कृणाल पंड्याचा स्ट्रगल वाचला ना तर त्यांची माप काढायचं धाडस होणार नाही..

यावर्षी लखनौ सुपर जायंट्स नावाची नवी कोरी टीम आयपीएलच्या मार्केटमध्ये आलीये. त्यांच्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकं म्हणली, सेंटर फ्रेशचं रॅपर दिसतंय. एक गडी तर म्हणला, पीपीई किट पासून जर्सी बनवल्या. खोटं कशाला बोला? आम्ही पण लय हसलो.

लखनौवाल्यांनी तेवढ्यात काय केलं, एक फोटो टाकला. बाबो… त्यावरुन असलं डेंजर ट्रोलिंग झालं की विचारु नका. बरं लोकांनी पॅराग्राफ पण नाय लिहिले… एका लायनीत धुव्वा… आठवायला जाऊ नका, फोटो आणि लाईन दोन्ही टाकतोय…

WhatsApp Image 2022 03 24 at 12.15.33 PM
कृणाल पंड्या आणि लखनौचे हेड कोच अँडी फ्लॉवर

हा वरचा फोटो आणि लाईन होती, “कृणाल पंड्या कोचलाच कोचिंग देताना.”

पण भिडू ही तर सुरुवात आहे, एकदा का आयपीएल सुरू झाली की कृणाल पंड्यावर मीम्सचा पाऊस पडत असतोय. तो लय घाण ट्रोल होत असतोय. कधी गल्ली क्रिकेटमध्येही हातात बॅट न घेतलेले कार्यकर्ते या मोठ्या पंड्याला सुट्टी देत नाहीत.

सनासना कृणालची मापं काढण्याआधी एकदा त्याचा स्ट्रगल वाचला पाहिजे भिडू…

हिमांशू पंड्या सुरतमधले एक छोटेखानी पण यशस्वी बिझनेसमन. त्यांचा कार फायनान्सचा व्यवसाय तसा चांगला चालायचा. बायको, दोन पोरं असं चौकोनी कुटुंब पंड्या यांचं होतं. दोन पोरांमधलं थोरलं होतं कृणाल… तो गडी एकदम शांत असायचा, बारकं हार्दिक मात्र जरासं आगाऊ होतं. कृणाल वयाच्या सहाव्या वर्षीच मस्त क्रिकेट खेळायचा. कोचनं त्याच्या वडिलांना सांगितलं, पोरगं चांगलं क्रिकेट खेळतं, फ्युचर ब्राईट असू शकतंय.

हिमांशू पंड्या यांनी आपल्या पोरावर विश्वास दाखवला, सुरतमध्ये त्याचं करिअर बहरायचं नाही म्हणून त्यांनी आपला बिझनेस बंद करुन फॅमिलीसकट बडोदा गाठलं. भारताचे माजी विकेटकिपर किरण मोरे यांच्या अकादमीमध्ये कृणालचा प्रवेश झाला. हिमांशू रोज कृणालसोबत जाऊन येऊन ५० किलोमीटरचा प्रवास करायचे, त्याच्या क्रिकेटसाठी.

वडिलांनी आपल्या क्रिकेटसाठी सेट असलेला बिझनेस बंद केला, हातातलं काम सोडून रोज फक्त आपल्याला आणायला-न्यायला प्रवास केला. कृणालच्या मनावर हे कुठंतरी रुजलं होतंच.

पुढं त्यानं एज ग्रुप क्रिकेटमध्ये बडोद्याकडून खेळताना आपली छाप पाडली, बडोद्याच्या सिनियर संघातही एंट्री मारली. विशेष म्हणजे इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं आर्थिक बळ त्यानं स्वतःच्या आणि क्रिकेटच्याच जोरावर मिळवलं.

कृणाल आणि हार्दिक पैसे मिळावेत म्हणून लोकल टुर्नामेंट्समध्ये खेळायचे. हे पैसे असायचे किती, एका मॅचचे चारशे किंवा पाचशे रुपये.

अंडर-१९ च्या दिवसात हार्दिक आणि कृणालचा डायट असायचा मॅगी. घरची आर्थिक स्थिती गंडलेली त्यामुळं थाटामाटातला डायट परवडायचा नाही, म्हणून हे दोघंही सकाळी आणि संध्याकाळी फक्त मॅगी खायचे.

