एक रुपयाच्या उधारीने सुनील दत्तला आयुष्यभराचा धडा शिकवला.

पन्नासच्या दशकातील गोष्ट. मुंबई तेव्हाही महानगरीचं होती पण आज आहे तशी घाई गडबडीची नव्हती. शेजारी कोण राहतोय हे ही माहिती नाही असे दिवस अजून आले नव्हते. लाखो लोकांच्या स्वप्नातलं हे शहर मनात माणुसकी घेऊन उभ होतं.

याच स्वप्ननगरीत सुनील दत्तही हिरो व्हायचं स्वप्न घेऊन आला होता. तेव्हा तो अजून पंजाब मधून आलेला बलराज दत्त व्हायचा होता. त्याला आल्या आल्या काही मुव्हीत काम मिळालं नाही पण रेडियो सिलोनवर नोकरी मिळाली होती.

तिथे हा बऱ्यापैकी फेमस झाला होता. तिथे लक्स के सितारे नावाच्या शो मध्ये तो सेलिब्रेटीच्या मुलाखती घ्यायचा. एकदिवस आपलीही कोणी तरी मुलाखत घेईल याचा त्याला विश्वास होता. दिवसभर ऑडीशन देणे आणि रात्री रेडियोची नोकरी करणे असा त्याचा दिनक्रम असायचा.

एक दिवस त्याच्या मेहनतीला फळ आलं. रमेश सैगल नावाच्या डायरेक्टर ने रेल्वे प्लॅटफॉर्म या सिनेमासाठी त्याला साईन केलं. बलराज दत्तचा सुनील दत्त झाला. त्याचे अच्छे दिन सुरु होणार होते.

त्याकाळात फोर्ट परिसरात एक कोह्लीज म्हणून रेस्टोरंट होते. मुंबईत बहुदा पहिल्यांदाच बिलियर्डस पूल टेबल सुरु झालं होतं. पन्नास पैसे देऊन अर्धा तास खेळायचं. थोड्याच दिवसात हे रेस्टॉरंट खूप फेमस झाले. तरुणांच्यात तिथे पैसे लावून खेळण्याची पैज लागायची.

सिनेमाच शुटींग रेडियोवर शो चांगला चालत असलेल्यामुळे खिशात पैसे खुळखुळत असणारा सुनील दत्तही तिथे यायचा. 

एकदा काय झालं सुनील दत्त बिलियर्डस खेळताना दोन तीन वेळा हरला. कायम जिंकणारे आपण आज हरू कसं काय शकतो असं त्याच्या मनात बसलं. तो पुन्हा पुन्हा खेळू लागला पण त्या दिवशी लक त्याच्या बाजूने नव्हते. खेळाची नशा एवढी चढली होती की खिशातले सगळे पैसे संपे तो पर्यंत तो खेळत राहिला.

जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या जवळचे पैसे संपले आहेत तोवर त्याच्याजवळ फक्त दीड रुपया उरला आहे. तो जवळपास दोन तास बिलीयर्ड खेळत होता. पूल टेबलचं बिलचं दोन रुपये झालं होतं . घरी जाण्यासाठी बसचे आठ आणे देखील नव्हते.  मग त्याच्या लक्षात आलं की रेस्टॉरंटचे मालक सुद्धा त्याच्याप्रमाणे पंजाबी आहेत. त्यांच्या कडून १ रुपया उधार घेऊ, म्हणजे त्यांच बिल ही फेडता येईल व घरी जाण्यासाठी पैसे ही उरतील.

काही दिवसांनी फिल्म रिलीज होणार आहे असा हा फिल्मस्टार काऊटरवर बसलेल्या सरदारजींच्याकडे एक रुपया उधार मागयला गेला गेला.

त्या सरदारजीनी त्याला नाव गाव सगळ विचारून घेतलं. कुठ राहतोस हे ही विचारलं. पैसे का हवेत याची चौकशी केली. सुनीलने त्यांना सगळ सांगितलं. यावर सरदारजी त्याला म्हणाले,

“वो ठीक है पुत्तर, लेकीन तुम तो पंजाबी हो और पंजाबी कभी किसी के सामने हाथ नहीं फैलाते. तुझ्याकडे पुरेसे पैसे नसताना खेळण्याच्या नशेत बिलियर्ड खेळलास- ही एक चूक आणि पंजाबी माणसानं हात पसरले- ही दुसरी चूक. तू जर खरा पंजाबी असशील तर आज घरी चालत जा. उद्या माझ्याकडे ये. मी तुला एक काय, दोन रुपये देईन. “

सुनील दत्तला धक्का बसला. त्याचे डोळे खाडकन उघडले. तो खरोखर फोर्ट ते बांद्रा हे जवळपास २० किलोमीटरचं अंतर चालत गेला आणि दुसऱ्या दिवशी उरलेले आठ आणे त्या सरदारजींच्या मुलाकडे परत केले.

“आपके पापाजीने मेरा जमीर जिंदा कर दिया. काल मी चालताना  मनाशी निश्चय केला, की यापुढे खेळ हा खेळ म्हणूनच खेळायचा; त्याचा जुगार करायचा नाही. आणि आयुष्याचा जुगार खेळत असताना दुसऱ्या कोणत्या नशेची गरज असते? आपके पापाजी मेरे दुसरे पापाजी हो गये है अब “

हा किस्सा त्याच सरदारजीच्या मुलाने म्हणजेच कुलवंतसिंग कोहली यांनी एकेठिकाणी लिहून ठेवलाय. आयुष्यभर सुनील दत्त तो एक रुपयाचा धडा विसरले नाहीत. याच संस्कारामुळे फिल्मइंडस्ट्री मध्ये सच्चा आणि नेक माणूस म्हणून त्यांना ओळखलं गेलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.