कधीकाळी आपल्या शिव्या खाणारा सिराज, भारताचा एक्का कसा बनला याची गोष्ट…

स्ट्रगल. म्हणलं तर साडेतीन अक्षरांचा शब्द आणि म्हणलं तर कित्येकांचं सगळं आयुष्य. जिंदगीत कुठलंही क्षेत्र असुद्या, स्ट्रगल कुणालाच चुकत नाय. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली लेकरं काय स्ट्रगल करत असणार? असं आपल्याला वाटतं खरं, पण त्यांच्यामागंही लडतरी असतील ज्या आपल्याला कधी समजायच्या नाहीत. कारण आपण पडलो सामान्य लोकं.

आपण उण्यापुऱ्या आयुष्यात मोजून दहा भारी स्वप्न बघतो, म्हणजे गाडी, बंगला, फॉरेन ट्रिप, नोकरी, छोकरी अशी. त्यातली सगळी स्वप्न पूर्ण होतात का? तर नाय. मग आपण स्वप्न बघणं सोडून देतो आणि आपल्याच सारखा स्ट्रगल करणाऱ्या दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण झालेली बघण्यात मन भरुन घेतो.

मोहम्मद सिराज आवडायला लागला याचं पहिलं पण शेवटचं नसलेलं कारण म्हणजे स्ट्रगल.

हैदराबादमध्ये मोठा झालेला एका साध्या रिक्षावाल्याचा मुलगा. वडील दिवसाला ७० रुपये पॉकेटमनी द्यायचे, त्यात पोरगं सगळी दुनियादारी करायचं. त्याला नाद एकच होता, क्रिकेटचा. हैदराबादची कित्येक मैदानं सिराजनं गाजवली असतील… गिणती करणं अवघड आहे. अनेकदा अपयश आलं, पण भावानं टेनिस बॉल क्रिकेट, फर्स्ट क्लास क्रिकेट, इंडिया ए, आयपीएल आणि टीम इंडिया असा सगळा प्रवास पूर्ण केला.

सिराज भारतीय संघाकडून खेळला, तेव्हा सगळीकडे एकच हेडलाईन होती…

रिक्षावाल्याचा मुलगा ते भारताचा क्रिकेटर.

त्याच्याखाली दवणीय ओळी लिहून सिराजची स्टोरी चार थेंब रडून आणि फोटोवर दोनशे लाईक्स घेऊन कित्येकांसाठी संपली. पण सिराजचा स्ट्रगल संपला होता का? तर नाय.

सिराज कित्येक वर्ष फक्त टेनिस क्रिकेट खेळला, त्याचा स्पीड, जबरदस्त यॉर्कर यावर त्याला यश मिळायचं. २०१५ मध्ये त्यानं पहिल्यांदा लेदर बॉल हातात घेतला आणि दोन वर्षांत मोहम्मद सिराज हे नाव भारतीय संघात होतं. वशिल्यामुळं नाय, रणजी ट्रॉफीमध्ये ९ मॅचेसमध्ये ४१ विकेट घेऊन.

फक्त इंडिया कॅपच नाही, तर सिराजनं आयपीएलमध्ये खेळण्याची संधीही मिळवली. पण व्हाईट बॉलवर काय त्याची रम्मी लागेना. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून पहिला सिझन खेळताना त्याला ओव्हरला आठ रनच्या हिशोबानं फटके पडले. सिराज इतका वाईट मार खायचा, की आरसीबी सपोर्टर नसणाऱ्यांनाही वाईट वाटायचं, सपोर्टर लोकं तर शिव्या घालताना थांबायचे नाहीत.

भारताची एक मॅच रस्त्यावरच्या टीव्हीच्या दुकानाबाहेर उभं राहून बघत होतो, सिराजनं सिक्स खाल्ला आणि गर्दीनं त्याची लायकी काढली. लोकं म्हणायची विराट कोहलीचा चेला आहे म्हणून खेळायला मिळतंय.

खरं सांगू का, सिराज आवडता बॉलर आहे, हे सांगायची लाज वाटायची. पण तरी सांगत फिरायचो… ‘ईसका टाइम आयेगा, एक दिवस हा लय बाप खेळेल.’

मग खरंच एक दिवस आला, ज्या दिवशी कुणालाच काहीच सांगायची गरज पडली नाही, कारण सिराज आवडत नाही अशी लई कमी माणसं उरली होती.

आता हे घडलं एका दिवसात असलं, तरी त्यामागंही स्टोरी आहे…

भारताचा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलियाचा दौरा. भारतीय टीम ऑस्ट्रेलियात पोहोचली आणि एक बातमी येऊन धडकली. सिराजच्या वडिलांचं निधन झालं. तसे ते आयपीएल सुरू झाली, तेव्हाही आजारी होते. पण हा गडी मैदानात लढत राहिला, त्याला त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांचं स्वप्नही साधं होतं, ‘आपल्या पोरानं टेस्ट क्रिकेट खेळावं.’

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीजही होती. बुमराह, शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर असे गडी असताना याआधी एकही टेस्ट न खेळलेल्या सिराजला संधी मिळण्याची शक्यता एक टक्का होती. पण कधी कधी ९९ पेक्षा १ मोठा असतो. सिराज मायदेशी आला नाही, तो ऑस्ट्रेलियात थांबला. त्याच्या वडिलांचं अंतिम दर्शन न घेताच.