पण पंड्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गंडली कशी काय?

त्याच झालं असं की, हिमांशू पंड्या यांना सहा महिन्यात तीन हार्ट अटॅक आले. साहजिकच त्यांना आपलं काम थांबवावं लागलं. घराची जबाबदारी आली कृणाल आणि हार्दिकवर. काही माहिन्यांपूर्वीच त्यांनी कार घेतलेली, हफ्ते थकलेले. पण या पोरांच्या क्रिकेटनं मार्ग दाखवला. त्यांच्या कमाईतला मोठा हिस्सा गाडीच्या हफ्त्यातच जायचा, साधं क्रिकेट किट घ्यायला त्यांच्याजवळ पैसे नसायचे… पण पोरांनी लाऊन धरलं.

मात्र संकटं काय थांबत नव्हती…

कृणालची बडोद्याच्या वरिष्ठ संघात निवड झाली होती. आता कुठं चांगले दिवस येत होते. तेवढ्यात त्याला मोठी दुखापत झाली. सोन्याची कोंबडी देणारी आयपीएल नेमकी तोंडावर होती आणि कृणालला दुखापत महागात पडू शकली असती कारण जवळपास दीड-दोन वर्ष तो क्रिकेटच खेळला नव्हता. पण तरी मुंबई इंडियन्सनं त्याला चांगले पैसे देऊन संधीही दिली.

त्यानंतर मात्र कृणालचं नशीब पालटलं, कशामुळं?

पैसे तर होतेच. पण कृणालच्या कामगिरीत सातत्यही होतं. मुंबईच्या टीममध्ये अनेक मोठी नावं असतानाही त्यानं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. डिव्हिलिअर्ससारख्या फलंदाजाला त्यानं आपलं गिऱ्हाईक बनवलं. बॉलिंगमध्ये विकेट तर काढल्याच पण महत्त्वाच्या क्षणी छकड्यांचा पाऊसही पाडला.

आयपीएलमधल्या याच सातत्याच्या जोरावर कृणालला भारतीय संघाकडून खेळायची संधी मिळाली. टी२० क्रिकेटमध्ये त्यानं बऱ्यापैकी कामगिरी केली होती. मात्र लक्षात राहिलं ते त्याचं वनडे पदार्पण.

आपल्या पुण्यात भारत विरुद्ध इंग्लंड सामना होता. कृणालनं जबरदस्त बॅटिंग करत, ३१ बॉल्समध्ये ७ फोर आणि २ सिक्स मारत नॉटआऊट ५८ रन्स केले. त्या मॅचच्या काही दिवस आधीच कृणालच्या वडिलांचं निधन झालेलं, त्यानं भर मैदानात आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

ज्या वडिलांनी कृणालचं करिअर घडावं म्हणून आपलं काम सोडलं, त्याला मैदानात पोहोचवण्यासाठी रोज ५० किलोमीटरचा प्रवास केला, तेच वडील कृणालच्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस बघण्याआधीच निघून गेले होते.

त्याच्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग आले असतील, जिथं त्याला वाटलं असेल की क्रिकेट सोडून द्यावं, एखादा कमी कष्टाचा आणि कमी रिस्क असलेला जॉब बघावा… पण कृणाल लढत राहिला. यश-अपयशाचा विचार न करत, मॅगीवर दिवस ढकलत आणि वडिलांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी झटत.

गडी मैदानात कधीकधी आपल्याच टीममधल्या प्लेअर्सवर चिडतो, कधीकधी कंटाळलेल्या चेहऱ्यानं खेळतो. सध्या त्याचा फॉर्म गंडलाय, मुंबई इंडियन्सच्या संघातलं स्थान गेलंय, भारताच्या संघात कमबॅक करणंही कठीण आहे…

पण कसं असतंय ना भिडू, कुठल्याही वशिल्याशिवाय, अवघड परिस्थितीतून जी पोरं पुढं येतात, त्यांच्यात लय जिद्द असते… जिंकण्याची आणि टिकण्याचीही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.