J 1 झालं का? असा मॅसेज नाही आला तरी ज्या पोरी रडत नाहीत त्या पोरी पण BTS मुळे रडल्या

काल ऑफिसवरून घरी गेले तेव्हा रूममेट हमसून हमसून रडत होती. म्हणून तिची विचारपूस करायला सुरुवात केली… बायो, काय झालंय? कुणी काही बोललं का? रिझल्ट लागला का? ब्रेकअप झालं का? सगळ्यांच्या उत्तरात नकारार्थी मान फिरवत रडणं सुरूच.. मग म्हटलं कुठे लागलंय का? हे विचारल्यावर तिने होकारार्थी मान फिरवली. 

मी लगेच हात, पाय, डोकं अशी चाचपणी केली पण नक्की लागलं कुठे काही घावना. तेव्हा हळूच तिने इशारा करत सांगितलं… लागलंय, कुठे तर हृदयात, कारण काय ‘BTS‘. पुढे काहीही न विचारता तिचं पुराण सुरु झालं होतं… “BTS बँड बंद झाला आहे, आता त्यांची गाणी नसणार”…  हेच परत परत ऐकवणं सुरु होतं. थोड्याच वेळात मला प्रचिती आली की फक्त हीच नाही तर निम्मं हॉस्टेल रडत होतं… 

म्हणून विचार आला ‘ये BTS किस खेत की मुली है, जरा देखा जाये’… 

BTS हा एक कोरियन म्युझिक बँड होता. बँगटन सेयोदेन असा त्याचा फुलफॉर्म ज्याचा कोरियन अर्थ म्हणजे ‘बुलेटप्रूफ बॉय स्काउट्स’. म्हणजेच रूढी, टीका आणि किशोरवयीन मुलांवर टाकल्या जाणाऱ्या अपेक्षांना बुलेटप्रमाणे आळा घालणं,पडल्यानंतर पुन्हा उठून भरारी घेणं. 

गोऱ्या रंगाच्या, दिसायला देखण्या, कमाल डान्स करणाऱ्या आणि कमाल गाणाऱ्या मुलांचा हा म्युझिक बँड. एकूण या बँडमध्ये सात मुलं होती. ज्यांच्यासाठी अक्ख्या जगातील पोरी आजही वेड्या झाल्या आहेत. मुलीच काय पोरं पण त्यांच्या गाण्यांचे फॅन्स आहेत. 

WhatsApp Image 2022 06 15 at 8.50.31 PM

साऊथ कोरियामध्ये एक सिस्टीम आहे बघा. तिथे एखादी कंपनी असे ग्रुप तयार करते आणि मग त्यांना फेमस करत स्वतः फेमस होते. अगदी त्यांची ट्रेनिंग, शो, स्पॉन्सर्स सगळं त्यांच्याकडे असतं. अशाच बिग हिट एंटरटेनमेंट नावाच्या कंपनीने BTS ची उभारणी केली. या कंपनीचे सीईओ आरएम नावाच्या मुलाच्या रॅपिंग स्किलने खूप प्रभावी झाले होते. त्यातूनच त्यांना असा बँड उभा करण्याची कल्पना आली.

त्यांनी ऑडिशन सुरु केलं आणि त्यातून जे-होप, जिमीन, जिन, जंगकुक, आरएम, सुगा आणि व्ही या सात मुलांची निवड केली. सामाजिक प्रश्नांबद्दल जागरूक असलेला बँड असं उद्दिष्ट त्यांना सांगून भरपूर प्रशिक्षण घेण्यात आलं. सगळे सोबत राहत दिवसातून १५ तास प्रॅक्टिस करत होते. २०१० मध्ये हा ग्रुप तयार झाला होता. मात्र त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं २०१३ ला.  

‘2 कूल 4 स्कूल’ या अल्बमद्वारे त्यांनी के-पॉप म्युझिक क्षेत्रात पदार्पण केलं. ‘नो मोर ड्रीम’ या गाण्याने तर म्युझिक क्षेत्रात धुमाकूळ घालायला सुरवात केली. २०१४ मध्ये त्यांनी त्यांनी पहिला कोरियन-भाषेतील स्टुडिओ अल्बम, ‘डार्क अँड वाईल्ड’ आणला.  ‘विंग्ज’ या दुसऱ्या अल्बमच्या तर दक्षिण कोरियात दहा लाख प्रती विकल्या गेल्या. आणि २०१७ येता-येता बीटीएसने जागतिक संगीत बाजारात प्रवेश करत आपला ठसा उमटवला. 

