हजारो प्रती खपवणाऱ्या लेखकाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडावी हे दुर्दैव.

२०१४ च्या एप्रिल महिन्यातली गोष्ट असावी. प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी चर्चेत होती. बातमी होती प्रसिद्ध रहस्यकथा लेखक गुरुनाथ नाईक यांची. ते गोव्यात वास्तव्याला असताना आजारी होते. हा ज्येष्ठ लेखक आयुष्याच्या सांजसावल्या सुखात घालवायच्या वयात गोव्यात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत करतोय, रेशनिंगचा तांदूळ खाऊन पत्नीसह दिवस काढतोय अशा त्यांच्या चाहत्यांना अस्वस्थ करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या होत्या. बातमी दिली होती गोमंतक या वृत्तपत्राने. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एक फेसबुक पोस्ट वाचली या रहस्यकथा लेखकाचं निधन झाल्याची.

लगोलग त्यांच्या कथांचा संग्रह डोळ्यासमोरून तरळून गेला..एका क्षणात

रहस्यकथांच्या जगात एकेकाळी गुरुनाथ नाईक या नावाचा दबदबा होता. रहस्यकथांचा ब्रँडनेम म्हंटल तर वावगं ठरू नये असच. आता पन्नाशीकडे झुकणारी मराठी वाचकांची एक अख्खी पीढी तरुण वयात या नावाच्या प्रेमात नाईकांच्या प्रेमात होती. जशी सुहास शिरवळकर यांची वाचकांवर जबरदस्त मोहिनी होती तशीच जादू गुरुनाथ नाईक यांच्या लेखणीने त्या काळातील वाचकांवर केली होती.

मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांच मूळ गाव आणि राणे हे त्यांच मूळ आडनाव. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी आहे. साखळीच्या राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध १७ बंडे पुकारली होती. पोर्तुगिजांचा ससेमिरा चुकवित हे कुटुंब साखळीत राहण्यास आलं. त्यांनी नाईक हे नवीन आडनाव धारण केले. तेव्हापासून या घराण्याला नाईक हेच आडनाव लागल.

त्यावेळी या नाईकांकडे प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक कीर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर यायचे. यांचा नाईकांशी कौटुंबिक जिव्हाळा होता. लहानपणी त्यांच्या झालेल्या गप्पागोष्टींतून गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाच बीज रुजलं. रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होत. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून लिखाण केल. पण त्यांच्या रहस्यकथांचा चस्का त्याकाळात बऱ्याच तरुण मुलांना लागला होता.

अशात नाईकांनी रहस्यकथा लिहायचं चालूच ठेवलं. पण त्यातून म्हणावं तस उत्पन्न येत नव्हतं. मग संसार चालवायचा कसा ? म्हणून हा लेखक आपल्या उमेदीच्या काळात पायाला चक्र लागल्यागत अनेक ठिकाणी फिरला. पत्रकारिता आणि पुस्तक लिखाण या दोन्ही माध्यमांत लेखणीच्या आधारावरच त्यांनी आपला संसार सांभाळला. वाढतं वय आणि मानेचं दुखणं यामुळं आयुष्याच्या सांजवेळी त्यांनी पत्नीसह पुन्हा गोवा गाठलं. लिखाण थांबलं. तेव्हा ते त्यांच्या एका मुलाखतीत म्हणतात,

रहस्यकथांचं लिखाण वेगळ्या पद्धतीचं असतं. कायम विचार करावा लागतो. दिवसाचा आराम, रात्रीची झोप एका कथेसाठी ओवाळून टाकावी लागते. दैनंदिन आयुष्यावर याचा मोठा परिणाम घडतो. चार रुपयांपासून ५०० रुपये मानधन घेऊन एकेकाळी आठवडयात एक प्रसंगी दोन अशा वेगाने रहस्यकथा लिहिल्या होत्या. आता हात थकले आहेत, लेखणीही थबकली आहे.

पुढं २००४ सालात नाईकांच्या २०० रहस्यकथांचं पुनर्मुद्रण करण्यात आलं होतं. प्रत्येक पुस्तकाच्या ११०० प्रती काढण्यात आल्या. रहस्यकथांचा चस्का काय म्हणतात, तो या प्रसंगातून दिसला. त्या प्रति हातोहात खपल्या. लेखकाच्या हातात मात्र प्रत्येक कथेचं मानधन म्हणून अवघे ५०० रुपये टेकवण्यात आले होते.

आपली रहस्यमय लेखणी चालवणाऱ्या गुरुनाथ नाईक यांच्या लेखनयज्ञाची दखल २०१२ मध्ये ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’नेही घेतली होती. मात्र मराठी साहित्यात रहस्यकथा वा तत्सम लिखाणाला फारसं मानाचं पान मिळत नाही. त्यामुळे धनंजय, काळा पहाड, झुंजार कथा लिहिणारे बाबूराव अर्नाळकर काय किंवा गुरुनाथ नाईक काय यांच्या विक्रमी लिखाणाची हवी तितकी दखल आजवर घेतली गेली नाहीच.

 

Leave A Reply

Your email address will not be published.