पायाभूत सुविधांवर भर देऊन केंद्र सरकार अरुणाचल प्रदेशात चीनला टक्कर देतंय..

काही दिवसांपूर्वी चीनने अरुणाचल प्रदेशच्या माध्यमातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. जवळपास २०० सैनिक तिबेटच्या बाजूने घुसले होते. एवढंच नाही तर चीन अरुणाचल प्रदेशला आपला दक्षिण तिब्बत भाग असल्याचं म्हणतो. एलएसीवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये दीर्घकाळ चकमकही झाली. अरुणाचल प्रदेशाबाबत चीन आपली युद्ध तयारी सातत्याने वाढवत आहे.

आता चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी भारत अरुणाचल प्रदेशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी तयारी करत आहे. यामध्ये नवीन रस्ते, पूल,  हेलिकॉप्टर तळ बांधण्यापासून  दारुगोळा साठवण्याच्या भूमिगत सुविधांचा समावेश आहे, तसेच सीमावर्ती भागात सगळ्या हवामानात प्रवेश सुलभ करण्यासाठी नवीन बोगद्यांचे काम वेगाने सुरु आहे.

आता यातले बहुतेक प्रकल्प आधीच नियोजित केले गेले होते, परंतु चीनशी सुरू असलेल्या अडथळ्यामुळे त्यांच्या कामाचा वेग वाढवण्यात आलाय.

दरम्यान, बांधकामाचं काम वेगाने सुरु असूनही संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी हे मान्य केले आहे की, “चिनी लोकांकडे अधिक चांगल्या पायाभूत सुविधा आहेत यात शंका नाही, आपण पायाभूत सुविधांच्या बाबतीत चीनपेक्षा एका दशकापेक्षा जास्त मागे आहोत. पण यात बदल करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ते पुढे म्हणाले,

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आसपासच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर चिनी अनेक वर्षांपासून लक्ष देत आहेत आणि एलएसीपर्यंत उत्तम रोड कनेक्टिव्हिटी राखली आहे.  निर्माणाधीन पायाभूत सुविधा प्रकल्पांना नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने गती देण्यात आली असून अधिक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एक वर्षानंतर, गोष्टी खूप वेगळ्या असतील आणि कालांतराने पायाभूत सुविधा सुधारतील.”

लडाखमध्ये ८३२ किलोमीटर एलएसीवर १४ व्या कॉर्प्सच्या एका विभागाद्वारे नजर ठेवली जाते.  आणि पूर्व कमांडमध्ये १,३४६ लांब LAC च्या सुरक्षेची जबाबदारी दोन कोअरला सोपवण्यात आलीये. ज्यामुळे हा भाग देशातील सर्वात जास्त संरक्षित क्षेत्रांपैकी आहे.

दरम्यान, LAC वर वाढता तणाव लक्षात घेता, पूर्व लडाखमध्ये अधिक सैन्याच्या संख्येत वाढ कारण्याबरोबरच सैन्याच्या तैनातीच्या पद्धतीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ईस्टर्न आणि नॉर्दर्न कमांड्सना आता प्रत्येकी अतिरिक्त आक्षेपार्ह तुकडी मिळाली आहे.

फास्टेस्ट मोडमध्ये काम सुरु

अरुणाचल प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या बांधकामाची कामे इतक्या प्रमाणात वाढली आहेत की अधिकारी पुढील वर्षी प्रस्तावित मुदतीपूर्वी जूनमध्ये ७०० कोटी रुपयांचा सेला बोगदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तयारी करत आहेत.

३१७ किलोमीटर लांबीच्या बालीपारा-चारदुवार-तवांग (बीसीटी) रस्त्यावरील नेसीफू बोगद्यासह हा मोक्याचा प्रकल्प आहे, जो अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग आणि तवांग जिल्ह्यांकडे जातो, हे सुनिश्चित करेल की, संरक्षण आणि खाजगी दोन्ही वाहने यावर आरामाने वाहतूक करू शकतील.

सेला बोगदा प्रकल्प, ज्यामध्ये १,५५५-मीटर लांबीचा मुख्य आणि एस्केप बोगदा, ९८० मीटर लहान बोगदा आणि १.२ किमी रस्त्याचे बांधकाम सुरु आहे, जे सुनिश्चित करेल की चिनी या भागात वाहतुकीवर नजर ठेवण्यास सक्षम होणार नाही.