‘डोप’ हा त्यांचा दुसरा सिंगल अल्बम बिलबोर्डच्या वर्ल्ड डिजिटल साँग्स चार्टवर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आणि यूट्यूबवर १०० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवणारा त्यांचा पहिला म्युझिक व्हिडिओ ठरला. २०१५ मध्ये त्यांनी जपानमध्ये पहिला कॉन्सर्ट करत लाईव्ह परफॉर्मन्सची सुरुवात केली आणि लवकरच वर्ल्ड टूर सुरु झाल्या ज्यात त्यांनी आशिया, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिकेतल्या सगळ्या देशांचा दौरा केला.

बीटीएसच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते तरुणाच्या व्यथा, आत्महत्या, महिला सशक्तीकरण, मानसिक त्रास अशा गोष्टींवर गाणी बनवायचे आणि त्यातून तरुणाईला संदेश द्यायचे. म्हणूनच ते थोड्याच कालावधीत तरुणांमध्ये आणि सोशल मीडियावरही हिट होऊ लागले. त्यांच्या चाहत्यांनी ‘BTS आर्मी’ उभारली. 

त्यांचं गाणं रिलीज झालं की, २४ तासांत त्याला किती व्ह्यूज मिळतात याच्या जागतिक स्तरावर बातम्या होऊ लागल्या. कारण त्यांनी रेकॉर्ड्सच तसे तोडायला सुरुवात केली. 

अलीकडंचं उदाहरण देऊन सांगायचं तर त्यांचं ‘येट टू कम’ हे गाणं जेव्हा रिलीज झालं तेव्हा २४ तासांच्या आत जपानमध्ये २७ मिलियन, भारतात २४ मिलियन आणि मेक्सिकोमध्ये १५ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी ते बघितलं.

इतकंच काय २०२० मध्ये जेव्हा या बँडने पाहिलं इंग्लिश भाषेतलं गाणं ‘डायनामाईट’ रिलीज केलं तेव्हा २४ तासांच्या आत १०० मिलियनपेक्षा जास्त लोकांनी ते पाहिलं. ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी कोरियन ऍक्टला पहिलं नॉमिनेशन या गाण्याने दिलं. तर बिलबोर्ड हॉट हंड्रेड चार्टवर पहिलं स्थान मिळवलं. आणि तब्बल तीन आठवडे तिथे ठाण मांडलं. 

WhatsApp Image 2022 06 15 at 8.50.49 PM

त्यांचे यूट्यूबवर ६७ मिलियनपेक्षा जास्त स्बस्क्राइबर्स तर इंस्टाग्रामवर ६५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बिलियनच्या घरात त्यांच्या गाण्यांना व्युज आहेत. 

अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. जगातील सर्वात मोठा फॅन-व्होटेड अवॉर्ड्स शो असलेल्या अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये आर्टिस्ट ऑफ द इयर जिंकणारा बीटीएस हा पहिला आशियाई ग्रुप आहे. के-पॉप म्युझिकला जागतिक पातळीवर ओळख दिली ती याच BTS बँडने. आणि लेडी गागा, एरियाना, जस्टिन बिबर, टेलर स्विफ्ट सारख्या टॉपच्या कलाकारांना पाणी पाजलं ते BTS नेच. 

जून २०२२ मध्ये, बीटीएसने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत व्हाईट हाऊसला भेट देत कोरियाला आंतराराष्ट्रीय स्तरावर रिप्रेझेंट केलं. 

WhatsApp Image 2022 06 15 at 8.51.22 PM

लिस्ट अजूनही खूप मोठीये…. 

फक्त २५-२६ वर्षांच्या सात पोरांनी ही कमाल केलीये. तीही केवळ ९ वर्षांत. पण आता हा प्रवास थांबला आहे. बीटीएसने मंगळवारी १४ जूनला जाहीर केलं की ते आता सोबत काम करणार नाहीत.  आता प्रत्येक जण स्वतःच्या स्वतंत्र कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करणार आहेत, म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. 

त्यांची गाणी अशी उभारी देणारी आहेत की, अनेकांनी तर अक्खं लॉकडाउन त्यांच्या गाण्यातून एनर्जी घेत काढलंय. त्यांची गाणी, त्यातला संदेश आणि या पोरांचा आवाज यांच्यासोबत त्यांच्या फॅन्सचं एक भावनिक कनेक्शन निर्माण  झालंय. म्हणूनच आता त्यांची गाणी ऐकायला मिळणार नाही या विचारानेच अनेकांची अवस्था माझ्या रूममेट सारखी झालीये… 

तुम्ही पण BTS चे फॅन आहात का? असाल ही बातमीवर ऐकल्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? कमेंट्समध्ये नक्की सांगा… 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.