ती नसती तर हा बाबा आमटे आज जसा आहे तसा असूच शकला नसता. 

२००० सालचा जानेवारी महिना. राष्ट्रपती भवनात आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्काराचा कार्यक्रम सुरु होता. त्यावर्षीचा पुरस्कार कुष्ठरोग्यांच्यासाठी आपल आयुष्य अर्पण केलेले कर्मयोगी बाबा आमटे यांना जाहीर झाला होता.

गांधीजींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार खऱ्या अर्थाने गांधीजींनी दाखवलेल्या वाटेने जाणाऱ्या या अभयसाधकाला मिळणे हे या पुरस्काराचा सन्मान वाढवणारी घटना होती.

17amte.pop

राष्ट्रपती भवनातला कार्यक्रम म्हणजे सगळे राजशिष्टाचार काटेकोरपणे पाळले जातात. त्याची कल्पना बाबांना आधीच देण्यात आली होती. पण तरी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायचा असूनही बाबा आमटे आपल्या आनंदवनातल्या नेहमीच्या बनियन हाफ पँट याच वेशात आले होते. ते म्हणाले,

“अर्धनग्न राहून महात्मा इंग्लंडच्या राजाच्या दरबारात गेला होता आणि मी त्याचा शिष्य त्याच्याच देशाच्या राष्ट्रपतीला भेटायला माझा वेश बदलून जाऊ? शक्य नाही. “

याला कोणाचा आक्षेप असणे शक्य नव्हते. बाबांनी पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी ते भाषणाला उभे राहिले. भाषणाची सुरवात केली,

“सौभाग्यवती साधना, आदरणीय राष्ट्रपती.. “

राजशिष्टाचारानुसार जर एखाद्या कार्यक्रमात महामहीम राष्ट्रपती हजर असतील तर सर्व प्रथम त्याना संबोधन करणे अपेक्षित असते. पण बाबांनी तसे न करता आपल्या पत्नीचा आधी उल्लेख केला. उपस्थित असलेल्या दिल्लीकर प्रतिष्ठिताना थोडासा धक्काच बसला.

पण बाबा आमटे गेली कित्येक वर्ष आपल्या कार्याच्या पाठीशी खंबीर उभ्या असणाऱ्या पत्नीचा कृतज्ञता म्हणून  भाषणाच्या सुरवातीला नामोल्लेख करत असत. त्यांनी हीच परंपरा राष्ट्रपती भवनातही पाळली. राष्ट्रपतींनी देखील त्यांना दिलखुलास दाद दिली.

बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांचे सुपुत्र विकास आमटे यांनी त्यांच्या या आठवणी सांगितल्या आहेत.

कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी  आनंदवन उभ राहील ते साधना ताईंच्या त्यागातूनच.

या बोट झडलेल्या महारोग्यांच्या सावलीला देखील इतर समाजबांधव उभे राहात नव्हते त्यांच्यासाठी साधनाताई आई झाल्या. त्यांच्या जखमा साफ करण्यापासून ते त्यांना घास भरवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी साधना ताईनी आनंदाने केल्या. आयुष्यातला प्रत्येक पडाव पार करताना त्यांची प्रचंड फरफट, ओढाताण झाली. पण त्यांच्या मनात याबद्दल कदापि किंतु नव्हता

पुलं देशपांडे एकदा आपल्या एका लेखात म्हणतात,

“बाबांच्या निर्भयपणाचे आता चोहीकडे कौतुक आहे. पण आपल्या तान्ह्य पोरांना घेऊन गावाबाहेर त्यक्त, बहिष्कृत अशा अवस्थेत दोन-दोनशे, चार-चारशे महारोग्यांच्या संगतीत राहणाऱ्या साधनाताईंपेक्षा दक्षप्रजापतीचा महाल सोडून स्मशानवासी, नररुंडधारी, बंभोलानाथाशी संसार करणारी गौरी आणखी काय निराळी होती?”

बाबा आमटे म्हणजे कर्मयोगी. ते आयुष्यभर आपल्या तत्वानीच चालले. त्यासाठी होणारी कोणतीही तडजोड त्यांना खपायची नाही. अशा या वादळाला साथ देणारी एक लहानशी पणती एवढेच बाकीच्यांच्या लेखी साधनाताईचे अस्तित्व होते मात्र बाबांना माहित होते साधनाताईच्या समर्पणाच्या जोरावरच आपल्या कार्याचा डोलारा उभा ठाकला आहे.

“ती नसती तर हा बाबा आमटे आज जसा आहे तसा असूच शकला नसता. “

जेष्ठ विचारवंत नरहर कुरंदकर जेव्हा बाबांना भेटायला येत तेव्हा ते त्यांना नेहमी हात जोडून नमस्कार करत मात्र साधनाताईना ते साष्टांग दंडवत घालत . 
Baba Amte with his wife Sadhna Tai Amte Be An Inspirer

साधना ताई आनंदवनाच्या प्रेममयी मूर्ती तर होत्याच मात्र वेळप्रसंगी त्या बाबांच्या पेक्षाही कणखर होत. आनंदवन उभे करत असताना शेकडो हाताना झालेल्या कष्टाची त्यांना जाणीव होती. तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पोटात काहीना काही अन्न जावे याची ममतामयी ओढ त्यांना असायची.

एकदा आनंदवनात शस्त्रक्रिया शिबिराच्या निम्मिताने राज्याचे आरोग्यमंत्री आले होते. त्यांना तिथे जेवायला वाढण्यात आलं. मन्त्रिमहोदय जेवून उठले तेव्हा साधनाताईच्या लक्षात आलं की त्यांनी आपल्या ताटात थोडेसे अन्न टाकलेले आहे. साधनाताईना राग आला. त्यांनी मंत्रीसाहेबाना खडे बोल सुनावले. इतकच नाही तर त्यांना ताटातले अन्न संपवून मगच उठू दिल.

पुलंच्याच  शब्दात सांगायचं झाल तर बाबा आमटे आणि साधना आमटे हे जोडप म्हणजे ज्वाला आणि फुलांचा संगम. आनंदवनाच्या कार्याच्या प्रकाशात बाबा एकटेच उजळून निघाले; पण त्या उजळण्यासाठी आयुष्यभर ज्योत होऊन जळण्याची व्रतस्थ भूमिका साधनाताईंनी निभावली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.