उरुग्वेच्या त्या विमान दुर्घटनेतल्या लोकांनी जगण्यासाठी प्रेतं खाल्ली होती

शाळेत असताना एक गोष्ट ऐकली होती की,

कधीकाळी दुरकुठं तरी एक विमान कोसळल होत आणि त्यात जिवंत राहिलेल्या लोकांनी एकमेकांना खाल्लं होत. तेव्हा खोटंच वाटलं होतं मला.

आणि काळाच्या ओघात ही गोष्ट मी विसरून पण गेलो होतो. पण योगायोग बघा आज एक फोटो बघितला आणि त्यावरचा तो चार लाईनचा msg वाचला आणि ती गोष्ट मला परत आठवली. म्हंटल ही घटना नक्की काय होती याचा शोध घेतलाच पाहिजे.

टीप – कमजोर दिलवाले इन्सान इसे ना पढें ।

काळजाचा थरकाप उडवून देणारी ही गोष्ट घडली होती तब्बल पन्नास वर्षांपूर्वी. ते साल होत १९७२ चं. १३ ऑक्टोबरची ती सकाळ, अगदीच प्रसन्न, मोकळं आणि निरभ्र आकाश असं वातावरण. उरुग्वे च्या मोंटेविडयो एयरपोर्ट वरुन ४५ लोकांना सोबत घेऊन फेयरचाइल्ड एफ 227 हे विमान निघणार होत. तसं ते निघालं ही. त्या विमानात उरुग्वेच्या ओल्ड क्रिश्चियन रग्बी टीमचे खेळाडू आणि त्यांची दोस्तमंडळी होती.

एकूण ४० मेंबर आणि ५ क्रू मेंबर असे सगळेजण त्या विमानात होते. विमानाचा रूट होता चिली सेंटियागो इथून, कारण तिथं रग्बीची मॅच होणार होती. विमानाने अवकाशात झेप घेतली तसा आत बसलेल्या सगळ्यांचाच जोश वाढला होता. प्रत्येक जण मॅच जिंकण्याचा विचार करत होते. त्यातल्या कोणाला ही माहीत नव्हतं की त्यांच्या पुढ्यात खरं तर मृत्यू वाढून ठेवलाय ते.

आता सेंटियागोला जायचं तर मध्ये एंडीज पर्वतमाला लागणार होती. ही पर्वतराजी दिसायला सूंदर, पण लांबूनच. आता रस्ताच उंच बर्फाच्छादित टेकड्यांमधून जात होता. त्याला काही पर्याय नव्हताया पर्वतांच्या मधून जाताना विमानाला हवामानाची समस्या यायला लागली होती. त्या बर्फाच्छादित टेकड्यांमधून विमान सुरक्षितपणे पोहोचवणे हे क्रू साठी मोठं आव्हान होतं.

विमान अर्ध्या टप्प्यावर पोहोचताच हवामान खराब व्हायला सुरुवात झाली. ढगांनी विमानाचा मार्ग अडवला आणि विमान अर्जेंटिनाच्या सीमेकडे भरकटलं.

खाली बर्फाच्छादित मैदान, धोकादायक पर्वतशिखर आणि वर विमानात अडकलेले ४५ लोक. वैमानिकाने विमान वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. पण खराब हवामान आणि वादळी वाऱ्यासमोर त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.

११८०० फूट उंचीवर विमान आधी एका बाजूच्या टेकडीच्या कोपऱ्यावर आदळलं आणि मग लहरत असताना दुसऱ्या टेकडीवर जाऊन आदळलं. विमान डळमळू लागलं. आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच काही मिनिटांतच बर्फाच्या वाळवंटात विमानाचे तुकडे झाले. कैरो सीलर नावाच्या या अँडीजच्या बर्फाच्छादित टेकड्यांमध्ये आजूबाजूला हिमनद्या आणि बर्फ पसरला होता. आणि बरोबर मधोमध उरुग्वेच्या हवाई दलाच्या त्या फेयरच्लाइड विमानाचा तो ढिगारा.

या दुर्घटनेत विमानातल्या १२ जणांचा मृत्यू झाला आणि ५ जण मृत्यूच्या दाढेतच अडकले होते म्हणायचे. आणि विमानातले उरलेले जिवंत लोक बर्फाच्या वाळवंटात एकाकी पडले होते.

अँडीजच्या त्या बर्फाळ टेकड्यांमध्ये अडकलेल्या आणि वाचलेल्या लोकांना आता काय करावं हेच समजत नव्हत. या अपघातात कोणीही जिवंत राहिलेल नाही असे जगाला वाटलं. पण इथं परिस्थिती वेगळीच होती. पांढऱ्या रंगाच ते विमान बर्फाच्या वाळवंटात अशा प्रकारे दडून बसलं होतं की त्याला किती जरी शोधायचा प्रयत्न झाला तरी तो निष्फळचं ठरत होता.