शमीला दुखापत झाली, इशांत शर्माही उपलब्ध नव्हता आणि बॉक्सिंग डे टेस्टमध्ये सिराजच्या डोक्यावर भारतीय टेस्ट टीमची कॅप आली. राष्ट्रगीत सुरू असताना सिराज रडला, हातात लाल रंगाचा बॉल घेऊन त्यानं रनअप घेतला, पहिली टेस्ट विकेटही घेतली आणि तीन स्वप्न पूर्ण झाली. त्याच्या वडिलांचं, त्याचं आणि आपलं.

सिराजनं मेलबर्नवर भारी बॉलिंग केली. गॅबावर फक्त तिसरीच टेस्ट खेळताना पाच विकेट्स खोलल्या. प्रत्येक विकेटनंतर सिराज आभाळाकडे बघायचा, अजूनही बघतो.

कारण तेच आहे, ज्या कारणासाठी सचिन प्रत्येक सेंच्युरीनंतर आभाळाकडे बघायचा… बाप.

जिद्द हे सिराज आवडण्याचं दुसरं पण शेवटचं नसलेलं कारण. संधी मिळायची शक्यता कमी होती, ऑस्ट्रेलियन मातीत ऑस्ट्रेलियन बॅटर्स कुणाचाही कचरा करु शकतात, तिथं यानं खेळायचं ठरवलं, लढायचं ठरवलं.

ऑस्ट्रेलियन लोकांनी शिव्या घातल्या, तेव्हा त्याचा विरोध करणारा पहिला माणूस सिराजच होता आणि कॅमेरॉन ग्रीनच्या डोक्याला बॉल लागल्यावर रन घेण्याचा नाद सोडून त्याच्या जवळ  जाणारा पहिला माणूसही सिराजच होता. ही डेअरिंग आणि माणुसकी हे सिराज आवडण्याचं तिसरं आणि पुन्हा एकदा शेवटचं नसलेलं कारण.

म्हणायला गेलं तर तिन्ही कारणं दवणीय आहेत, पण तरीही आपलीशी. कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे प्रसंग येऊन गेलेले असतात. आपल्याला वाटत असतं, आपण गरीब घरातून आलोय, तर आपला स्ट्रगल संपवावा, आपण इतकी वर्ष लाऊन धरलेल्या जिद्दीचं छोटं का होईना पण फळ मिळावं. आपण मनापासून कोणती तरी गोष्ट करावी आणि त्याचं तितकंच मनापासून कौतुक व्हावं. पण सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत आणि आपण सिराजच्या स्वप्नांमध्ये आपला आनंद शोधतो.

आता सिराज आवडण्याचं चौथं, महत्त्वाचं आणि शेवटचं कारण-

क्रिकेट बघताना आपण भावुक होतो, पण यानं लय स्ट्रगल केलाय म्हणून संघातली जागा टिकत नाय. तिथं आपलं नाणं वाजवून दाखवावं लागतं. बरं हे काय जादूची कांडी फिरली आणि झालं असंही नसतं, त्यासाठी मेहनत असते. जी कुणालाच दिसत नाही. सिराजनं ही मेहनत प्रचंड केली.

सिराज बॉलिंगला आला की फटके खाणार हे समीकरणच चेंज झालं. त्याचा आउटस्विंगर भारी होताच पण त्यानं तो आणखी डेडली बनवला. चार बॉल पुढं टाकणारा सिराज पाचवा बॉल इतका पटकन आत घेतो, की बघायला भारी वाटतं. कुठं आठची इकॉनॉमी आणि कुठं आयपीएलमध्ये एकाच स्पेलमध्ये टाकलेल्या दोन मेडन्स. विषय हार्ड झाला.

तुम्ही बारकाईनं क्रिकेट पाहत असाल, तर जुना सिराज आठवून बघा.. मार खाल्ल्यावर भाऊचे खांदे पडायचे आणि तो आणखी मार खायचा. ॲग्रेशन ठासून भरलेलं पण त्याला दिशा नव्हती, कधीकधी वाटायचं त्याचा श्रीसंत होईल. पण भावानं लाऊन धरलं, टप्पा सुधारला, बॉल आता हातभर स्विंग होऊ लागला, बाऊन्सरला धार आली आणि माईंडसेटला दिशा मिळाली.

इंडिया विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स टेस्ट २०२१. ज्या प्रकारे शेवटच्या सेशनमध्ये भारतीय बॉलर्स इंग्लंडवर तुटून पडले, ते वर्ल्डकप जिंकताना पाहण्यापेक्षा भारी होतं. शेवटच्या काही ओव्हर्स राहिलेल्या आणि कोहलीनं सिराजकडे बॉल सोपवला. शेवटच्या काही ओव्हर्स राहिलेल्या आणि सेट झालेला बटलर स्ट्राईकवर होता.

ओव्हरचा दुसराच बॉल, बटलर गेला… सिराजनं एक लढाई जिंकली. आता फक्त एक विकेट हवी होती. दोन बॉल डॉट गेले… टेन्शन वाढलेलं. स्ट्राईकवर अँडरसन. ५२ व्या ओव्हरचा पाचवा बॉल, सिराजच्या हातातून सुटला, ऑफ स्टम्पच्या लाईनच्या थोडा बाहेर पडला… आणि ‘टॉप ऑफ द ऑफ स्टम्प’ उडवून गेला. उध्वस्त झाल्यासारखा अँडरसन कित्येक वेळ स्टॅच्यू बनून उभा होता आणि आनंदानं लॉर्ड्सवर पळणारा सिराज बघून आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं.

त्यादिवशी कुणालाच सांगावं लागलं नाही, सिराज माझा आवडता बॉलर आहे. कारण त्यानं स्वतःची गोष्ट लिहिली होती, जिद्दीनं… कष्टानं आणि आनंदानं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.