पेटाच्या अशा मागण्या ज्यामुळे कलगीतुरा रंगला!

पेटाच्या अशा मागण्या ज्यामुळे कलगीतुरा रंगला!

आमच्या एका मित्राच्या लग्नात वरात निघाली नाही, कारण भावाला घोड्यावर बसायची भीती वाटत होती. ऐन लग्नात हिरमुसलेला हा कार्यकर्ता एका ट्विटमुळे चांगलाच खुश असेल. ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स’ म्हणजेच ‘पेटा’ या संस्थेनं ‘लग्न समारंभात घोड्यांचा वापर करणं हे अत्याचारी आणि क्रूर आहे,’ असं ट्विट केलं. या ट्विटनंतर, नेटकऱ्यांचे दोन गट पडले. एक गट म्हणतोय पेटाचं बरोबर आहे, दुसऱ्या गटानं मात्र कमेंट्समध्ये पेटाची टर उडवलीये.

याआधीही पेटानं अशा अनेक मागण्या केल्यात, ज्यावरून त्यांना ट्रोल करण्यात नेटकऱ्यांनी सुट्टी दिलेली नाही. त्यांच्या काही खतरनाक मागण्यांबद्दल वाचूयात-

शाळेतून आल्यावर बरोबर पाचच्या ठोक्याला टीव्हीसमोर बसणाऱ्या आणि मोठेपणी मोबाईल घेऊन गल्लोगल्ली पोकेमॉन हिंडत शोधणाऱ्या पिढीचाही पेटाविरुद्ध किस्सा झाला होता. पोकेमॉन्स हे तसे इमॅजिनरी कॅरॅक्टर, पण पेटानं ‘पोकेमॉन्सला पोकेबॉलमध्ये टाकणं, हे सर्कशीसाठी हत्तीला पिंजऱ्यात जखडण्यासारखं आहे. पोकेमॉन्सवर अत्त्याचार करायला ते काही आपले नाहीत,’ असं म्हणणं मांडत ‘पोकेमॉन गो’ गेमवर आणि कार्टूनवर बंदी आणायची मागणी केली होती.

सुरमई, पापलेट, बांगडा ही नावं वाचून खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटत असलं, तरी पेटामधल्या कार्यकर्त्यांच्या कपाळाची शीर फुगते. ‘सी फूड’ हे नाव लोकांची भूक चाळवणारं असल्यानं माशांना ‘सी किटन्स’ असं म्हणायला पाहिजे, अशी नामांतराची मागणी पेटानं रेटून धरली होती.

गडी फक्त माशांचं नाव बदला, इतकं म्हणून थांबले नाहीत. त्यांनी २०१२ मध्ये इंग्लंडमधल्या नॉटिंगहॅम शहराच्या अंमलदाराला ख्रिसमसपुरतं शहराचं नाव बदलून ‘नॉट-इटिंग-हॅम’ असं करण्याची शिफारस केली होती.

हा नाव बदलायचा किस्सा आणखी एका ठिकाणी झाला होता.

इंग्लंडमधल्याच डॉर्सेट नावाच्या कौंटीमध्ये ‘वूल’ नावाचं पार हजार वर्ष जुनं गाव आहे. ‘वेले’ (पाण्याचे झरे) या सॅक्सन शब्दावरून गावाचं नाव पडलं असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पेटानं मात्र या ‘वूल’चा संबंध मेंढ्यांपासून निघणाऱ्या लोकरीशी जोडला आणि गावाचं नाव ‘विगन वूल’ असं ठेवा म्हणून सांगितलं. बदल्यात गावातल्या सर्व २००० घरांना प्राण्यांना त्रास न देता बनवलेले ब्लँकेट्स देऊ अशीही घोषणा केली.

यामुळे गावकरी चांगलेच चिडले. पेटानं अर्धवट माहिती घेऊन अशी मागणी केल्यानं काही गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या, तर काहींना हसू आलं.

एका दगडात दोन पक्षी मारले ही म्हण आपण बोलता बोलता अनेकदा वापरतो. इंग्लिशमध्येही प्राण्यांचा संबंध जोडल्या गेलेल्या अनेक म्हणी आहेत. पेटानं २०१८ मध्ये अशा म्हणींच्या वापरावरही आक्षेप घेतला होता.

या म्हणींमधून प्राण्यांविषयी क्रूरता पसरवली जाते, असं पेटाचं म्हणणं होतं. या म्हणींऐवजी त्यांनी नव्या म्हणीही सुचवल्या पण त्या लोकांना भिडल्या नाहीत. उलट त्यांनी प्राण्यांविषयीच्या आणखी म्हणी वापरत पेटाची खिल्ली उडवली.

विश्वास बसणार नाही, पण पेटानं एकदा कोंबड्यांचं स्मारक बांधण्याची मागणी केली होती.

विषय असा होता की, ऑस्ट्रेलियातल्या एका केएफसीमध्ये कोंबड्या घेऊन येणाऱ्या ट्र्कला अपघात झाला. यामुळे ट्रकातल्या कोंबड्या रस्त्यावर पडल्या आणि अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला. पेटानं या मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचं अपघाताच्या जागी म्हणजेच भररस्त्यात स्मारक बांधावं हसा हट्ट धरला होता. या अजब मागणीला शहरातल्या नागरीकांनी सोशल मीडियाद्वारे चांगलाच विरोध केला.

पेटाच्या एका मागणीमुळे थेट पेटा विरुद्ध अमूल असा सामना झाला होता. भारतातला सगळ्यात मोठा डेअरी ब्रँड असणाऱ्या अमूलनं ‘प्लान्ट बेस्ड डेअरी’मध्ये (वनस्पती किंवा कृत्रिम पद्धतीनं बनवलेले डेअरी प्रॉडक्ट्स) रूपांतरीत व्हावं असं सुचवलं.

यावर अमूलचे कर्मचारी चांगलेच पेटले. ‘दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबाचं संगोपन तुम्ही करणार आहात का? फॅक्टरी प्रॉडक्ट्स वापरून तयार केलेलं दूध सामान्य लोकांना परवडणार आहे का?’ असे सवाल करत अमूलनं हा विदेशी संस्थांचा कट असून त्यांना भारतीय डेअरी उद्द्योग उध्वस्त करायचा आहे, असा आरोपही केला.

आता लग्नात घोड्यावरुन वरात काढताना पेटाच्या मागणीचा विचारलेला जातोय का, हे बघावं लागेल. म्हणी वापरताना, शहरांची नावं ठेवताना किंवा कार्टून काढताना ते प्राण्यांशी निगडित नाहीत ना, हे पाहायला विसरू नका! नाहीतर कलगीतुरा रंगणार हे फिक्स.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.