रेस्क्यू टीमने ज्या भागात विमान कोसळलं तो भाग पालथा घातला पण त्यांना काहीच सापडतं नव्हतं. तर दुसरीकडे लोक बचावासाठी खाली जीवा मरणाच्या आकांतान ओरडत होती. पण त्यांचा आवाज बर्फाळ टेकड्यांमध्ये हरवला होता.

आता या बर्फाळ वाळवंटात प्रवासी आणि क्रू मेम्बर धरून एकूण ४५ लोकांपैकी फक्त २८ जीव उरले होते. जेव्हा त्या बर्फाळ वाळवंटात वादळ यायचं तेव्हा हे लोक मोडलेल्या त्या विमानाच्या भागांचा आधार घेत लपून बसायचे. या सगळ्यात काहींनी आपले हात गमावले तर कुणी आपले पाय.

गंभीर दुखापतीमुळे काही दिवसातच आणखी एक प्रवासी मरण पावला आणि १५ दिवसांनंतर बर्फाच्या वादळात आणखी आठ लोकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर २१ दिवसांनी त्या विमानतलं अन्न संपल. पुढं तीन लोक उपासमारीने मरण पावले. आता फक्त १६ लोक जिवंत होते. आता पाणीही संपल होतं. अशा परिस्थितीत त्या १६ लोकांनी जिवंत राहण्याचा निर्णय घेतला.

आता ते जिवंत कसे राहिले हेच ऐकल्यानंतर तुमच्या काळजाचा थरकाप उडेल.

त्यांनी घेतलेला तो निर्णय म्हणजे नरभक्षक बनण्याचा निर्णय होता. त्याच्या साथीदारांचे मांस खाण्याचा, जिवंत राहण्यासाठी मेलेल्या शरीरांचे लचके तोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ती परिस्थितीच अशी होती की त्यांना नरभक्षक बनणं भाग पडलं.

कोणी आपल्या पत्नीला खाल्लं, कोणी आपल्या आईला तर कोणी आपल्या मित्राला.

दररोज एक नवीन प्रेत वाचलेल्या व्यक्तीची भूक शमवत होत. परंतु हे फार काळ टिकणार नव्हतं हे तिथल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत होतं. म्हणून पॅराडो आणि कॅनेसा नावाच्या दोन विमान प्रवाशांनी बर्फाळ वाळवंट आणि उंच टेकड्या पार करण्याचा निर्णय घेतला.

२१ डिसेंबर १९७२ चा तो दिवस.

अनेक मैल चालल्यानंतर, त्या दोघांना मानवी वस्तीची चिन्हे दिसू लागली. अनेक किलोमीटर चालल्यानंतर, पॅराडो आणि कॅनेसा अखेर अर्जेंटिनाच्या सीमेवर असलेल्या एका गावात पोहोचण्यात यशस्वी झाले.

त्यांनी गावकऱ्यांना विमान अपघात आणि त्यात आपण वाचल्याबद्दल सांगितल. पुढच्या चोवीस तासांत ही बातमी संपूर्ण जगापर्यंत पोहोचली. ही बातमी कळताच जगात खळबळ माजली. कोणाचाही विश्वास बसत नव्हता की,

त्या निर्जन बर्फाळ टेकडीवर १६ लोक ७२ दिवस अन्न पाण्याशिवाय, कोणाच्याही मदतीशिवाय कसे जगले?

पॅराडो आणि कॅनेसा या दोघांना पण पत्रकारांनी प्रश्न विचारून भांडवून सोडलं. घाईगडबडीत लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने उरलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याची कसरत सुरू झाली. या दोन हेलिकॉप्टरमधून पॅराडो आणि केनेसा यांनाही रस्ता दाखवण्यात आला.

अखेर लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्व प्रवाशांना एक एक करून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. त्या पांढर्‍या वादळी अशा मरणाच्या तावडीतून निसटलेल्या या लोकांना मृत्यूपासून मुक्ती मिळाल्याचा आनंद तर होताच पण मानवी प्रेत खाऊन जिवंत राहिल्याचं दु:ख होतं. कारण बाहेरचं जग त्यांना हा प्रश्न विचारणार होत. उत्तर खूपच कठीण होतं.

मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले १६ लोक ७२ दिवसांनी जगाला सामोरे गेले. पण त्या १६ पैकी कुणामध्ये ही सत्य सांगण्याची हिंमत नव्हती. पण सत्य बाहेर आलं. त्या १६ जणांना सांगावं लागलं की ते कसे जिवंत राहिले…प्रेत खाऊन.

हे प्रकरण जेव्हा जगासमोर आलं तेव्हा जग काही सेकंदासाठी सुन्न झालं होतं. या प्रकरणाचा वादंग वाढायला लागला. काही लोकांनी यावर टीका केली तर काही लोक या १६ जणांच्या बचावासाठी आले. शेवटी उरुग्वे सरकारने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात हे १६ लोक होते. प्रकरण शांत झालं.

पण आज ही ती घटना काळजाचा थरकाप उडवणारीच आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.