सुरुवातीच्या काही ग्राहकांपैकी एक होय.

सुरुवातीच्या १० वर्षात कंपनीची वाढ संथ गतीनेच सुरु होती. आपला बिझनेस बजाजवर खूप जास्त अवलंबून असल्याचं लक्षात आल्याने मग त्यांनी नवीन ग्राहकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. जसजसे नवीन ग्राहक मिळत गेले तसतसा कंपनीचा व्यवसाय वाढायला लागला. आज परिस्थिती अशी आहे की भारतातील जवळपास सर्व महत्वाचे मोटार उत्पादक हे  व्हेरॉकचे ग्राहक आहेत. व्हेरॉक ही आजघडीला भारतातील पहिल्या क्रमांकाची मोटरसायकल पार्टस सप्लायर करणारी कंपनी आहे. व्हेरॉक आता फक्त औरंगाबाद पुरती मर्यादित राहिली नसून आंतरराष्ट्रीय बाजाराला देखील आपली दखल घ्यायला व्हेरॉकने भाग पाडलंय. मेक्सिको, झेक रिपब्लिक आणि चीननंतर आता व्हेरॉकने अमेरिकेत आपले पाय रोवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केलीये. २०२० पर्यंत आपला बिझनेस २० हजार करोड पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट्ये व्हेरॉकने ठेवलंय. हे उद्दिष्ट्ये साध्य करणं तितकंस सोपं नसलं तरी आम्ही त्यादृष्टीने कठोर मेहनत घेत असल्याचं तरंग जैन मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात.

9 Comments
 1. सचिन says

  अनुराग जैन की अनुरंग जैन

 2. Admin BolBhidu says

  अनुरंग नव्हे, अनुरागच..!!!

 3. Bhushan patil says

  I want job in varroc group

 4. Anonymous says

  good work sir

 5. Vishnu Gadekar says

  नमस्कार सर
  मी पण broach new & resharpenig चा
  उद्योग औरंगाबाद येथे चालू केला आहे व व्हेराक कंपनी चेच काम करून दिले
  पण माझी कुठे ओलख नसल्याय कारणाने मला काम भेटत नाही
  तुमचया कडून मदतीची अपेक्षा
  S S Enterprises
  Auragabad
  cont. Gadekar Vishnu..9923454518

 6. Dr katkar Dhananjay says

  Great Inspiring innovative and mind blowing proud of you.

Leave A Reply

Your email address will not be published.