बोगदे अश्या प्रकारे डिजाईन केले जात आहेत कि, टाक्या आणि अगदी भविष्यातील  वज्र हॉवित्जरसोबत  सर्व लष्करी उपकरणे चिनी लोकांच्या लक्षात न येता येथे सहजपणे नेली जाऊ शकतात, त्यामुळे लष्करी उपकरणे आणण्यात वेळ वाचेल आणि त्याच वेळी इथे वर्षभर कुठल्याच कामात अडथळा येणार नाही.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) शी संबंधित कर्नल परीक्षित यांची सेला बोगदा प्रकल्पासाठी गेल्या वर्षी निवड झाली होती. रोहतांगमधील अटल बोगद्याच्या बांधकामाच्या प्रकल्पाशी पाच वर्षे संबंधित राहण्याच्या अनुभवामुळे त्यांची निवड करण्यात आली.

सेला बोगदा प्रकल्प संचालक कर्नल परीक्षित मेहरा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, “पहिला बोगदा लष्कर दिनी म्हणजेच १५ जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण होईल, तर दुसरा जूनपर्यंत पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्ण करण्याची प्रस्तावित मुदत ऑगस्टपूर्वी असेल.

ते पुढे म्हणाले,

सेला बोगदा तयार झाल्यानंतर, तो १३,००० फूट उंचीवर जगातील सर्वात लांब दुहेरी मार्गाचा बोगदा बनेल. अटल बोगद्याचा अनुभव उपयुक्त ठरला आहे कारण आम्ही अत्याधुनिक उपकरणांसह अत्यंत वैज्ञानिक, अद्ययावत तंत्रज्ञान वापरत आहोत, जे आमच्यासाठी हा प्रकल्प शेड्यूलपूर्वी पूर्ण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे.’

जनरल ऑफिसर कमांडिंग, मेजर जनरल झुबिन ए. मिनावाला म्हणाले, “केवळ लष्करी दृष्टिकोनातूनच नाही तर नागरी दृष्टीकोनातूनही पायाभूत सुविधांवर पूर्ण लक्ष दिले जात आहे. अशा डोंगराळ भागात कनेक्टिव्हिटीची सुलभता अत्यंत महत्वाची आहे जिथे हवामानाची परिस्थिती केव्हाही खराब होते.”

बोगद्यांव्यतिरिक्त, सुमारे दोन डझन पूल बांधले जात आहेत, त्यापैकी काही पूर्ण झाले आहेत. सर्व प्रकारच्या लष्करी उपकरणांच्या दृष्टीने ही महत्त्वाची कनेक्टिव्हिटी सुविधा पुरवणार असल्याचे समजते. तसेच हेलिकॉप्टर बेसची संख्या देखील वाढणार आहे.

भारत तंत्रज्ञान-आधारित सुरक्षा ग्रीडमध्ये अधिक गुंतवणूक करत आहे, जे फक्त LAC सोबत PLA च्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सक्षम नाही तर २४×७ करडी नजर ठेवण्याचही काम करेल.

एल -७० तोफा, बोफोर्स, एम -७७७ लाईट हॉविट्झर्स, पिनाका आणि स्मर्च रॉकेट सिस्टीम यांसारख्या सिस्टीमसोबत भारताने एलएसीवर आता चांगली स्ट्राइक क्षमता असल्याची खात्री केली आहे. दारूगोळ्यासाठी सुरक्षित भूमिगत साठवण सुविधा उभारण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

अश्या स्टोरेज सिस्टीममुळे सैन्याला दारूगोळ्याचा सतत पुरवठा होईल याची खात्री होईल आणि ते भूमिगत आणि उत्तम अभियांत्रिकी स्थितीत असल्याने कोणत्याही प्रकारच्या बॉम्बस्फोटाला तोंड देऊ शकतील.

भूमिगत आणि विस्तारित रणनीती LAC पर्यंत वाढवली जात आहे, जिथे सैन्याने बचावात्मक आणि आक्षेपार्ह दोन्ही ऑपरेशन्ससाठी एकात्मिक क्षेत्रे स्थापित केली आहेत.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.